मातोश्रीसाठी प्राण द्यायलाही तयार; अनिता बिर्जे एकनाथ शिंदेंच्या बंडाबद्दल काय म्हणाल्या?

ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या अनिता बिर्जे यांची उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उपनेता पदी नियुक्ती केली, त्यानंतर त्यांच्याशी मुंबई Takने केलेली बातचीत
shiv sena leader anita birje । eknath shinde
shiv sena leader anita birje । eknath shinde

शिवसेनेविरोधात बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात पक्षाची बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला. केदार दिघे यांची ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी, तर अनिता बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी निवड करण्यात आली. नियुक्तीनंतर अनित बिर्जे यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाबद्दल भाष्य केलं. तसेच मातोश्रीसाठी प्राण द्यायलाही तयार असू, अशी भूमिका मांडली.

'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या मागे अनेकजण जात आहे. त्यांच्याबरोबर जायला हवं, असं तुम्हाला का वाटलं नाही?', या प्रश्नाला उत्तर देताना अनिता बिर्जे म्हणाल्या, "बघायला गेलं, तर मी त्यांच्याही आधीपासून शिवसैनिक आहे. त्याच्यानंतर त्यांचा प्रवेश झाला. लहान भाऊ म्हणून मला त्यांचं कौतुक आहे. पण शिवसेनेनं आम्हाला काय दिलं, यापेक्षा आम्ही शिवसेनेला काय दिलं हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राला तारणारी शिवसेना आहे."

"संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू होता. महाराष्ट्रावर अन्याय होत असतानाच्या काळात शिवसेनेचा जन्म झाला. तेव्हापासून ८० समाजकारण आणि २० टक्के राजकारण, असं धोरण हाती घेतलं गेलं. समाजकारण करता यावं म्हणून राजकारण असं शिवसेनेचं धोरण आहे," असं त्यांनी सांगितलं.

"आनंद दिघे आम्हाला सांगायचे की, कधीही तुमच्याकडे मदतीला आले तर तुमचा दरवाजा उघडा असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी मातोश्री वेगळी होती. तिथे माँ असायच्या. त्या आम्हाला नेहमी सांगायच्या की तुम्ही कार्यात उतरला आहात, पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही शिवसेनेचं काम करता आहात? शिवसेना जळता निखारा आहे. या निखाऱ्याशी तुम्हाला खेळायचं आहे. पदरात खेळवायचा आहे, पण पदर जळला नाही पाहिजे आणि निखारा विझला नाही पाहिजे", असं म्हणत अनिता बिर्जे यांनी मीनाताई ठाकरे यांच्याबद्दलचा अनुभव सांगितला.

'आता याच निखाऱ्याला नजर लागली आहे का? तुम्हालाही प्रलोभनं दिली असतील?', असा प्रश्न अनिता बिर्जे यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, "आम्हाला धर्मवीर सांगायचे की मी फकीर आहे. त्यावेळी कार्यक्रम करायचे झाले की, स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायचे. धर्मवीर आनंद दिघे आम्हाला सांगायचे की मी फकीर आहे. त्यावेळी आम्ही पण मग फकिराचे शिष्य आहोत आणि आम्हाला काय हवं. आता तर या वयात काही अपेक्षाच राहिलेली नाही. 'ना ना देना फिर भी शिवसेना'. आता कुठली पद नकोय."

आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरेंबद्दल अनिता बिर्जे काय म्हणाल्या?

'शिवसेनेला आता चांगले दिवस आले होते. पण स्थापनेपासून आतापर्यंत शिवसेनेला संघर्षच करावा लागतोय. तुमच्यावर जबाबदारी आलीये. त्यासाठी तुम्ही तयार आहात का?, या प्रश्नाला उत्तर देताना अनिता बिर्जे म्हणाल्या, "नक्कीच. कारण वय कितीही वाढलं, तरी मन तयार आहे. कार्याला वयाचं बंधन नसतं. कारण ही शक्ती शिवसेनेनं दिलेली आहे. ही शक्ती धर्मवीर आनंद दिघेंनी दिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिली आहे. गुरूची शक्ती घेऊन फिरतो आहोत."

"एकनाथ शिंदे यांचं छोटा भाऊ म्हणून नक्कीच कौतुक झालं असतं. जिजाऊंचं एक उत्तर देते. ज्यावेळेला हत्ती पिसाळला होता. तो हत्ती पकडण्यासाठी एका बाजूला जिजाऊंचे भाऊ होते. दुसऱ्या बाजूला जिजाऊंचे दीर होते. एका बाजूला भाऊ आणि दुसऱ्या बाजूला दीर लढताहेत. कुणासाठी लढताहेत. आज महाराष्ट्रावर संकट आलं आहे. दुःख म्हातारी मेल्याचं नसतं, तर काळ सोकावल्याचं असतं," असं त्यांनी सांगितलं.

"शिवसेनेचा संघर्ष परकीयांशी नाही, तर स्वकीयांशी आहे. "तेव्हा जिजाऊ सासरसाठी किंवा माहेरसाठी नाही लढल्या. त्यांनी जगदंबेकडे शिवबांसाठी वरदान मागितलं. आज या महाराष्ट्रातील माय भगिनी शिवसेनेसाठी लढणार आहे. धनुष्यबाणासाठी लढणार आहेत. आमच्या भगव्यासाठी लढणार आहे. आनंद दिघे यांच्यासाठी शिवसेना श्वास होती आणि समाजकार्य ध्यास होतं. तशीच भूमिका आमची आहे. ज्या ज्या वेळी मातोश्रीवर संकट येईल, त्या त्या वेळी आम्ही प्राणार्पण करायला तयार असू," असं अनिता बिर्जे मुंबई Takशी बोलताना म्हणाल्या.

एकनाथ शिंदेंना अनिता बिर्जेंशी लगावला टोला

समाजसेवा हेच आमचं उद्दिष्ट्ये आहे. तळागाळात जाऊन काम करायचं आहे. शिवसेनेकडे ओघ आहे. माझ्यासोबत चार माणसं आहेत म्हणजे माझ्यासोबत शिवसेना आहे, असं सांगता येणार नाही ना. चार माणसं सोबत आहेत म्हणून मी शिवसेनेला आव्हान दिलंय असं नाही. सागराला भरती-ओहोटी येते, पण म्हणून सागर आटला नाही ना? तशीच भरती शिवसेनेत येणार आहे", असं त्यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in