सांगली: संभाजी भिडे संस्थापक असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेत उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. या संघटनेचे कार्यवाह असलेले आणि भिडे गुरुजींंचे उजवा हात असलेले नितीन चौगुले यांनीच ‘शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’ या संघटनेची स्थापना केल्याचे रविवारी धारकऱ्यांच्या मेळाव्यात जाहीर केले.
शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी नुकतीच नितीन चौगुले यांची संघटनेतून हकालपट्टी केली होती. त्यानंतर चौगुले यांनी भिडे गुरुजींना अनेकदा भेट मागून आपली बाजू स्पष्ट करण्याबाबत विनंती केली होती. पण बरेच प्रयत्न करूनही त्यांना भिडे गुरुजी यांच्याशी संपर्क साधू दिला जात नाही हे पाहून शेकडो धारकऱ्यांच्या उपस्थितीत शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेची स्थापना करीत असल्याचे घोषित केले.
संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटेनेत मागील काही दिवसांपासून कुरबुरी सुरु होत्या. तसंच नितीन चौगुले यांच्याविषयी काही तक्रारी देखील भिडे गुरुजींपर्यंत करण्यात आल्या होत्या. त्यामुळे संभाजी भिडे यांनी नितीन चौगुले यांच्यात काही दिवसापासून दुरावा निर्माण झाल्या आहेत. अखेर रविवारी सांगली येथे आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन नितीन चौगुलेंनी आपली नवी संघटना सुरु केली. याबाबत नितीन चौगुले म्हणाले की, ‘स्वत:च्या फायद्यासाठी भिडे गुरुजींच्या काही सहकाऱ्यांनी मला बदनाम केलं. मला भिडे गुरुजींबद्दल कायम आदर आहे. मी त्यांच्याकडे भेटीसाठी वेळही मागितली होती. मात्र, गेल्या अनेक दिवसात मला भेटीची वेळ देण्यात आलेली नाही.’ असं चौगुले म्हणाले. शिवप्रतिष्ठानमध्ये ज्या प्रकारे आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारावर काम करत गड किल्ल्यांचे संवर्धन करत होतो. तसंच काम या संघटनेत देखील केलं जाईल असंही चौगुले यांनी म्हटलं आहे.
ही बातमी पाहा: शिवजयंतीला संभाजीराजेंना संताप अनावर, म्हणाले…
सांगली येथे मेळावा घेऊन नितीन चौगुले यांनी नव्या संघटनेच्या नावाची घोषणा करताना काही गंभीर आरोप देखील केले. ‘वाळू तस्कर, तडीपार असणारे, लॉटरीवाले असे काही लोक हे गुरुजींना अधिकाऱ्यांकडे आणि राजकीय नेत्यांकडे घेऊन जातात आणि आपली अवैध कामं करुन घेतात.’
दरम्यान, भिडे गुरुजींच्या शिव प्रतिष्ठानमध्ये फूट पडल्यामुळे आता एकूणच या सगळ्याचा सांगली जिल्ह्यात नेमका काय परिणाम होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.