Heeraben Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मातृशोक, हिराबेन यांचं निधन

Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांनी अहमदाबादमध्ये उपचार सुरू असताना घेतला अखेरचा श्वास
pm narendra modi mother heeraben modi passed away at age of 100
pm narendra modi mother heeraben modi passed away at age of 100Mumbai tak

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालं. शुक्रवारी पहाटे 3.30 वाजता हिराबेन मोदी यांनी अहमदाबादमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हिराबेन मोदी यांना मंगळवारी सायंकाळी यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून आईला श्रद्धांजली अर्पण केली. (Prime Minister Narendra Modi's mother Heeraben Modi passed away at the age of 100)

पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हिराबेन मोदी यांना कफचा त्रासही होत होता. त्यामुळे त्यांच्यावर अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरू होते.

हिराबेन मोदी यांच्या एमआरआय आणि सिटीस्कॅन करण्यात आला होता. गुरूवारी रुग्णालयाकडून हिराबेन मोदी यांचं हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आलं होतं. ज्यात रुग्णालयाने हिराबेन मोदी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, शुक्रवारी पहाटे उपचार सुरू असताना हिराबेन मोदी यांची प्राणज्योत मालवली.

आई हिराबेन यांच्यासोबत नरेंद्र मोदी.
आई हिराबेन यांच्यासोबत नरेंद्र मोदी.

पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

आई हिराबेन मोदी यांचं निधन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान मोदी यांनी हिराबेन यांचा एक फोटो ट्विट केला. जेव्हा मी 100व्या वाढदिवशी आईला भेटलो होतो, तेव्हा आईने मला एक गोष्ट सांगितली होती. आई म्हणाली होती की, काम बुद्धीने करावं आणि जीवन शुद्धपणे जगावं', असं मोदींनी म्हटलं आहे.

मोदी आपल्या आईला हिराबा म्हणून हाक मारत. कुटूंब चालवण्यासाठी हिराबाने दुसऱ्यांच्या घरी भांडी घासली कष्ट केलेत अशी माहिती पंतप्रधानांनी एका मुलाखतीत दिली होती. याच वर्षी १८ जूनला हिराबेन यांनी आपला १०० वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी नरेंद्र मोदींनी एक ब्लॉग लिहिला होता. ज्यात त्यांनी हिराबा १०० व्या वर्षात पदार्पण करत असल्याचं जाहीर केलं होतं.

“माझ्या जीवनात, माझ्या व्यक्तिमत्त्वात जे काही चांगलं आहे ते माझ्या आई वडिलांमुळेच आहे” अशा शब्दात त्यांनी आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. हिराबांनी अंगावर कधी सोन्याचे दागिने घातले नाही आणि त्यांच्या नावावर कोणतीही संपत्ती नाही असा उल्लेख पंतप्रधानांनी या ब्लॉगमध्ये केला आहे.

हिराबांच्या १०० व्या वाढदिवासानिमित्त भेटण्यासाठी पंतप्रधान गांधीनगरच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी आईचे पाय धुऊन आशीर्वाद घेतले होते. दरवर्षी वाढदिवसाला हिराबांची भेट घेऊन मोदी आशीर्वाद घ्यायचे. वाढदिवसाला हिराबा त्यांना कायम भेट म्हणून काही पैसे द्यायच्या. मोदींच्या ६४ व्या वाढदिवशी हिराबांनी त्यांना ५००० रुपये गिफ्ट म्हणून दिले होते. पंतप्रधान रिलिफ फंडात ते पैसे जमा करण्यात आले होते. गुजरात निवडणुकीवेळी मतदान करायला गेले असताना मोदींनी हिराबेन यांचे आशिर्वाद घेतले होते.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in