Rajya Sabha Election : ‘आमचं नशीब की, संजय राऊत काठावर वाचले; भुजबळांनी बोलून दाखवली भीती
सहा जागांसाठी झालेल्या राज्यसभा निवडणुकीचे निकाल खरंच अभ्यासाचा विषय बनले आहेत. चारही उमेदवार विजयी होतील, असा आत्मविश्वास असलेल्या महाविकास आघाडीला प्रत्यक्ष निकालानंतर झटका बसला. शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाल्यानं बरीच चर्चा रंगली आहे. या निकालाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीकडून प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), इम्रान प्रतापगडी (काँग्रेस), संजय राऊत आणि […]
ADVERTISEMENT

सहा जागांसाठी झालेल्या राज्यसभा निवडणुकीचे निकाल खरंच अभ्यासाचा विषय बनले आहेत. चारही उमेदवार विजयी होतील, असा आत्मविश्वास असलेल्या महाविकास आघाडीला प्रत्यक्ष निकालानंतर झटका बसला. शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाल्यानं बरीच चर्चा रंगली आहे. या निकालाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही भाष्य केलं आहे.
महाविकास आघाडीकडून प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), इम्रान प्रतापगडी (काँग्रेस), संजय राऊत आणि संजय पवार (शिवसेना) यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून केंद्रीय मंत्री पियूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी उमेदवारी देण्यात आली होती.
“संजय राऊत ब्रम्हदेव आहेत का?”; अपक्ष आमदारांचा संजय राऊतांवर पलटवार
या निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्यानं महाविकास आघाडीला झटका बसला आहे. या निकालानंतर शिवसेनेनं काही अपक्षांची नावं घेत दगाबाजी केल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या आरोपाबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले, “अपक्षांना दुखावण्यापेक्षा पुढच्या कामासाठी आणखी जवळ कसं करता येईल, यासाठी प्रयत्न करायला हवं असं मला वाटतं,” अशी भूमिका भुजबळांनी सध्या सुरू असलेल्या वादंगावर मांडली.
संजय पवार यांना अपेक्षित मतं न मिळाल्याने महाविकास आघाडीची मतं भाजपकडे गेल्याचं दिसून आलं. यावर भुजबळ यांनी त्यांच्या मनातील भीती बोलून दाखवली. “संजय राऊत काठावर वाचले. नाहीतर उलट झालं असतं. संजय राऊत मागे राहिले आणि संजय पवार निवडून आले, असं घडलं असतं. पण हे आमचं नशीब,” असं भुजबळ म्हणाले.
‘शब्द दिला आणि दगाबाजी केली’, संजय राऊतांनी ‘त्या’ आमदारांची थेट नावं सांगून खळबळ उडवली!
“आम्ही आमच्या लोकांना सर्व गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. मी बैठकीत आमच्या आमदारांना मी स्वतः सांगितलं होतं. अहमद पटेल यांचं उदाहरण आम्ही त्यावेळी दिलं होतं.”
“आपला जो प्रतिनिधी आहे, त्याला आपलं मत दाखवायचं आहे. पण ते दुसऱ्यांना दिसता कामा नये. अपक्षांनी आपलं मत दुसऱ्यांना दाखवायचं नाही. कागदावर कोणत्याही प्रकारची खूण, एखादं टिंब, वेडीवाकडी रेष, असं काहीही असता कामा नये असं आम्ही सांगितलं होतं,” असं छगन भुजबळ प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
“मला असं वाटतं की महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना समजावून सांगितलेलं होतं. पण या चुका कशा काय झाल्या, हे त्यांचे नेते पाहतील,” असं मत भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केलं.