संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन : मंगळवारी अंत्यसंस्कार

डॉ. देखणे यांनी संतसाहित्याच्या अभ्यासकासोबत भारुडकार म्हणूनही ओळख मिळवली होती.
Ramchandra Dekhane
Ramchandra DekhaneMumbai Tak

पुणे : संतसाहित्याचे आणि लोकवाडःमयाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ भारूडकार डॉ. रामचंद्र अनंत देखणे यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. राहत्या घरातून रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

सोमवारी घटस्थापनेमुळे डॉ. देखणे हे पुण्यातील शनिवार पेठ भागातील घरीच होते. त्यावेळी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. कुटुंबियांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

डॉ. देखणे यांनी संतसाहित्याच्या अभ्यासकासोबत भारुडकार म्हणूनही ओळख मिळवली होती. लहानपणी वडिलांच्या किर्तनादरम्यान ते टाळकरी म्हणून उभे राहुन अभंगातली चरणे म्हणत. त्यामुळे किर्तन, प्रवचन, भजन आणि भारूड या वारकरी संप्रदायातील विविध कला प्रकारांशी ते जोडले गेले. गावच्या जत्रांमध्ये, पालखी, दिंडी सोहळ्यात डॉ. देखणे वेगवेगळी सोंगे आणून भारुडे करू लागले.

कालांतराने भारुडाची आवड लागल्यानंतर डॉ. देखणे यांनी भारुडांवर संशोधन कराण्यास सुरुवात केली. ‘भारुड वाङमयातील तत्त्वज्ञान - संत एकनाथांच्या संदर्भातील’ या त्यांच्या प्रबंधास १९८५ मध्ये पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळाली. या प्रबंधाला डॉ. मु.श्री. कानडे पुरस्कार समितीचाही पुरस्कार मिळाला आहे. शिवाय देशविदेशांत त्यांनी केलेल्या २१००व्या भारुडाचा कार्यक्रम १४ मे २०१६ रोजी झाला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in