घात झाला! अतिरेक्यांच्या हल्ल्यात 5 जवान शहीद, कमांडिंग ऑफिसरच्या पत्नी, मुलाचाही मृत्यू

Manipur militant attack : मणिपूरमधील घटना : आयईडी स्फोट घडवल्याची माहिती... आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरसह पत्नी आणि मुलाचा दुर्दैवी अंत... संरक्षण मंत्र्यांनी घटनेचा केला निषेध
घात झाला! अतिरेक्यांच्या हल्ल्यात 5 जवान शहीद, कमांडिंग ऑफिसरच्या पत्नी, मुलाचाही मृत्यू
मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या तुकडीवर अतिरेक्यांचा हल्ला...India Today

आसाम रायफल्सच्या कमांडिंग अधिकाऱ्याला लक्ष्य करत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात 5 जवान शहीद झाले आहेत. तसंच या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसरच्या पत्नी आणि मुलाचाही मृत्यू झाला आहे. मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. (Commanding Officer of an Assam Rifles unit and his family were killed in a militant attack)

हा स्फोट इतका भयंकर होता की, कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी, त्यांची पत्नी आणि मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला. इतर जखमींना बेहिआंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं.

आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं आहे. आसाम रायफल्सच्या ताफ्यावर शनिवारी (13 नोव्हेंबर 2021) सकाळी 11 वाजता मणिपूरमधील थिंगाट येथे बंडखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात आसाम रायफल्स 46 चे कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांच्यासह 5 जवान कर्तव्य बजावताना शहीद झाले.

कमांडिंग ऑफिसर विप्लव त्रिपाठी यांच्या पत्नी आणि मुलगा यांनाही या घटनेत आपला जीव गमवावा लागला. आसाम रायफल्सचे संचालक आणि वरिष्ठ अधिकारी शहिदांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहेत, असं या निवेदनात म्हटलेलं आहे.

आसाम रायफल्सच्या पथकावर करण्यात आलेल्या या हल्ल्यामागे पिपल्स लिबरेशन आर्मीचा हात असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतिरेकी हल्ल्याचा ट्वीट करून निषेध केला आहे. 'मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या पथकावर करण्यात आलेल्याअतिरेकी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. आज शहीद झालेल्या जवानांना आणि मृत कुटुंबियांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचं बलिदान कधीही विसरलं जाणार नाही. त्यांच्या शोक संतप्त कुटुंबीयासोबत माझ्या सहवेदना आहेत', पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

मणिपूरमध्ये करण्यात आलेल्या या हल्ल्याचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निषेध केला आहे. 'मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या पथकावर करण्यात आलेला भ्याड हल्ला वेदनादायी आणि निंदनीय आहे. देशाने कमांडिंग ऑफिसर, त्यांच्या कुटुंबातील दोन व्यक्ती, आणि पाच जवान गमावले आहेत', असं राजनाथ सिंह यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनीही ट्वीट करून अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. 'आसाम रायफल्स 46 च्या पथकावर भ्याडपणे करण्यात आलेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. या घटनेत कमांडिंग ऑफिसर, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीसह काही जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. राज्यातील दल आणि निमलष्करी दलाकडून आधीच अतिरेक्यांविरुद्ध मोहीम सुरू आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल', असं मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in