मोदी सरकारपुढे लोकशाहीचे चारही स्तंभ शरणागत झाले आहेत-संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत मोदी सरकारविरोधात आक्रमक
मोदी सरकारपुढे लोकशाहीचे चारही स्तंभ शरणागत झाले आहेत-संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत. संग्रहित छायाचित्रindia Today

मोदी सरकारपुढे लोकशाहीचे चारही स्तंभ शरणागत झाले आहेत असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच या सरकारला टक्कर देण्यासाठी एक सक्षम पर्याय उभा राहिला पाहिजे असंही वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. लोकसभा, विधीमंडळ, न्यायपालिका, प्रशासन हे तीन लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. तर प्रसामाध्यमं हा चौथा स्तंभ मानला जातो. मात्र सध्याच्या घडीला अशी अवस्था आहे की हे चारही स्तंभ मोदी सरकारपुढे शरणागत झाले आहेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

परमबीर सिंग, रश्मी शुक्ला यांना कोण वाचवतं आहे? याचं उत्तर शोधा तुम्हाला आपोआप समजेल. सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे असं जरी दिसत असलं तरीही काही विशिष्ट लोकांनाच कोर्ट कसं वाचवतं? आम्हाला का वाचवत नाही? राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही हा मुद्दा मांडला होता. काही विशिष्ट राज्यांना त्रास दिला जातो आहे. जाणीवपूर्वक हे केलं जातं आहे. लोकशाहीचे चारही आधारस्तंभ हे शरणागत झाले आहेत. त्यामुळे या सरकार विरोधात सक्षम पर्याय उभा राहिला पाहिजे. राजकीय दृष्ट्या आम्ही तशी तयारी करतो आहोत. तशी विरोधी गटांचीही इच्छा आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

सुप्रिया सुळे यांनी एक वक्तव्य केलं की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पंचवीस वर्षे सरकार चालणार? आत्तापर्यंत तुम्ही हे वक्तव्य करत होतात आता सुप्रिया सुळेही म्हणाल्या आहेत याबाबत काय सांगाल? असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले की त्यांनी ज्या भावना मांडल्या आहेत त्या योग्यच आहेत. उद्धव ठाकरे खूप चांगलं काम करत आहेत. तिन्ही पक्षांनी हे दोन वर्षात पाहिलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं शीर्ष नेतृत्व यांचा उद्धव ठाकरेंना पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळेच सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे. केंद्रातल्या काँग्रेस नेतृत्वाचा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये कुठेही हस्तक्षेप नाही. शरद पवारांचा या सरकारला पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे त्यातून जर कुणी अशी भावना मांडली तर त्यात चुकीचं काहीही नाही.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप सातत्याने टीका करतो आहे याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले भारतीय जनता पक्ष म्हणजे शंकराचार्य आहेत का? ते सांगतील तो हिंदू आणि ते सांगतील तो अहिंदू. हिंदू असणं म्हणजे मॉब लिचिंग करणं नाही. मॉब लिचिंग कोणत्या व्यापारासाठी होत होतं ते सगळ्यांना माहित आहे. आमचं कॅडर आम्हाला ठाऊक आहे. बाळासाहेब ठाकरेंनी एका विचाराने शिवसेना नावाची फौज निर्माण केली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला भाजप काय म्हणतो त्याची पर्वा नाही. जे आमच्या विरोधात बोलत आहेत ते बाडगे आहेत. आमच्या विरोधात बोलणारे मूळ भाजपचे किती आहेत? आम्ही प्रतिक्रिया बघत असताना मजा घेत असतो. अरे हा तर हा या पक्षात होता, हा आमच्याकडून गेला आहे. जो बाडगा असतो तो जोरात बांग देतो. आमच्या विरोधात बोंबलून ते निष्ठा दाखवतात. मूळ भाजपवाले मागेच आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in