दुर्दैवी! उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी पायी वारी; तिरुपतीला जाणाऱ्या शिवसैनिकाचं वाटेतच निधन

दुर्दैवी! उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी पायी वारी; तिरुपतीला जाणाऱ्या शिवसैनिकाचं वाटेतच निधन

पायी जात असताना बिघडली प्रकृती : कर्नाटकातील रायचूर येथे उपचारादरम्यान झालं निधन

- रोहिदास हातागळे, बीड

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांना दीर्घायुष्य मिळावे म्हणून साकडे घालण्यासाठी बीडवरून तिरुपतीला पायी जात असलेल्या शिवसैनिकाचा रस्त्यातच निधन झाल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी 'मुंबई Tak'शी बोलताना या घटनेला दुजोरा दिला.

तिरुपतीला जात असलेल्या शिवसैनिकाचा दुर्दैवी निधन झाल्याची घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून शनिवारी दुपारी समजल्याचं जाधव म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी बीड शहरातील शिवसैनिक सुमंत रूईकर हे तिरुपतीला साकडे घालण्यासाठी पायी निघाले होते. रुईकर हे चालत असतानाच त्यांना चार दिवसांनी ताप येत होता. त्यामुळे त्यांना कर्नाटकातील रायचूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

बीड ते तिरुपती असं 1,100 किमी चालत जाऊन साकडे घालण्याचा सुमंत रुईकर यांचा नवस होता. मात्र, तिरुपतीला जाण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुमंत रुईकर हे शिवसेनेचे माजी नगरसेवक असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, आता तिरुपतीच्या दिशेनं निघाल्यानंतरचा रुईकर यांचा एक चालतानाचा व्हिडिओ वायरल झाला असून, त्यात त्यांनी साकडे घालण्याबद्दल सांगितलं आहे.

'आम्ही 1 डिसेंबर रोजी बीड येथून पायी निघालो आहोत. आतापर्यंत सव्वा पाचशे किलोमीटर चाललो आहोत', असं रुईकर सांगत आहेत.

शिवसैनिक सुमंत रूईकर
शिवसैनिक सुमंत रूईकर

'शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उदंड दीर्घायुष्य लाभो तसेच येणाऱ्या काळातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व निवडणूकीत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे म्हणून बीड ते तिरुपती बालाजी अशी पायी चालत जाण्याचा नवस त्यांनी केला होता. त्यांच्यासोबत शिवसैनिक श्रीधर जाधवही होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in