Parambir Singh यांना फरार म्हणून घोषित करा, मुंबई क्राईम ब्रांचचा कोर्टासमोर अर्ज

मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांच्या अडचणी आणखीन वाढण्याचे संकेत
Parambir Singh यांना फरार म्हणून घोषित करा, मुंबई क्राईम ब्रांचचा कोर्टासमोर अर्ज

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या क्राईम ब्रांचने महत्वाचं पाऊल उचललं आहे. परमबीर सिंग यांना फरार म्हणून घोषित करण्यात यावं यासाठी क्राईम ब्रांचने आज कोर्टात अर्ज सादर केला आहे. विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी Metropolitan Magistrate कोर्टासमोर हा अर्ज सादर केला आहे.

क्राईम ब्रांचने परमबीर सिंग यांच्यासोबत रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू यांच्यासाठीही अर्ज दाखल केला आहे. "आरोपीविरुद्ध याआधी ३ अजामिनपात्र वॉरंट जाहीर करण्यात आलेली आहेत. त्यामुळे आरोपीला फरार म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यासाठी आम्ही आज कोर्टासमोर अर्ज दाखल केला आहे", अशी माहिती सरकारी वकील शेखर जगताप यांनी दिली. कोर्ट या अर्जावर सोमवारी निकाल देणार आहे.

३० ऑक्टोबरला याच कोर्टाने परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दुसरं अजामिनपात्र वॉरंट जाहीर केलं होतं. अजामिनपात्र वॉरंट जारी केल्यानंतरही आरोपी समोर आलेला नसल्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात यावं अशी मागणी क्राईम ब्रांचने कोर्टासमोर केली आहे.

परमबीर सिंग आणि इतर आरोपींविरुद्ध IPC च्या ३८४, ३८५, ३८८, ३८९, १२० ब आणि ३४ या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यावेळी तिन्ही आरोपींविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जाहीर करण्यात आलं, त्यावेळी आरोपींच्या शोधासाठी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. अधिकाऱ्याने तिन्ही आरोपींना त्यांच्या अखेरच्या पत्त्यावर शोधण्याचा प्रयत्न केला असता ते तिकडे सापडले नाहीत. तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणाचा पत्ता लागत नसल्याचं समोर येतंय.

Parambir Singh यांना फरार म्हणून घोषित करा, मुंबई क्राईम ब्रांचचा कोर्टासमोर अर्ज
Exclusive: अनिल देशमुखांचं कोर्टाला पत्र, पाहा नेमकं काय म्हटलं या पत्रात

परमबीर सिंग यांच्या मुंबई येथील मलबार हिल येथील घरातील त्यांचा सुरक्षारक्षक सतिश बुरुटे आणि खानसामा रामबहादूर थापा यांनी परमबीर आणि त्यांचा परिवार गेल्या तीन महिन्यांपासून या जागेवर राहत नसल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. याच प्रमाणे रियाझ भाटी आणि विनय सिंग यांच्या कुटुंबियांनी गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोघेही घरी परत आले नसल्याचं पोलिसांना सांगितलं आहे.

याच कारणामुळे क्राईम ब्रांचने आपल्या अर्जात, अजामिनपात्र वॉरंट जाहीर केल्यानंतरही आरोपी समोर आले नसल्यामुळे त्यांना फरार घोषित करुन पुढची पायरी म्हणून त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी केली आहे. असं झाल्यास आरोपी चौकशीसाठी समोर येतील असा क्राईम ब्रांचला विश्वास आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शेखर जगताप यांनी, कोर्टाने परमबीर यांना फरार म्हणून जाहीर केल्यानंतर सर्व महत्वाच्या ठिकाणी या तिन्ही आरोपींना Wanted म्हणून जाहीर करण्यात येईल. यानंतर ३० दिवसांत जर आरोपी समोर आले नाही तर त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रीया सुरु होईल असं सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in