राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे मोठा निर्णय घेणार? फेसबूक पोस्ट चर्चेत

घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार करण्यासाठी अमोल कोल्हे एकांतवासात जाणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे मोठा निर्णय घेणार? फेसबूक पोस्ट चर्चेत

अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांची एक फेसबूक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. आपल्या पोस्टमध्ये अमोल कोल्हे यांनी एकांतवासात जात असल्याची घोषणा केली आहे. एकांतवास घेतल्यानंतर आपण घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचीत फेरविचार करणार असल्याचं कोल्हे यांनी म्हणलं आहे.

जाणून घ्या अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये काय म्हटलं आहे.

खासदार अमोल कोल्हे हे मुळचे अभिनेते, परंतू २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी शिवसेनेला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर अमोल कोल्हे यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणुक लढवत शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव केला. शिवसेनेचा शिरुर लोकसभेचा बालेकिल्ला उध्वस्त करत अमोल कोल्हेंनी पहिल्याच फटक्यात राजकारणात सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं.

यानंतर २०१९ विधानसभा निवडणुकांदरम्यानही अमोल कोल्हेंनी अमोल मिटकरी यांच्यासोबत शिवस्वराज्य यात्रेतून राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला. या प्रचारसभेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत गेला.

मध्यंतरी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शिरुर लोकसभा मतदार संघात आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात श्रेयवादावरुन मानापमानाचा सामना रंगलेला पहायला मिळाला. यावेळी कोल्हे यांनी आढळराव पाटलांवर टीकाही केली. या घटनेनंतर कोल्हे फारशे चर्चेत नव्हते. परंतू या फेसबूक पोस्टमुळे अमोल कोल्हे पुन्हा एकदा अनपेक्षित निर्णय घेणार तर नाहीत ना अशी चर्चा सध्या रंगताना दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in