गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली-भामरागड तालुक्याच्या सीमेवर पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात गेल्या काही तासात दोनदा मोठी चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्तीसगड राज्याची सीमा जवळ असलेल्या या सीमावर्ती भागात गडचिरोली नक्षलविरोधी पथकाचे जवान मोठी मोहीम राबवत होते. या मोहिमेत सुमारे 100 जवान एकत्र आहेत. मात्र नक्षल्यानी एका टेकडीवर असलेल्या C-60 पथकाला चहूबाजूंनी घेरल्यानंतर धुमश्चक्री उडाली आहे. (major encounter underway between naxals and C60 commandoes of gadchiroli police)
कालपासून ही चकमक जारी असून यात एक जवान जखमी असल्याची माहिती पुढे आली आहे. अडचणीत असलेल्या जवानांच्या दिमतीला गडचिरोली पोलिसांचे हेलिकॉप्टर तैनात केले गेले असून अहेरीच्या प्राणहिता पोलिस मुख्यालयातून अतिरिक्त पोलीस कुमक कोपर्शी जंगल परिसरात पाठविण्यात आली आहे.
नक्षलवादी भागातील तरुणांना पोलिसांच्या मदतीने मिळणार नोकऱ्या
या चकमकीच्या घटनेला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून नक्षलविरोधी दलं सुखरूप परत येईपर्यंत अधिक प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. दरम्यान, सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की, घटनास्थळी जवळजवळ 270 पोलीस कर्मचारी आहे. तसेच महाराष्ट्र सरकारकडून वायूसेनेची देखील मदत घेण्यात आली आहे.
दरम्यान, यामुळे येथील संपूर्ण भागातील वातावरण सध्या तणावाचं बनलं आहे. नक्षलवाद्यांकडून सातत्याने पोलिसांना टार्गेट केलं जात आहे. त्यामुळेच आता नक्षलवाद्यांविरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे.