राहुल कनाल IT च्या रडारवर; दिशा सालियान प्रकरणाशी संबंध जोडत नितेश राणेंची शिवसेनेवर टीका
राज्यात आयकर विभागाने पुन्हा एकदा शिवसेना नेत्यांशी जवळीक असणाऱ्या व्यक्तींवर छापेमारी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आज झालेल्या कारवाईत सर्वात महत्वाचं नाव समोर येतंय ते म्हणजे राहुल कनाल. राहुल कनाल हे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. आयकर विभागाच्या या धाडसत्रानंतर भाजप आमदार नितेश राणेंनी या कारवाईचा संबंध थेट दिशा सालियान प्रकरणाशी जोडत शिवसेनेवर निशाणा […]
ADVERTISEMENT

राज्यात आयकर विभागाने पुन्हा एकदा शिवसेना नेत्यांशी जवळीक असणाऱ्या व्यक्तींवर छापेमारी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आज झालेल्या कारवाईत सर्वात महत्वाचं नाव समोर येतंय ते म्हणजे राहुल कनाल. राहुल कनाल हे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. आयकर विभागाच्या या धाडसत्रानंतर भाजप आमदार नितेश राणेंनी या कारवाईचा संबंध थेट दिशा सालियान प्रकरणाशी जोडत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
राहुल कनाल याच्यावरच आज आयकर विभागाच्या धाडी कशा पडल्या, त्याच्याकडे इतका पैसा आला कुठून? याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी द्यायला हवं. मला यापुढे जाऊन असं म्हणायचं आहे की दिशा सालियान आणि सुशांतसिंह राजपूत यांच्यासोबत ज्या काही घटना घडल्या त्याच्यात राहुल कनालचा हात तर नव्हता ना? ८ आणि १३ जून २०२० ला राहुल कनाल कुठे आणि कोणासोबत होता हे केंद्रीय यंत्रणांनी तपासावं. यासाठी त्याचं कॉल रेकॉर्ड, मोबाईल टॉवर लोकेश तपासलं तर अनेक गोष्टी समोर येतील असं नितेश राणेंनी सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
दिशा सालियान प्रकरणात केलेल्या वक्तव्यांवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांची काही दिवसांपूर्वी मालवणी पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. राज्य महिला आयोगाने दिशा सालियानच्या पालकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांना चौकशी करुन गुन्हा दाखल करायचे आदेश दिले होते. यानंतरही नितेश राणेंनी पुन्हा एकदा दिशा सालियान प्रकरणाचा संबंध शिवसेना नेत्यांशी जोडल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
शिवसेनेवर टीका करताना नितेश राणेंनी आज महाराष्ट्र विकणाऱ्या लोकांसमोर हे राज्य कधीच झुकणार नाही असं सांगितलं. आज झालेली छापेमारी ही केंद्रीय यंत्रणाच्या तपासाचा भाग आहे. राहुल कनालचे वडील दातांचे डॉक्टर आहेत, मग त्याच्याच घरी छापेमारी का झाली? राहुल कनाल हर्बल हुक्का म्हणून भाईजान नावाचं एक हुक्का पार्लर चालवतो. वांद्रे परिसरात त्याचं कॅफे बांद्रा नावाचं एक रेस्टॉरंट आहे. या दोघांचंही स्ट्रक्चर अनधिकृत असल्याचं नितेश राणे म्हणाले. कोरोना काळात महापालिकेचे जे काही टेंडर निघाले त्याच्यात राहुल कनालचा हस्तक्षेप असायचा असा अनेकांना संशय असल्याचंही नितेश राणेंनी सांगितलं.