‘तोपर्यंत शिंदे गटाकडून तेल मालीश करून घ्या’; शिंदेंवर टीकेची तोफ, फडणवीसांना शिवसेनेचं आव्हान
बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न भाजप पूर्ण करेल, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवादरम्यान केलं. त्यांच्या या विधानाला शिवसेनेनं सामना अग्रलेखातून उत्तर दिलंय. फडणवीसांचे बोल लबाड कोल्ह्यासारखे असल्याचं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधलाय. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल शिवसेनेनं काय म्हटलंय? “महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस गटाची सत्ता आली. पण राज्यात कायदेशीर सरकार स्थापन […]
ADVERTISEMENT

बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न भाजप पूर्ण करेल, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवादरम्यान केलं. त्यांच्या या विधानाला शिवसेनेनं सामना अग्रलेखातून उत्तर दिलंय. फडणवीसांचे बोल लबाड कोल्ह्यासारखे असल्याचं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधलाय.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल शिवसेनेनं काय म्हटलंय?
“महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस गटाची सत्ता आली. पण राज्यात कायदेशीर सरकार स्थापन झाले काय? हा प्रश्न जनतेला पडू लागला आहे. सरकारच्या नावाखाली थिल्लरपणाच चालला आहे. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस जितके प्रगल्भ, शहाणे होते त्या प्रतिष्ठेचे शिंदे गटाबरोबर मातेरे झालेले दिसत आहे. राज्याच्या प्रश्नांवर ते बोलत नाहीत. त्यांचे बोलणे फक्त शिवसेनेवर आहे. शिवसेना फोडूनही त्यांच्या मनात शिवसेनेचे भय आहे. त्यांच्या मानगुटीवर शिवसेना बसलीच आहे. फडणवीस मुंबईतील दहीहंड्या फोडत फिरले”, असं म्हणत शिवसेनेनं दहीहंडी कार्यक्रमात केलेल्या विधानाचा समाचार घेतला आहे.
मोदींनीही निर्बंध घातले होते ना?; शिंदे-फडणवीसांना शिवसेनेचा सवाल
“दहीहंडीचा आनंदोत्सव कोणाला नको? सगळ्यांनाच हवाय. पण सर सलामत तो पगडी पचास! दोन वर्षे उत्सव बंदी होती ती काही मागील सरकारला हौस होती म्हणून नाही. कोरोनामुळे मोदी साहेबांनीच निर्बंध घातले होते ना? आता म्हणे आमच्या राज्यात उत्सव बंदी नाही. अहो देवेंद्रजी, राज्याचे आरोग्य ठिकठाक करून, जवळजवळ कोरोनामुक्त करूनच राज्य तुमच्याकडे सोपवले. पण गेल्या दोन दिवसांच्या उत्सवानंतरचे काय चित्र आहे?”, असा सवाल करत शिवसेनेनं कोरोना आणि साथींच्या आजाराकडे सरकारचं लक्ष वेधलंय.
“फडणवीसांनी दोन दिवसांपूर्वी ‘बाळासाहेबांसाठी भाजपास मते द्या!’ असे आवाहन केले. त्यावर आम्ही म्हणतो, ‘बाळासाहेबांच्या नावावर कसली मते मागता? तुमचं ते मोदी पर्व, मोदी वादळ ओसरलं काय?’ मुंबई महानगरपालिकेत या मंडळींना शिवसेनेचा पराभव करायचा आहे व शिवसेनेचा पराभव करण्यासाठी ते बाळासाहेबांच्याच नावाचा वापर करीत आहेत. मुंबईचा महापौर त्यांना भाजपचाच म्हणजे दिल्लीश्वरांच्या मर्जीचा करायचा आहे आणि शिंदे गटाची त्यास मान्यता आहे”, असं म्हणत सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकेची तोफ डागण्यात आलीये.
गद्दार फडणवीसांना खरे वाटताहेत- शिवसेना
“तुम्ही ठाणे लुटा, आम्ही मुंबईचा लचका तोडतो अशी लांडगेशाहीतील तडजोड झालेली दिसते. पुन्हा बाळासाहेबांचे नाव घेत मुंबईशीही बेईमानी सुरू आहे. फडणवीस म्हणतात, आम्ही खऱ्या शिवसेनेबरोबर आहोत. लोक ज्यांना फुटीर, गद्दार म्हणतात असे लोक फडणवीसांना ‘खरे’ वगैरे वाटत असतील तर या देशाचे, एकंदरीत हिंदू संस्कृतीचे काही खरे नाही. आम्ही म्हणतो, ‘आजचा भाजप अजिबात खरा नाही. अटलबिहारी वाजपेयी, आडवाणी युगातील भाजप आज उरला आहे काय? वाजपेयींचा भाजप शब्दाला आणि इमानाला जागणारा होता. त्या भाजपचा वंश तर सोडा, पण अंशही उरला नाही”, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.