लसीकरणाचा कोल्हापुरी पॅटर्न! विशेष मोहिमेत 122 महिलांचं लसीकरण, लकी ड्रॉमधून मिळणार बक्षीसं

लसीकरण जनजागृतीसाठी आगळावगेळा उपक्रम आला चर्चेत
लसीकरणाचा कोल्हापुरी पॅटर्न! विशेष मोहिमेत 122 महिलांचं लसीकरण, लकी ड्रॉमधून मिळणार बक्षीसं

दीपक सूर्यवंशी, प्रतिनिधी

कधी काळी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेण्यासाठी प्रचंड रांगा लागायच्या. कधी कधी धक्काबुक्कीही व्हायची. पण आता लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झालाय. पण केंद्रं नागरिकांच्या अभावी ओस पडू लागली आहेत. लसीकरणासाठी जास्तीत महिलांनी पुढे यावं, यासाठी महापालिकेनं चक्क लकी ड्रॉद्वारे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आणि लसीकरणाचा आगळावेगळा कोल्हापुरी पॅटर्न राबवला. आज महिलांसाठी विशेष लसीकरण शिबिर घेतलं. या शिबिरात 122 महिलांचं लसीकरण झालं. लकी ड्रॉद्वारे महिलांना आकर्षक बक्षिसं मिळणार आहेत.

कोरोनाला प्रतिबंध करायचा असेल, तर लसीकरण हा एकमेव पर्याय समोर आलाय. शासनानं जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला प्रारंभ केलाय. सुरवातीच्या टप्प्यात लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत होता. पण रुग्णसंख्या वाढली आणि लसीची किंमत लोकांना कळली. पण लसीचा तुटवडा जाणवू लागल्यानं केंद्रांवर प्रचंड रांगा लागायच्या. काही वेळेला धक्काबुकी आणि वादावादीचे प्रसंगही घडत होते. जुलै महिन्यापासून लसीकरणाचा वेग वाढला. आता तर लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतोय. पण लसीकरणाकडं नागरिकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे.

18 वर्षांवरील नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावं म्हणून महापालिकेच्यावतीनं जनजागृती करण्यात येत आहे. एवढ्यावरच न थांबता आता महापालिकेनं महिलांसाठी विशेष लसीकरण शिबिर घेऊन लस घेण्यासाठी आलेल्या महिलांना चक्क लकी ड्रॉ-द्वारे आकर्षक बक्षिसं देण्याचा निर्णय घेतलाय.

आज सासने हॉलमध्ये महिलांसाठी विशेष शिबिर घेण्यात आलं. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत अडसूळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल माने यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराला प्रारंभ झाला. दिवसभरात 122 महिलांचं लसीकरण झालं. या विशेष सत्रात लस घेणार्‍या महिलांमधून लकी ड्रॉ काढून मोबाईल, मिक्सर, हातातील घड्याळ, हॉटपॉट, किचन सेट, फॅन, इस्त्री अशा गृहोपयोगी वस्तू दिल्या जाणार आहे. नवरात्रौत्सवाच्या काळात लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. लसीकरणाचा हा कोल्हापुरी पॅटर्न चांगलाच चर्चेत आहे हे विसरता येणार नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in