एका बाजूला कोरोना वाढतोय म्हणून सरकारला दोष द्यायचा आणि दुसरीकडे कोरोना रोखण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलली की सरकारचे पाय ओढायचे असे आपल्या विरोधी पक्षाचे चालले आहे. एमपीएससी परीक्षेबाबतही त्यांचे धोरण दुटप्पीच आहे. आगीत तेल ओतण्याचे हे धंदे विरोधी पक्षाने बंद करावेत. पेट्रोल आणि डिझेल भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. पण विरोधी पक्षासाठी तेल स्वस्त झालं आहे का? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.
MPSC परीक्षेबाबत अत्यंत मोठी बातमी, परीक्षेची
तारीख जाहीर!
आणखी काय म्हटलं आहे अग्रलेखात?
राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली, ती आता २१ मार्चला होणार आहे. सरकारने तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी आनंदी झाले आहेत. पण या प्रश्नी राजकारण करू पाहणाऱ्यांची थोबाडे आंबट झाली आहेत. MPSC ची परीक्षा १४ मार्चला होणार होती. वाढत्या कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर होताच पुण्यातील रस्त्यांवर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. राज्यातल्या इतर भागांमध्येही बरीच आंदोलनं झाली. या आंदोलनात तेल ओतण्याचा प्रयत्न राज्यातील विरोधी पक्षनेते करत होते, पण तेलात भेसळ असल्याने हे आंदोलन पेटण्याआधीच विझले.
MPSC च्या विद्यार्थ्यांनी कुणी भडकवतंय म्हणून भडकू नये-उद्धव ठाकरे
परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सचिवांनी घेतला, इतक्या मोठ्या निर्णयाची माहिती मंत्र्यांना नव्हती त्यातून गोंधळ निर्माण झाला. या गोंधळाचे नेतृत्व विरोधी पक्षाने करण्याचा मोका साधला, तेव्हा मुख्यमंत्र्यांना पुढे येऊन हस्तक्षेप करावा लागला. या आंदोलनावरून सरकारवर शेरे-ताशेरे मारले गेले, या सगळ्या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्नही काही महाभागांनी केला हे दुर्दैवच म्हणावे लागेल. कारण कोरोनाचे असेल किंवा इतर काही पण MPSC च्या परीक्षा सतत पुढे ढकलल्याने वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणाऱ्या तरूणांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक खच्चीकरण होत असते. आधीच महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नोकऱ्यांच्या नावाने ठणठण गोपाळ सुरू आहे. पदवीधरांना नोकऱ्या मिळत नसतील तर त्यांनी पकोडे तळावेत, हाच रोजगार असल्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह मांडत असतात, पण मोदी राज्यात पकोडो तळणाऱ्यांचेही वांधेच झालेत.
देशातील वाढत्या बेरोजगारीचे मूळ हे बिनडोक आर्थिक धोरणात आहे. विरोधी पक्षाने जहाल व्हायला हवे ते बेरोजगारीच्या मुद्द्यावर, पण महाराष्ट्रातील विरोधी पक्ष विद्यार्थ्यांना जमवून भिकार राजकारण करत आहे व विद्यार्थ्यांची माथी भडकवून त्यांना सरकारविरोधात लढण्यासाठी भाग पाडत आहे. विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झगडा लावायचा व आपण मजा बघायची अशी मानसिकता यात दिसते. अशाने सरकार पाडले जाईल या भ्रमात कुणी असेल तर त्यांनी डोळ्यावर थंड पाणी मारून जागे व्हावे हेच बरे. आपले सरकार तीन महिन्यांतच येईल असे भाजप पुढारी बडबडू लागले आहेत. ते अशी तरूणांची माथी भडकवून शक्य होणार आहे का? असाही प्रश्न अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.