Milind Narvekar: हाती शिवबंधन नाही पण कट्टर शिवसैनिक, कोण आहेत मिलिंद नार्वेकर?

Who is Milind Narvekar: नारायण राणेंच्या टीकेनंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जाणून घ्या कोण आहेत नार्वेकर.
know who is milind narvekar a staunch shiv sainik shivbandhan shiv sena
know who is milind narvekar a staunch shiv sainik shivbandhan shiv sena (फोटो सौजन्य: @NarvekarMilind_/Twitter)

मुंबई: भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर तुफान टीका केली. याचवेळी त्यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. मिलिंद नार्वेकर हे तर 'मातोश्री'वरील 'बॉय' होते. बेल मारली की काय हवं हे विचारायला यायचे. असं म्हणत राणेंनी त्यांच्यावर टीका केली. तर या टीकनंतरच मिलिंद नार्वेकरांनी ट्विटरवरुन त्यांना प्रत्युत्तर दिलं. तर त्याला पुन्हा एकदा राणेंनी ट्विट करुन टीकात्मक रिप्लाय केलाय. मात्र, या सगळ्यामुळे मिलिंद नार्वेकरांबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळेच जाणून घेऊयात मिलिंद नार्वेकर कोण याविषयी

कोण आहेत मिलींद नार्वेकर?

मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली होती.

काही वर्षांपूर्वी मिलिंद नार्वेकर शाखाप्रमुखाच्या मुलाखतीसाठी गेले होते. त्यावेळी नार्वेकर यांचा संवाद साधण्याची शैली, हुशारी पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांची आपल्या स्वीय सचिव पदावर नेमणूक केली. यानंतर नार्वेकर अद्यापही उद्धव ठाकरेंचा राईट हँड ही आपली भूमिका नेमाने बजावत आहेत.

हाती शिवबंधन नाही तरीही कट्टर शिवसैनिक...

शिवसेनेचं राजकारण हे बरंचसं भावनात्मक आहे. त्यामुळे काही वर्षांपासून शिवसेनेतील प्रत्येकाला शिवबंधन बांधण्यात आलं होतं. तसंच पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला शिवबंधन बांधलं जातं. एवढंच नव्हे तर स्वत: उद्धव ठाकरे यांच्या हातात कायम भगव्या रंगाचं शिवबंधन आपल्याला पाहायला मिळतं. पण असं असलं तरी त्यांचे राईट हँड असलेल्या मिलिंद नार्वेकरांच्या हातात मात्र मागील वर्षभरापासून तरी शिवबंधन दिसत नाही.

मागील वर्षभरातील त्यांचे काही फोटो पाहिल्यास आपल्याला हे दिसून येईल. त्यांच्या अधिकृत अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये तरी सध्या असंच दिसतं आहे.

(फोटो सौजन्य: @NarvekarMilind_/Twitter)
(फोटो सौजन्य: @NarvekarMilind_/Twitter)
(फोटो सौजन्य: @NarvekarMilind_/Twitter)
मुख्यमंत्र्याच्या हाती शिवबंधन
मुख्यमंत्र्याच्या हाती शिवबंधन(फोटो सौजन्य: @NarvekarMilind_/Twitter)

मात्र, असं असलं तरीही मिलिंद नार्वेकर यांच्यावर ठाकरे कुटुंबाचा आणि विशेषत: उद्धव ठाकरे यांचा प्रचंड विश्वास आहे. तसंच नार्वेकर देखील उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालं आहे.

खरं तर त्यांची कट्टर शिवसैनिक अशीच ओळख आहे. जरी ते कोणत्याही घटनात्मक पदावर नसले तरी राज्यातील राजकारण ते सध्या प्रचंड महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. शिवसेना पक्षात त्यांचा देखील बराच दबदबा असल्याचं नेहमीच बोललं जातं.

नार्वेकर हे कोणत्याही अति महत्त्वाच्या पदावर नसले तरीही पक्षातील अनेक महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग असतो तसंच अनेक निर्णयावर त्यांची छापही असल्याचं बोललं जातं. त्यामुळेच त्यांना कट्टर शिवसैनिक म्हणून आजही संबोधलं जातं.

मिलिंद नार्वेकर म्हणजे गूढ व्यक्तिमत्व

मिलिंद नार्वेकर हे एकूण राजकारणातील गूढ व्यक्तिमत्व समजले जातात. कारण नार्वेकर हे फारसे लाइमलाइटमध्ये नसतात. आपल्या सगळ्या राजकीय खेळी ते पक्षातील इतर लोकांच्या माध्यमातूनच खेळत असतात. पण तरीही पक्षासाठी ते अत्यंत महत्त्वाचे समजले जातात.

उद्धव ठाकरे यांच्या पडत्या आणि चांगल्या काळात देखील नार्वेकर हे कायम त्यांच्या सोबत होते. त्यामुळेच शिवसेनेतील त्यांचं स्थान अढळ आहे. नार्वेकर हे तसे मितभाषीच आहेत. ते कधीही कॅमेऱ्यासमोर येऊन आपली एखादी प्रतिक्रिया देत नाहीत किंवा काही भूमिका मांडत नाही. त्यामुळेच त्यांचं व्यक्तिमत्व हे काहीसं गूढ आणि महाराष्ट्राला अद्यापही कळू शकलेलं नाही.

तरीही शिवसेना पक्षप्रमुखांपर्यंत पोहचण्यासाठी मिलिंद नार्वेकर हा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो.

know who is milind narvekar a staunch shiv sainik shivbandhan shiv sena
"बॉय का? सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात?"; मिलिंद नार्वेकरांचा राणेंवर 'प्रहार'

28 वर्षापासून उद्धव ठाकरेंसोबत

मिलिंद नार्वेकर हे गेली 28 वर्ष उद्धव ठाकरेंसोबत आहेत. सुरुवातीला स्वीय सहाय्यक म्हणून त्यांच्यासोबत काम करत होते. मात्र आता ते पक्षाचे सचिव झाले आहेत.

जसजसं पक्षात उद्धव ठाकरे यांचं स्थान उंचावत गेलं तसतसं मिलिंद नार्वेकर हे देखील शिवसेनेत स्थिरस्थावर झाले. तेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ, दौऱ्यांची आखणी आणि इतर काही गोष्टी यांची जबाबदारी मिलिंद नार्वेकरांवर होती. यावेळी नार्वेकरांनी दाखवलेला विश्वासूपणा याच जोरावर त्यांनी शिवसेना पक्षात आपलं स्थान निर्माण केलं.

आतापर्यंत शिवसेना सोडून गेलेल्या अनेक नेत्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. पक्षातही काही नेत्यांची त्यांच्याविषयी नाराजी आहे. मात्र, असं असलं तरीही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ते कायमच राइट हँड राहिले आहेत. त्यामुळेच आजही पक्षातील त्यांचं स्थान अबाधित आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in