ठाकरे सरकार पिंजऱ्यातून बाहेर पडायलाच तयार नाही असं म्हणत नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. दिल्लीतल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनात शिवसेना सहभागी झाली नव्हती. या मुद्द्यावरुनही नारायण राणेंनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेची सगळी कामं बटण दाबून होतात. मातोश्रीची सुरक्षा आता जास्त कडक करण्यात आली आहे. त्यासाठी मातोश्रीला जाळ्याही लावल्या गेल्या आहेत असाही टोला राणे यांनी लगावला. रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
एवढंच नाही तर इम्तियाज जलील यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओवरुनही त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसैनिकांना आता हायवेवर काही काम राहिलं नाही असंच या व्हिडीओवरुन दिसतं आहे या प्रकरणाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे असंही नारायण राणे यांनी सुचवलं आहे. थकीत वीज बिलांच्या मुद्द्यावरुन ग्राहकांना सरकारने दणका दिला आहे. ठाकरे सरकार पिंजऱ्यातून बाहेर पडत नाही.. मी हे करतो, मी ते करतो असं फक्त मुख्यमंत्री सांगतात कृती काहीही करत नाहीत. आता या प्रश्नाबाबत सरकारने योग्य तो निर्णय घेतला नाही तर भाजप आवाज उठवणारच असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे
राज ठाकरेंना शुभेच्छा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत त्याबाबत विचारलं असता राज ठाकरे यांचा दौरा यशस्वी होवो अशा शुभेच्छा नारायण राणे यांनी दिल्या आहेत. एखाद्या नेत्याला अयोध्येला जावंसं वाटलं तर प्रतिक्रिया काय देणार? पण त्यांचा दौरा यशस्वी होऊ देत अशा शुभेच्छा देतो असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.