आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार प्रत्यक्षात लाभ घेतंय पवार सरकार- शिवसेना खासदार गजानन किर्तीकर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– राकेश गुडेकर, दापोली प्रतिनिधी

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला. आघाडीमधील नेते पुढील निवडणुकाही महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्याचा निर्धार करत असले तरीही प्रत्यक्षात तळागाळातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये या महाविकास आघाडीची पाळंमुळं रुजल्याचं पहायला मिळत नाही. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हा संघर्ष केल्या काही दिवसांमध्ये प्रामुख्याने समोर आला. आता यात भर पडली आहे ती म्हणजे शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार गजानन किर्तीकर यांची.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे एका कार्यक्रमात बोलत असताना खासदार किर्तीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निधीवाटपाच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे. राष्ट्रवादीची सध्या डँबिसगिरी सुरु आहे. आम्ही आपलं म्हणायचं की ठाकरे सरकार पण प्रत्यक्षात लाभ घेतंय पवार सरकार असं म्हणत किर्तीकरांनी आपली खदखद बोलून दाखवली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दापोली येथे शिर्दे गावात एका कार्यक्रमात गजानन किर्तीकर बोलत होते. या कार्यक्रमात शिवसेना आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी हे वक्तव्य केलं. “आता एका आमदारावर किती भार असतो…त्याला अनेक गावांमध्ये पहावं लागलं. आता या शिर्दे गावापुरतं बोलायचं झालं तर जी काही कामं असतील ती मी माझ्या परीने करतो. पण योगेश कदमांना माहिती आहे की स्पर्धा कशी सुरु असते. डँबिसगिरी कशी चालते राष्ट्रवादीवाल्यांची. खरंतर सर्वात जास्त अडचण योगेश कदमांची होते. मला फारकाही त्रास नाही, पण फंड आणायचा कुठून हा प्रश्नही पडतो”, असं म्हणत किर्तीकर यांनी निधीवाटपातील असमानतेवरची नाराजी बोलून दाखवली.

आम्ही फंडासाठी प्रयत्न करतो, मुख्यमंत्र्यांच्या मागे लागतो पण मग नंतर हे पळवापळवी करतात. आम्ही आपलं फक्त म्हणायचं की ठाकरे सरकार आहे पण प्रत्यक्षात लाभ कोण घेतलंय तर पवार सरकार. अंतर्गत भेदींचा फारमोठा त्रास होतो. हा त्रास इथे जास्त आहे आणि योगेश कदमांना तो भोगावा लागतो. योगेश कदमने याचा सामना करावा मी त्याच्या पाठीशी उभा आहे असं म्हणत गजानन किर्तीकरांनी पक्षातल्या अंतर्गत बंडाळीवरही बोट ठेवलं.

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी खेड, दापोली-मंडणगण येथे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेत दोन गट पडले होते. पालकमंत्री अनिल परब यांनी थेट रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना आव्हान दिलं होतं. खेडमध्ये अनिल परबांनी रामदास कदमांतर्फे केलेल्या सर्व नियुक्त्या रद्द केल्यामुळे स्थानिक नगरपरिषदेत रामदास कदम समर्थकांना अपक्ष म्हणून लढावं लागलं. परंतू इथे त्यांना अपयश पदरात आलं. दुसरीकडे मंडणगडमध्येही रामदास कदम समर्थकांनी सर्वाधिक जागा मिळवत बाजी मारली खरी…परंतू राष्ट्रवादीने अपक्षांच्या साथीने सत्ता स्थापन करत पुन्हा एकदा कदम समर्थकांना कात्रजचा घाट दाखवला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT