आम्ही कधी तुमच्या कुटुंबीयांच्या भानगडी काढण्याचा प्रयत्न केलाय?: मुख्यमंत्री
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे खूपच संतापले असल्याचं दिसून आलं. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी यावरुन भाजपला खडे बोल सुनावले आहेत. सत्ता हवी आहे यासाठीच कुटुंबीयांना त्रास दिला जात आहे असे आरोपच यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपवर केले आहेत. ‘कुटुंबाची का बदनामी करताय. आम्ही कधी तुमच्या कुटुंबीयांची बदनामी […]
ADVERTISEMENT
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे खूपच संतापले असल्याचं दिसून आलं. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी यावरुन भाजपला खडे बोल सुनावले आहेत. सत्ता हवी आहे यासाठीच कुटुंबीयांना त्रास दिला जात आहे असे आरोपच यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपवर केले आहेत.
ADVERTISEMENT
‘कुटुंबाची का बदनामी करताय. आम्ही कधी तुमच्या कुटुंबीयांची बदनामी केलीय? कधी तुमच्या कुटुंबीयांच्या काही भानगडी असतील आहे असं म्हणत नाही… पण तसं काही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे? मी येतो तुमच्या बरोबर.. मला टाका तुरुंगात.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपला संताप सभागृहातच व्यक्त केला.
पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय-काय म्हणाले:
हे वाचलं का?
‘तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करुन, तुम्ही त्या संस्थांचा दुरुपयोग करुन.. म्हणजे महाभारतात शिखंडीचा उल्लेख आहे. तो शिखंडी कोण होता हे मी सांगण्याची गरज नाही. लढण्याची ताकद नाही मग शिखंडीला मध्ये टाकलं. आता कळतच नाही शिखंडी कोण आणि मर्द कोण आहे. कोण कोणाच्या आडून लढतोय. याला मर्दपणा नाही म्हणत. नामर्दपणा म्हणतात.’
‘हे यंत्रणा वापरायच्या, कुटुंबीयांना बदनाम करायचं. धाडी टाकायचा. हे काय आहे? मागे नितीन गडकरी बोलले होते. की, आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो. म्हणजे जसं ईडीचं काम मनी लाँड्रिंग असतं तुमच्याकडे काय ह्यूमन लाँड्रिंगचं काम आहे का?’
ADVERTISEMENT
‘म्हणजे बरबटलेला माणूस घ्यायचा त्याला म्हैसूर सँडल सोप लावायचा आणि छान अत्तर वैगरे लावून दाखवयचा हा बघा कसा झाला सुंदर. हे ह्यूमन लाँड्रिंग तुम्ही सुरु केलेलं आहे का?’
ADVERTISEMENT
‘हे असं समजू नका की, कोण बघत नाहीए, कोणाच्या लक्षात येत नाहीए. कारण जसं आपल्या पोरांचे चाळे, थेरं बघू न शकणारा त्यांचा पिता आंधळा ध्रृतराष्ट्र होता तसा हा ध्रृतराष्ट्र नाहीए. हा छत्रपतींचा लढणारा महाराष्ट्र आहे.’
‘या अशा वाटेला जाऊ नका यातून कोणाचं काहीही होणार नाही. कोणाचंच भलं होणार नाही. म्हणून मला वाटतं की, हे सगळं जे काही चाललं आहे ना.. मी घाबरलोय म्हणून नाही सांगत.’
‘खरं म्हणजे ही संधी आहे. अनेकांची इथे येण्याची स्वप्न असतात. आपल्याला संधी मिळालेली आहे तर त्या संधीचं सोनं करायचं की माती करायची हे ठरवा. काय असतील ना मतभेद तर सांगा, सूचना असतील सांगा. कोण आमच्यात गुन्हेगार असेल जरुर सांगा. पण उगाच काही तरी बदनामी करु नका.’
‘तुम्हाला सत्ता पाहिजे ना.. म्हणून तुम्ही हे ताण-तणाव कुटुंबीयांना तणावाखाली ठेवायचं, मग याला अटक करायची.. त्याला बेलच मिळू द्यायचा नाही. हे सगळं सुरु आहे ना. चला मग मी या सगळ्यांच्या समोर सांगतो मी तुम्हाला सत्ता पाहिजे ना. तर उगाच तुम्ही काही गोष्टी करु नका. पेनड्राईव्ह गोळा करायला जाऊ नका… मी म्हणतो मी तुमच्यासोबत येतो.. मी येतो सोबत.. सत्तेसाठी नाही येत. तुम्ही आता जे चाळे केलेले आहेत. सगळे माझटाच. या टाचेला काही मी घाबरत नाही.’
‘मी तुमच्या बरोबर येतो. टाका मला तुरुंगात. माझ्यावर यायचं ना.. या ना मग.. कुटुंबाची का बदनामी करताय. आम्ही कधी तुमच्या कुटुंबीयांची बदनामी केलीय? कधी तुमच्या कुटुंबीयांच्या काही भानगडी असतील आहे असं म्हणत नाही… पण तसं काही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे? मी येतो तुमच्या बरोबर.. मला टाका तुरुंगात.’
‘एवढाच का जर तुमचा जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगात. मी तयार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या. थोडसं मग मी भावनिक बोलतो. तुरुंग कोणता आर्थर रोड, तिहार वैगरे नाही. जसं बाबरी मशिदीच्या इथे राम जन्मभूमी होती तसं जर का कृष्ण जन्मभूमीचा शोध लागला असेल तर तिथे जे तुरुंग होतं त्या तुरुंगात मला टाका.’
‘मी कृष्णाचा अवतार नाहीए. मी कदाचित देवकीच्या पहिल्या सात मुलांपैकी असेन पण त्या तुरुंगात मी कृष्ण जन्माची वाट बघेन. पण मी जसं सांगतोय की, मी कृष्ण नाहीए. तसं तुम्हाला सांगता आलं पाहिजे की, तुम्ही कंस नाही आहात.’
‘तुम्ही म्हणता बाळासाहेबांना काय उत्तर देणार.. मग मी विचारतोय. बाळासाहेबांनी तुमच्या ज्या नेत्यांना वाचवलं ते बाळासाहेबांना काय उत्तर देणार? त्यावेळेला सगळे सांगत होते.. देशभरातून हे नको.. हे नको.. तेव्हा बाळासाहेब एकटे त्यांच्यामागे उभे राहिले होते. हे होता कामा नये.. हे तिकडेच राहिले पाहिजे. काय उत्तर देणार?’
‘2014 मध्ये तुम्ही युती तोडलीत. तेव्हाही मी हिंदू होतो. आज जर का तुम्हाला वाटत असेल की मी हिंदुत्वावरुन फारकत घेतली असेल तर मी आजही हिंदूच आहे आणि मी काही लपवलेलं नाही. हे माझ्या सर्व सहकाऱ्यांना माहिती आहे.’
‘तुरुंगात टाकणार असाल तर सगळी जबाबदारी मी घेतो. माझ्या शिवसैनिकांची जबाबदारी देखील मी घेतो. सगळ्यांच्या वतीने पाप स्वीकारायला मी तयार आहे. मला टाका तुरुंगात पण जे शिवसैनिक बाकी सगळ्यांनी जेव्हा शेपट्या घातल्या होत्या जेव्हा 92-93 साली जिवावर उदार होऊन जी मुंबई वाचवली त्या शिवसैनिकांना छळू नका.’
‘सकाळचा प्रयोग यशस्वी झाला असता तर मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते’, CM ठाकरेंचा थेट वार
‘काही जण यंत्रणांचे दलाल आहेत की प्रवक्ते आहेत? अनिल देशमुख तुरुंगात जाणार.. गेले तुरुंगात.. नवाब मलिक तुरुंगात जाणार.. आता अनिल परब तुरुंगात जाणार.. उद्या किशोरी पेडणेकर तुरुंगात टाकणार. हे काय आहे? निदान इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित तरी केली होती. ही अघोषित आणीबाणी.. एवढा डरपोकपणा त्यांच्यात नव्हता. चांगली-वाईट हा वेगळा प्रश्न. पण एक धारिष्ट लागतं ते त्यांच्यात होतं.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर एकच हल्ला चढवला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT