सातारा जिल्हा बँक निवडणूक : चार राजे बिनविरोध, पण माजी पालकमंत्र्यांसमोर विजयाचं मोठं आव्हान

ज्ञानदेव रांजणे यांनी 28 मतदारांना राजस्थानात पाठवल्याची चर्चा; शशिकांत शिंदेंना तीन ते चार मतांची गरज...
शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...

-इम्तियाज मुजावर, सातारा

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्यापर्यंत झालेलं राजकीय धमासान संपूर्ण जिल्ह्यानं पाहिलं. आता 21 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून, यामध्येच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी अर्ज दाखल करण्यापासून ते अर्ज माघारी घेईपर्यंत अनेक राजकीय आणि नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. रामराजे नाईक निंबाळकर, उदयनराजे भोसले, शिवरूप राजे व शिवेंद्रसिंह राजे हे चारही राजेंची जिल्हा बँकेत बिनविरोध निवड झाली आहे.

शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचातील कट्टर राजकीय घमासान सातारा जिल्ह्याने पाहिलं, तर उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून सातारा जिल्हा पाहत आहे. आता तिन्ही राजे परस्परविरोधी राजकीय वर्तुळात असून देखील बिनविरोध निवडल्या गेल्याने जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. जिल्ह्यातील फलटणचे दोन राजे आणि साताऱ्याचे दोन राजेंची निवड बिनविरोध झाली असली, तरी विद्यमान पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे व राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निवडणुकीत लढाई लढण्याची वेळ का आली, असा प्रश्न जिल्ह्यात उपस्थित होत आहे.

राज्यात महाविकास आघाडी असून, राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनाच जिल्हा बँकेच्या शिवेंद्रसिंह राजे भोसले व रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या पॅनेलमध्ये स्थान मिळालेलं नाही. चार राजे बिनविरोध आणि आजी-माजी पालकमंत्री व गृह राज्यमंत्री यांच्यावर निवडणूक लढण्याची वेळ आल्यानं जिल्ह्यात जिल्हा बँकेची निवडणूक चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

जावळीत रंगतदार लढत...

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक रंगतदार लढत जावळी सोसायटी मतदारसंघात होत असून, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंच्या विरोधात भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे ज्ञानदेव रांजणे यांनी आव्हान दिलं आहे. रांजणे यांनी विजयाचे गणित डोक्यात ठेऊन सुमारे २८ मतदारांना सुरक्षित स्थळी रवाना केलं आहे. तर उर्वरित मतदार आमदार शशिकांत शिंदे यांच्याबरोबर सुरक्षित ठिकाणी असून, प्रत्यक्ष निवडणुकीत मतदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

एकूण जावळी सोसायटी मतदारसंघात 48 मतदार प्रत्यक्ष मतदान करणार आहेत. यामध्ये प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, जावळी पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांच्याकडे चार मते असल्याने ही चार मते कुणाच्या पदरात टाकणार व किंगमेकरची भूमिका बजावणार याकडे आता संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

सौरभ शिंदे यांच्याकडे आमदार शशिकांत शिंदे यांचे चकरा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, सौरभ शिंदे जावळी तालुक्याच्या राजकारणामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विचार मानून राजकारण करत आहेत. त्यामुळे सौरभ शिंदे यांची द्विधा मनस्थिती झाल्याचंही बोललं जात आहे. 21 नोव्हेंबरला किंग मेकरच्या भूमिकेत सौरभ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

आमदार शिंदे जावळी तालुक्यात तळ ठोकून असून, स्वतः फिरून मतदारांशी संपर्क करत आहेत. मात्र, शिंदे यांच्यापुढे आव्हान निर्माण करणारे रांजणे नॉट रिचेबल आहेत. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चारही राजे बाजूला झाले असल्याचं चित्र आहे.

अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नॉट रिचेबल...

आमदार शशिकांत शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे यांनी अर्ज भरलेला आहे. राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते असल्याने रांजणे माघार घेतील, असा विश्वास आमदार शिंदें यांना होता आहे. पण, अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच रांजणे यांच्याशी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील यांनीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जावळीतून लढण्यास सांगितले असल्याचे सांगत रांजणे त्यांनी आपला अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे शशिकांत शिंदेंची अडचण झाली.

असं आहे 24 मतांचं समीकरण...

जावळी सोसायटी मतदारसंघात ४९ मतदार आहेत. ज्यांना २४ पेक्षा जास्त मते पडतील, तो उमेदवार निवडून येणार आहे. त्यामुळे हे गणित लक्षात घेऊन ज्ञानदेव रांजणे यांनी २८ मतदारांना सुरक्षित स्थळी रवाना केलं आहे. ते राजस्थानात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतदारांपर्यंत कोणी पोहोचू नये, तसेच ऐनवेळी दगा फटका होऊ नये, हे लक्षात घेऊन रांजणे या मतदारांसह नॉट रिचेबल आहेत.

सौरभ शिंदे यांच्याकडे तीन, चार मते आहेत. हे मतदारही सुरक्षित स्थळी आहेत. ही मते निर्णायक होऊ शकतात. तर आमदार शशिकांत शिंदेंनी आतापर्यंत २१ मतांची जुळवाजुळव केल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना विजयासाठी तीन, चार मते कमी पडत असून, त्यासाठीच त्यांचं बेरजेचं राजकारण सुरू आहे. शशिकांत शिंदेंनी सौरभ शिंदेंशी संपर्क वाढविला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in