गावाने वेडं ठरवलं, परंतू त्याच्याच माहितीने पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या हत्येतील आरोपीला केली अटक

साताऱ्याच्या म्हसवे गावातली घटना, मंगळवारी रात्री पाच वर्षाच्या मुलाची हत्या झाल्याने खळबळ
गावाने वेडं ठरवलं, परंतू त्याच्याच माहितीने पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या हत्येतील आरोपीला केली अटक

सातारा तालुक्यातील म्हसवे गावात मंगळवारी रात्री एका पाच वर्षाच्या मुलाची हत्या झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. घरात कोणीही नसताना या मुलाची हत्या झाल्यामुळे पोलिसांसमोर आरोपीला शोध घेण्याचं मोठं आव्हान होतं. परंतू गावातील एका वेड लागलेल्या व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारावर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

पीडित मुलाचे आई-वडील हे मुळचे माण तालुक्यातले असून ते साताऱ्यात भाड्याने राहत होते. हे दाम्पत्य काही कामासाठी घराबाहेर गेलं असतानाच त्यांचा पाच वर्षांचा मुलगा घरात खेळत होता. संध्याकाळी हे दाम्पत्य घरी आल्यानंतर त्यांना आपला मुलगा घरात दिसला नाही ज्यामुळे त्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केली. यावेळी पालकांना एका घरात त्यांचा मुलगा अर्धनग्न अवस्थेत पडलेला आढळला. यानंतर पीडित मुलाला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतू डॉक्टरांनी त्याला तोपर्यंत मृत घोषित केलं होतं.

पोलिसांनी घटनेचा तपास सुरु करत दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांनी कसून चौकशी करुनही त्यांच्या हातात काहीच लागलं नाही. अखेरच्या क्षणात या प्रकरणात एक नाव पुढे आलं, ज्या व्यक्तीला गावाने वेडं ठरवलं होतं. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी या व्यक्तीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं. परंतू गावाने वेडा ठरवलेल्या या व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारावरच पोलिसांना खऱ्या आरोपीचा मागोवा लागला.

ताब्यात घेतल्यानंतर या वेड्या माणसाची चौकशी सुरु झाली असता त्याने पोलिसांना, मी एकाला त्या मुलाच्या घराची कडी लावताना पाहिलं असं सांगितलं. पोलिसांनी यावर त्या व्यक्तीला तो कोण आहे असं विचारलं असता दाराची कडी लावणाऱ्या मुलाला गावात टोपण नावाने हाक मारली जाते असं सांगितलं. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता वेड्या माणसाने माहिती दिलेला मुलगा हा शाळकरी असल्याचं कळलं. चौकशीदरम्यान हा मुलगा नातेवाईकांकडे गेल्याचं कळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

या शाळकरी मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता अखेरीस त्याने गुन्हा कबूल केला. मोबाईलवर अश्लिल क्लिप पाहून या आरोपीने ५ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. यावेळी मुलाने ओरडू नये यासाठी १६ वर्षीय आरोपीने त्याचं तोंड आणि नाक दाबून धरलं. ज्यात या पीडित मुलाचा मृत्यू झाला. पीडित मुलगा खाली पडल्यानंतर आरोपी शाळकरी मुलगा चांगलाच घाबरला, त्याने घरातलं पाणी पीडित मुलाच्या तोडांवर मारुन पाहिलं, मात्र तरीही तो न उठल्यामुळे आपल्या हातून काहीतरी अघटीत झाल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्याने घटनास्थळावरुन धूम ठोकली. अखेरीस पोलिसांनी या आरोपीला अटक करत हत्येचा उलगडा केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in