शेतकरी आंदोलन करत आहेत तो त्यांचा हक्क आहे. मात्र ज्या प्रकारे आत्ता सीमांवर घडतं आहे ते काही चांगलं नाही. स्वातंत्र्यानंतर कधीही देशाच्या सीमांवर कधीही खिळे ठोकले गेले नाहीत असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. देशात जे शेतकरी आंदोलन सुरू आहे त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा सुरू झाली आहे ही काही चांगली गोष्ट नाही. मोदी सरकारने हे आंदोलन गांभीर्याने घेतलं जावं अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न
आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून केलं जातं आहे. शेतकरी आंदोलन हे हाताळताना मोदी सरकार असमर्थ ठरलं आहे. जे कष्टकरी शेतकरी आहेत त्यांना खलिस्तानी आणि अतिरेकी ठरवलं जातं आहे. हे आंदोलन आणि शेतकरी या दोघांनही बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
आज शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केलं. त्यानंतर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या देशाच्या अन्नदात्याचे प्रश्न सरकारने गांभीर्याने घ्यायला हवं होतं. हे आंदोलन हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणणं, खलिस्तानी म्हणणं योग्य नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने कुणाशीही चर्चा न करता घाईने तीन कायदे पास करून घेतले. या आंदोलनाचा तिढा सोडवायचा असेल तर आता केंद्राने पुढाकार घ्यायला हवा असाही सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.
गेल्या 72 दिवसांपासून जास्त काळ दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी हे आंदोलन सुरु आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या 11 फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र यातून काहीही निष्पन्न झालेलं नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत.