IT Raid: अजून काय-काय आहे यशवंत जाधवांच्या 'त्या' डायरीत?

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीत सापडलेल्या काही उल्लेखानंतर आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. जाणून घ्या 'त्या' डायरीमध्ये नेमकं काय-काय आहे.
shiv sena leader yashwant jadhav case what else is in  diary found in it raid bmc scam property
shiv sena leader yashwant jadhav case what else is in diary found in it raid bmc scam property (फोटो सौजन्य: Twitter)

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या माझगाव येथील घरावर 25 फेब्रुवारी 2022 रोजी आयकर विभागाने धाड टाकली होती. यावेळी आयकर विभागाने यशवंत जाधव घरातून काही महत्वाची कागदपत्रं, कॉम्प्युटर हार्ड डिस्क, लॅपटॉप, मोबाइल, काही शासकीय कागदपत्रं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशांची आणि व्यवहारांची नोंद केलेली डायरी आयकर विभागाने जप्त केली होती. त्यावेळीच 'या' डायरीत नेमकं काय दडलंय असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आता याच डायरीमधील अत्यंत महत्त्वाची माहिती अशी समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

यशवंत जाधव यांच्याशी संबंधित एक दोन ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी आयकर विभागाने एकाच वेळी धाडी टाकल्या होत्या. ज्यामध्ये आयकर विभागाने बऱ्याच गोष्टी हस्तगत केल्या होत्या. ज्यामधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशवंत जाधव यांची डायरी. याच डायरीमध्ये काही व्यवहार आणि पैशाच्या देवाणघेवाणीच्या नोंदी देखील असल्याचं समोर आलं आहे.

'त्या' डायरीमध्ये नेमकं काय?

यशवंत जाधव यांच्या डायरीमधील सगळ्यात महत्त्वाची नोंद आता समोर आली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डायरीतील एका नोंदीमध्ये 'मातोश्री'ला 50 लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे तर दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला 'मातोश्री'ला 2 कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नावही 'मातोश्री' आहे. त्यामुळेच आता या प्रकरणातील गांभीर्य वाढलं आहे. दरम्यान, डायरीत 'मातोश्री'च्या उल्लेखावरून चौकशी केली असता यशवंत जाधव यांनी हे घड्याळ त्यांच्या आईच्या वाढदिवसाला त्यांनी भेट दिल्याचे सांगितले. दुसरीकडे, गुढीपाडव्याला त्यांनी आईच्या स्मरणार्थ गरजूंना भेटवस्तू दिल्याचं सांगितलं आहे.

आयकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या डायरीत कंत्राटदारांची नावे तसेच काही कंपन्यांची नावे आणि व्यक्तींची नावे देखील आहेत. याशिवाय पैशाची देवाणघेवाण यांच्या देखील नोंदी असल्याचं समजतं आहे. या सगळ्याचा नेमका सहसंबंध काय हे सगळं आयकर विभागाचे अधिकारी तपासत आहेत. दरम्यान, या डायरीमुळे भविष्यात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे इतरही काही लोकं आयकर विभागाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या संशयास्पद नोंदीशिवाय, न्यूजहॉक मल्टिमीडिया कंपनीशी विविध संशयास्पद व्यवहार झाल्याचे देखील या डायरीतून आढळून आले आहेत.

दुसरीकडे आयकर विभागातील सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की, सुमारे 130 कोटींपेक्षा अधिक 36 स्थावर मालमत्तांची देखील माहिती आयकर विभागाला मिळाली आहे. ज्यामध्ये यशवंत जाधव यांच्या काही सहकारी किंवा इतर लोकांच्या नावावर मालमत्ता घेतल्याचं समोर आलं आहे.

न्यूजहॉक कंपनीच्या व्यवहारांचीही चौकशी

दुसरीकडे आयकर विभागाकडून न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या विविध व्यवहारांची देखील चौकशी सुरु आहे. कारण यशवंत जाधव यांनी बीएमसीच्या 30 कोटी रुपयांच्या विविध कंत्राटांसाठी बिमल अग्रवाल यांची मर्जी राखल्याचा संशय आहे. कंत्राटदार बिमल अग्रवाल हे न्यूजहॉक कंपनीचे मालक आहेत. बॉम्ब निकामी सूट घोटाळा आणि सट्टेबाजीशी संबंधित प्रकरणांमध्ये पोलीस आणि अंमलबजावणी संचालनालयाने अग्रवाल यांची यापूर्वीच चौकशी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in