पत्रकार, शिवसेना खासदार, मविआचे शिल्पकार असलेल्या संजय राऊतांचा राजकीय प्रवास आहे तरी कसा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. पत्रा चाळ प्रकरणातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केली. तेव्हापासून संजय राऊत हे राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. तसं तर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच संजय राऊत हे रोज त्यांच्या विविधी प्रतिक्रियांमुळे चर्चेत होते. अत्यंत रोखठोक आणि शिवसेनेची मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेल्या संजय राऊतांचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे आपण जाणून घेणार आहोत.

ADVERTISEMENT

संजय राऊत यांच्याबाबत जाणून घेऊया सविस्तर

संजय राऊत यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९६१ ला अलिबाग यामध्ये झाला. त्यांनी मुंबईतल्या वडाळा या ठिकाणी असलेल्या आंबेडकर महाविद्यालयातून बी कॉमची पदवी घेतली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत यांनी काम केलं आहे. लोकप्रभा या साप्ताहिकासाठी संजय राऊत लिहित असत. त्यांची ती शैली बाळासाहेब ठाकरेंना भावली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी संजय राऊत यांना बोलावून घेतलं. तेव्हापासून संजय राऊत शिवसेनेत आले. सामना या शिवसेनेशी संबंधित असलेल्या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादकही झाले.

हे वाचलं का?

संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीची सुरूवात ही इंडियन एक्स्प्रेस समूहातून केली. लोकप्रभासाठी ते क्राईम रिपोर्टर म्हणून काम कर होते. १९९३ मध्ये सामना चे कार्यकारी संपादक झाले. बाळासाहेब ठाकरेंच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी संजय राऊत हे एक मानले जातात. संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. मात्र त्यांनी आजवर एकही निवडणूक लढवलेली नाही. आपली रोखठोक लेखणी आणि खास लेखनशैली यासाठी ते ओळखले जातात. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अशा तिन्ही पिढ्यांशी त्यांनी व्यवस्थित जुळवून घेतलं आहे हे महाराष्ट्राने वारंवार पाहिलं आहे.

सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी वारंवार सरकारवर प्रहार केले आहेत. मग ते यूपीएचं सरकार असो किंवा आताचं मोदी सरकार असो. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे लिहिण्याची लेखनशैली त्यांनी आत्मसात केली आहे. त्यामुळेच त्यांचं शिवसेनेतलं स्थान वर्षागणिक बळकट होत गेल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

ADVERTISEMENT

२०१९ मध्ये महाविकास आघाडीचे शिल्पकार ठरले संजय राऊत

२०१९ च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जे निकाल लागले त्यात महायुतीला १६० हून अधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र सर्व काही समसमान वाटप ठरलं आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपदही भाजपने अडीच अडीच वर्षे वाटून घ्यावं असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. तसंच मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार ही भूमिका त्यांनी लावून धरली. या सगळ्यातून महाविकास आघाडीचा जन्म झाला. महाविकास आघाडीचे दोन प्रमुख शिल्पकार मानले जातात. एक आहेत शरद पवार तर दुसरे आहेत ते संजय राऊत. या दोघांमुळेच महाऱाष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं.

ADVERTISEMENT

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा आहे. एवढंच नाही तर शिवसेनेवर जेव्हा जेव्हा संकट आलं किंवा जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे अडचणीत येत आहेत असं वाटलं तेव्हा विरोधकांवर तुटून पडण्याचं काम आणि ती जबाबदारीही संजय राऊत यांनी नेटाने सांभाळली. संजय राऊत यांची ओळख भाषणांच्या आधी, शिवसेनेतल्या मेळाव्यांमध्येही मुलुखमैदान तोफ अशीच केली जाऊ लागली. याचं कारण ते मांडत असलेली रोखठोक भूमिका. तसंच सामनामध्ये लिहित असलेले अग्रलेख. सामनातले अग्रलेख आणि त्याचे मथळे हे चर्चेचा विषय ठरत असतात. ते देण्यात संजय राऊत यांचा हातखंडा आहे.

बाळासाहेब ठाकरे यांची शैली संजय राऊत यांनी केली आत्मसात

बाळासाहेब ठाकरे यांची लेखनशैली संजय राऊत यांनी सामनामध्ये काम करायला लागल्यापासून आत्मसात केली आहे. बाळासाहेब ठाकरे हे फटकेबाजी करत असत, तसंच आपल्या लिखाणातून अनेकदा ते विरोधकांचा शब्दाने कोथळा काढत असत, अगदी तशीच शैली संजय राऊत यांनी आत्मसात केली आहे. त्यांच्या याच शैलीने ते बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक झाले. तसंच पुढच्या दोन पिढ्यांशीही त्यांनी जमवून घेतलं.

महाविकास आघाडी सरकारच्या जन्मापासून शिंदे फडणवीस सरकार येईपर्यंत संजय राऊत चर्चेत

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा होताच. मात्र या सरकारच्या काळात ते रोज चर्चेत राहिले. कारण मुद्दा कुठलाही असो संजय राऊत त्यावर बोलणार म्हणजे बोलणारच हे माहित असे. त्यामुळेच त्यांची प्रतिक्रिया ते दिल्लीत असो किंवा मुंबईत रोजच घेतली जायची. भाजपवर आणि खासकरून मोदी सरकारवर तुटून पडण्यात त्यांची शैली वेगळीच होती. त्यामुळेच ते मागचं अडीच वर्षे ते चर्चेत राहिले. एवढंच नाही तर जेव्हा शिवसेनेत बंडखोरी झाली त्यावेळीही संजय राऊत हे चर्चेत राहिले. बंडखोर आमदारांविषयी त्यांनी वादग्रस्त वक्तव्यं केली त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यांची चर्चा झाली. तसंच बंडखोर आमदारांच्या नजरेत ते व्हिलनही ठरले.

बंडखोर आमदारांच्या नजरेतले व्हिलन ठरले संजय राऊत

बंडखोर आमदारांनी संजय राऊत यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनात त्यांच्यावर खास शैलीत निशाणा साधला. आम्हाला ४० रेडे म्हटलं गेलं. आता माँ कामाख्याने कुणाचा बळी घेतला? माँ कामाख्या म्हणाली जो बोललाय तो रेडा आपल्याला नको. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना टोला लगावला होता. ४० रेडे निघून गेले आहेत अशी वादग्रस्त टीका संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर केली होती. त्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

त्यानंतरही संजय राऊत चर्चेत राहिले. मागच्याच आठवड्यात संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. ती मुलाखतही चांगलीच चर्चेत राहिली. पक्षात झालेली बंडखोरी, महाविकास आघाडीचा प्रयोग, तसंच काय काय घडलं अडीच वर्षात या सगळ्या गोष्टी त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारल्या होत्या. या मुलाखतीवर संमिश्र प्रतिक्रियाही राजकीय पटलावर उमटल्या.

संजय राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांशी खास जवळीक

संजय राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांशी खास जवळीक राहिली आहे. हा मुद्दा बंडखोर आमदारांनीही उपस्थित केला होता. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून शिवसेना संपवली असा आरोप बंडखोर आमदारांनी केला होता. मात्र शऱद पवार यांच्याशी संजय राऊत यांची खास जवळीक असल्याचं पाहण्यास मिळालं.

2008 मध्ये एक प्रयत्न झाला होता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून हा प्रयत्न करण्यात आला होता. शिवसेनेनं भाजपची साथ सोडायची आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसची साथ सोडून एकत्र यायचं, असा प्रयोग करता येईल का, याची चाचपणी त्यांनी केली. हा प्रयोग करण्यामागचा विचार संजय राऊत यांचाच होता. पण, त्या प्रयोगाचं पुढं काही होऊ शकलं नाही. मात्र, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवारांसोबतची त्यांची मैत्री पुन्हा आधोरेखित झाली. भाजपने तर त्यांच्यावर ही टीकाही केली की संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत की राष्ट्रवादीचे तेच कळत नाही. राज ठाकरेंनीही अशाच आशयाची टीका संजय राऊत यांच्यावर टीका केली होती.

आता पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. संजय राऊत हे मी काहीही झालं तरीही शिवसेनेच राहणार आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही हे सांगत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सतत चर्चेत राहिलेले संजय राऊत यांना आता ईडीने अटक केली आहे.मात्र आता पुढे काय काय होणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT