महाविकास आघाडी सरकारची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून केली जाईल हा माझा दावा आहे असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या प्रकारचा अनाचार, दुराचार आणि भ्रष्टाचार पाहण्यास मिळाला त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणजे हे सरकार आहे हे दिसतं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आता एल्गार पुकारून रस्त्यावर उतरावंच लागणार आहे, आता कोरोनाचं कारण देऊन आम्हाला सरकार रोखू शकत नाही असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मुंबईत झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी ही घणाघाती टीका केली.
महाराष्ट्रात सरकारचं अस्तित्व आहे का? फडणवीसांचा खोचक प्रश्न
ठाकरे सरकारच्या काळात हजारो कोटींची लूट सुरू आहे. कायद्याचं राज्य नाही तर काय देता ते बोला असं सध्या राज्यात सुरू आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात एल्गार पुकारावाच लागेल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज सुधीर मुनगंटीवार यांनी जो प्रस्ताव मांडला त्यात या सरकारचे कपडे काढले. पण हे सरकार निर्लज्ज आहे त्यांचे कितीही कपडे काढले तरीही त्यांना फरक पडत नाही असाही टोला फडणवीस यांनी लगावला.
केवळ माजी गृहमंत्री जेलमध्ये आहेत. एवढ्यावर हे सिमीत नाही. प्रत्येक विभागात वाझे आहेत. एक एक आकडा बघितला तर मन थक्क होईल. नुकत्याच काही धाडी पडल्या त्यात हजार कोटी, पाचशे कोटी, चारशे कोटीची दलाली उघड झाली. पण सामान्य शेतकऱ्यांकडे मात्र वळून पाहायला कुणी तयार नाही. देशद्रोह्यांसोबत भागिदारी करत आहेत. त्यांच्या जमिनी तुम्ही घेत आहात. आज जिल्ह्या जिल्ह्यात मंत्री, आमदार, खासदारांचं अवैध रेती, अवैध दारूचं नेक्सस सुरु आहे. महाराष्ट्रात यापूर्वी अशी अवस्था कधीही पाहिली नव्हती. पुढे कुणाचंही राज्य आलं तर महाराष्ट्राला पूर्व पदावर आणण्यासाठी खूप काळ लागेल. कोटी कोटी रुपये देऊन पोलीस अधिकारी त्या पदावर येत असतील तर आम्ही त्यांना काय आवाहन करणार की भ्रष्टाचार थांबवा, अशी खंतही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.