नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय?; सोमय्यांचा नवा सवाल

श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईनंतर सोमय्यांनी पत्रकार परिषदेत घेत उद्धव ठाकरेंवर केले गंभीर आरोप
किरीट सोमय्या
किरीट सोमय्याफोटो इंडिया टुडे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेल्या कारवाईने नवा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी ही कारवाईने सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी आता नंदकिशोर चतुर्वेदीसोबत उद्धव ठाकरेंचं नाव जोडलं आहे. सोमय्यांनी काही सवाल शिवसेनेला विचारले आहेत.

किरीट सोमय्यांनी यांनी आज त्यांच्या मुलूंड येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले, "श्रीधर पाटणकर आणि त्याचे कारनामे यासंदर्भात मी गेली दीड वर्षांपासून ईडीकडे पाठपुरावा करत आहे. श्रीधर पाटणकर म्हणजे उद्धव ठाकरेंचे मेहुणे. पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे आणि कृपा कुणाची आहे, तर मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांची. काल जो एक व्यवहार ईडीने जनतेसमोर ठेवला. ३० कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. प्रथमदर्शनी हे श्रीधर पाटणकर म्हणजे उद्धव ठाकरे यांचे साडेसहा कोटी पांढरे केले गेले. पण दीड वर्षात जी माहिती ईडीला दिली आहे, त्यात कोट्यवधी रुपये आहेत", असं सोमय्या म्हणाले.

"मी कालच म्हटलं होतं की, जर सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोपही उडेल. कालच्या या प्रकरणात एक पाऊल पुढे जर आपण गेलो तर यात नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय? माझ्या या विधानानंतर उद्धव ठाकरेंची माफिया सेना लगेच बोंबाबोंब करेल. मला आठवतंय ११ नोव्हेंबर २०२० रोजी असाच प्रश्न विचारला होता. उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईकचे संबंध काय? त्यावेळी सुद्धा मी सांगितलं होतं की, उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईकचे जमिनी व्यवहाराचे संबंध आहेत," असं आरोप सोमय्यांनी केला आहे.

"आज माझा प्रश्न आहे की उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीचे संबंध काय? ठाकरे यांनी स्वतःच याबद्दल सांगितलं, तर मी असो, ईडी असो वा इतर संस्था त्यांना जास्त मेहनत करावी लागणार नाही. १९ बंगले लपवण्याचा खूप प्रयत्न त्यांनी केला, शेवटी बाहेर आलंच. २०१९ मध्ये रश्मी ठाकरे म्हणतात १९ बंगले माझे आहेत. २०२१ मध्ये रश्मी ठाकरे म्हणतात की, तिथे बंगले नाहीत आणि नव्हते. अशाच पद्धतीचा श्रीधर पाटणकर यांचा किस्सा आहे."

"श्रीधर पाटणकर आणि रश्मी ठाकरे, पाटणकर आणि आदित्य ठाकरे यांचे आर्थिक व्यवहार व भागीदारी याबद्दल उद्धव ठाकरे बोलणार का? मुख्यमंत्री परिवाराला माझी विनंती आहे की, त्यांचे जे आर्थिक व्यवहार आहेत. शेल कंपन्यातून पैसे घेतले. मनी लाँडरिंग केलं आहे. श्रीधर पाटणकरही त्यात सहभागी आहेत, ही माहिती तुम्ही देणार की, किरीट सोमय्यांनाच द्यावी लागणार," असं सोमय्या म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in