जयेश खरे चंद्रा गाऊन व्हायरल झाला अन् थेट पोहोचला अजय-अतुल यांच्या स्टुडीओत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : ‘महाराष्ट्राचे शाहीर’ म्हणून ज्यांची ख्याती होती त्या शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष ३ सप्टेंबर रोजी सुरु झाले असून त्यांच्या जीवनावर येत असलेल्या ‘महारष्ट्र शाहीर’ या चित्रपटाबद्दल उभ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली आहे. हा चित्रपटाबद्दल एकेक विलक्षण गोष्टी पुढे आल्या आणि ही उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’बद्दल आणखी एक नवीन आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे या चित्रपटातील छोट्या शाहीर साबळेना आवाज देण्यासाठी निर्माते, संगीतकारांनी चक्क समाज माध्यमांवर ‘चंद्रा’ गाण्याने लोकप्रिय झालेल्या जयेश खरेला करारबद्ध केले आहे. हे गीत आजचे आघाडीचे गीतकार गुरू ठाकूर यांनी लिहिले आहे. अजय अतुल या संगीतकार जोडीने या सिनेमाला संगीत दिलं आहे.

ADVERTISEMENT

हिंदी आणि मराठी चित्रपसृष्टीतील प्रख्यात संगीतकार अजय – अतुल यांनी यशाच्या आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. युट्यूब वरून चंद्रा गाणे गाऊन नेवाशाजवळच्या एका छोट्या गावातील जयेश खरेला अजय-अतुल यांनी त्यांच्या आगामी ‘ महाराष्ट्र शाहीर ‘ या चित्रपटात गायची संधी दिली आहे. त्यामुळे सहावितील जयेश एका रात्रीत हिरो झाला आहे.

जयेश खरेचं चंद्रा व्हायरल झालं अन् अजय-अतुल यांनी घेतली दखल

जयेश खरे हा शिर्डीजवळील राहुरीपासून ३० किमीवर असलेल्या एका गावात राहणारा गरीब घरातील मुलगा. त्याच्या खड्या आवाजातील ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ हे त्याने शाळेच्या गणवेशात गायलेले गाणे सध्या युटयूबवरून उभ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. हे गाणे जेव्हा ‘महाराष्ट्र शाहीर’चे संगीतकार अजय-अतुल यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी मनोमन याच्याकडूनच शाहिरांच्या लहानपणीचे गाणे गाऊन घ्यायचे ठरवले. त्याचा शोध घेतला गेला. त्याला मुंबईला आणून एका उत्तम हॉटेलमध्ये ठेवले गेले. त्याच्याबरोबर अजय-अतुल यांनी दोन दिवस तालीम केली आणि त्याच्या आवाजातील गाणे गाऊन घेतले.

हे वाचलं का?

“हे गाणे त्याने बेफाम गायले आहे. अजय-अतुल यांनी त्याच्यावर मेहनत घेऊन त्याच्यातील गुणवत्तेला १००टक्के वाव देत त्याच्याकडून हे गाणे गाऊन घेतले आहे. हे गाणे यशराज स्टुडीओमध्ये ध्वनिमुद्रित केले गेले आहे. या स्टुडीओची भव्यता पाहून हा मुलगा दिपून गेला होता. पण त्याने या गाण्याला जो न्याय दिला आहे, त्याला तोड नाही. अर्थात हे सर्व श्रेय अजय-अतुल यांचे आहे. ते शाहिरांच्या लहानपणीच्या गाण्यासाठी गायकाच्या शोधात असतानाच हा व्हायरल झालेला व्हीडीओ त्यांच्यासमोर आला आणि त्यांनी गुणवत्ता हेरत त्याला परीसस्पर्श केला,” चित्रपटाचे दिग्दर्शक आणि शाहीर साबळे यांची नातू केदार शिंदे म्हणाले.

जयेश खरेचे वडील ऑर्केस्ट्रामध्ये काम करतात

जयेश खरे हा अगदीच सर्वसामान्य घरातील सहावीतील मुलगा आहे. त्याचे वडील एका ऑर्केस्ट्रामध्ये कि-बोर्ड वाजवतात. वर्षातील केवळ सहा महिनेच त्यांना ऑर्केस्ट्रामध्ये काम मिळते. मग उर्वरित दिवस शेतमजुरी करून ते घर आणि जयेशच्या शिक्षणाचा खर्च उचलतात. जयेश चार वर्षाचा असतानाच त्याच्या गाण्याच्या या अंगाचा शोध त्याच्या वडिलांना लागला आणि त्यांनी त्याला प्रोत्साहन दिले. आता मात्र जयेश घराघरात पोहोचला असून ‘महाराष्ट्र शाहीर’मधील आपल्या आवाजाने तो लवकरच ग्लॅमरस दुनियेतील आश्वासक चेहरा म्हणून पुढे येणार आहे.

ADVERTISEMENT

‘महाराष्ट्र शाहीर’च्या निमित्तानं जुळून आला अजब योग

‘महाराष्ट्र शाहीर’ची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाने अनेक योग जुळवून आणले आहेत. आजोबांवरील चित्रपटाचे दिग्दर्शन नातू करतो आहे, हे चित्रपटसृष्टीतील कदाचित पहिलेच उदाहरण असेल. त्यानंतर आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट या चित्रपटाने प्रस्थापित केला आहे आणि तो म्हणजे शाहिरांच्या पत्नीच्या भूमिकेत शाहिरांची पणती म्हणजे केदारची मुलगी सना दिसणार आहे. हासुद्धा दुर्मिळ योग आहे. चित्रपटाशी संबंधित अशा एकेक आश्चर्यकारक गोष्टी समोर येत असतानाच जयेश खरेच्या माध्यमातून एक नवा अभूतपूर्व गोष्ट या चित्रपटाने प्रस्थापित केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील हे कदाचित एकमेव उदाहरण असेल.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र शाहीर’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची असून चित्रपटाचे निर्माते आहेत संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे. या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत आहे तर चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. चित्रपटात शाहिरांच्या इतर समकालीन आणि महत्त्वाच्या व्यक्तिरेखा कोण साकारणार अशा प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने पुढे येतील.

‘महाराष्ट्राचे शाहीर’ अशी ज्यांची ख्याती होती त्या शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष ३ सप्टेंबर २०२२ ते ३ सप्टेंबर २०२३दरम्यान साजरे होत आहे. शाहिरांच्या जीवनावरील हा चरित्रपट एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT