फडणवीस हे ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारीत होते काय? -शिवसेना
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दिनी झालेल्या सभांवर शिवसेनेनं टीकेची तोफ डागली आहे. मनसेला भाजपचं उपवस्त्र म्हणत शिवसेनेनं देवेंद्र फडणवीसांना बाबरी पाडल्याबद्दल केलेल्या दाव्यावरूनही खोचक टोला लगावला आहे. शिवसेनेनं सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या सभांतील भूमिकांवर भाष्य केलं आहे. शिवसेना म्हणते… “महाराष्ट्र दिनी भाजप व त्यांच्या […]
ADVERTISEMENT
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दिनी झालेल्या सभांवर शिवसेनेनं टीकेची तोफ डागली आहे. मनसेला भाजपचं उपवस्त्र म्हणत शिवसेनेनं देवेंद्र फडणवीसांना बाबरी पाडल्याबद्दल केलेल्या दाव्यावरूनही खोचक टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेनं सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या सभांतील भूमिकांवर भाष्य केलं आहे.
शिवसेना म्हणते…
“महाराष्ट्र दिनी भाजप व त्यांच्या उपवस्त्र पक्षाने सभा घेतल्या. दिशादर्शक असे प्रेरक विचार त्या सभेतून राज्याला मिळतील असं वाटलं होतं, पण मुख्य पक्ष व त्यांच्या उपवस्त्रानं लाथा झाडण्याशिवाय काहीच केलं नाही. त्यामुळे गदाधारी कोण आणि ‘गधा’धारी कोण हे महाराष्ट्र दिनी स्पष्ट झालं. भाजपच्या बुस्टर डोस सभेत देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेवर तुटून पडले, तर संभाजीनगरच्या सभेत त्यांचे उपवस्त्र शरद पवारांवर तुटून पडलं. हे ठरवून झालं. त्यातून महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जनतेला काय मिळालं?”
हे वाचलं का?
“उपवस्त्राला बुस्टर देण्याचं काम मुंबईतूनच सुरू होतं. पण भाजपससुद्धा बुस्टर डोसची गरज आहे. बाबरीचा ढाचा या विषयावर आपले विरोधी पक्षनेते इतके बोलले की, जणू देशात आता कोणतेच विषय शिल्लक राहिलेले नाहीत. बाबरी कोसळली आहे व श्रीरामाचं मंदिर उभं राहिलं आहे ही समस्त हिंदू जनांसाठी अभिमानाची बाब आहे, पण आता देशात सगळ्यांना सुखी ठेवणारे ‘रामराज्य’ आणायला हवं असं या लोकांना का वाटत नाही?”
“फडणवीस म्हणतात, ‘बाबरी ढांचा पाडताना एकही शिवसेना नेता अयोध्येत नव्हता. तो ढांचा पाडला तेव्हा तुम्ही कोठे होता? मी अभिमानाने सांगतो, होय, मी तो ढांचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होतो!’ आता फडणवीस म्हणतात, म्हणजे तेथे ते असणारच, पण सीबीआयच्या विशेष न्यायालयातील आरोपपत्रात त्यांचं नाव कोठेच दिसत नाही. शिवसेनेचे अनेक नेते व शिवसैनिकांची नावे बाबरी प्रकरणाच्या आरोपपत्रात आहेत. त्यामुळे फडणवीस हे ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारीत होते काय? याचा गुप्त तपास नव्याने करावा लागेल.”
“बाबरी ढांचा कोणी पाडला याबाबत अधिक माहिती महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांच्याकडून घ्यायला हवी. भंडारी आज हयात नाहीत, पण ६ डिसेंबरला दुपारी चार वाजताच भंडारी यांनी भाजपच्या वतीने स्पष्ट केलं की, ‘‘बाबरी पाडण्यात भाजपचा हात नसून हे कार्य शिवसैनिकांनी केलं असावं.’’ भंडारी यांचं हे वक्तव्य फडणवीसांवर अन्याय करणारं होतं. फडणवीस हे त्या उसळलेल्या हिंदू जनसागरातून घुसून बाबरीच्या घुमटावर चढले व हातोडे मारीत राहिले याची नोंद इतिहासाला नसावी? हे आश्चर्यच आहे.”
ADVERTISEMENT
“मुख्य म्हणजे तेव्हाचे अयोध्या लढ्याचे सेनापती लालकृष्ण आडवाणी यांनीही ‘बाबरी आम्ही पाडली नाही. बाबरी पडल्याचे कळताच मला धक्का बसला. तो आमच्यासाठी काळा दिवस होता,’ असं स्पष्ट केलं होतं. त्या काळ्या दिवसासाठी भाजप आता श्रेय का घेत आहे? व त्यांच्या उपवस्त्रास अयोध्येत का पाठवत आहे? भाजपचे काही सांगता येत नाही. बाबरीचा ढांचा पाडला हे एक राष्ट्रीय कार्यच होते व त्याच्या श्रेयवादाची स्पर्धा इतक्या वर्षांनी करण्यात काय मतलब?”
ADVERTISEMENT
“पाकिस्तानात अमेरिकेचे कमांडो घुसले व त्यांनी ‘अल कायदा’चा ‘डॉन’ लादेन याला मारले तेव्हाही आम्ही तेथेच होतो, असे सांगायलाही हे लोक कमी करणार नाहीत. मुळात महाराष्ट्रात या दोन राजकीय पक्षांच्या सभांतून वेगळे काही मिळाले काय? संभाजीनगरात भाजपच्या उपवस्त्रानं सांगितलं, ‘मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढा, नाही तर आम्ही थांबणार नाही.’ उपवस्त्रांना आता उत्तर प्रदेशच्या प्रेमाचे जे अजीर्ण झाले आहे ते गमतीशीर आहे. आधी त्यांना उत्तर प्रदेश व तेथील लोक नजरेसमोर नको होते. हिंदी पट्टय़ातील लोक हिंदुस्थानात राहायलाच लायक नाहीत, असेच त्यांचे म्हणणे होते.”
“योगी आदित्यनाथ यांना कळत नाही. डोक्याचा तुळतुळीत गोटा केलेला एक माणूस भगवे कपडे घालून फिरतोय. हे किळसवाणे असल्याचे त्यांचं मत होतं. आता अचानक हा ‘गोटा’ त्यांना प्रिय झाला व हिंदी भाषिक मंडळींना चुचकारण्याचं काम सुरू झालं. हे मतपरिवर्तन झालं त्यामागे नक्की कोणता व्यवहार आहे ते पाहावं लागेल.”
“मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे हा राष्ट्रीय प्रश्न आहे व त्यावर केंद्र सरकारला एक धोरण आखावं लागेल. बेकायदेशीर काही होत असेल तर ते रोखणे हे राज्य सरकारचे काम आहे, पण भोंग्यांच्या प्रश्नावर भाजपच्या उपवस्त्रांना दोन सभा घ्याव्या लागतात, लोकांना भडकविण्याची भाषा करावी लागते. म्हणजे भाजपास वैफल्यानं ग्रासलं आहे व फक्त धार्मिक तणाव निर्माण करायचा आहे. हिंदू-मुसलमानांतील दंग्यांनी आजवर दोन्ही बाजूचे प्रचंड नुकसान झाले आहे.”
“संभाजीनगरपासून मुंबईपर्यंत शिवसेना हिंदुत्व रक्षणाची ढाल म्हणूनच वावरली आहे, पण या लढाईत भाजप व त्यांची आजची उपवस्त्रे कोठे होती? आता या मंडळींना हिंदू हिंदूंतच दंगली पेटवायच्या आहेत. मुंबईत मराठी माणसांत फूट पाडण्याचे प्रयत्न झाले, ते यशस्वी झाले नाहीत. आता हिंदूंनाच एकमेकांविरुद्ध मैदानात उतरवायचे हा कावा स्पष्ट दिसतो आहे. फडणवीस म्हणतात, ‘बाबरी आम्हीच (म्हणजे त्यांनी) पाडली. तुम्ही भोंग्यांनाही घाबरता.’ शिवसेनेनं घाबरण्याचा किंवा न घाबरण्याचा प्रश्न येतोच कोठे? लोक श्रीरामाचे भजन करतात. भाजपवाले आता ऊठसूट बाबराचे भजन करू लागले आहेत. हा बदल बरा नाही.”
“धमक्या व इशारे देण्यापेक्षा तुम्ही चीनला का व कसे घाबरताय त्यावर बोला. लडाखच्या हद्दीत चिनी सैन्य घुसल्यापासून कोणाची कशी हातभर फाटली आहे ते देशाने पाहिले आहे. बाबरी आम्हीच पाडली, असं सांगणाऱ्यांना देशात घुसलेल्या चिनी सैनिकांना बाहेर ढकलता येत नाही. चीननंही गलवान व्हॅलीत २३ भोंगे लावले आहेत व ते देशाला आव्हान देत आहेत की, ‘‘आम्ही येथून बाहेर पडणार नाही!’’ मग ते भोंगेही उतरवा व चिन्यांनाही हाकला. तरच तुम्ही हिमतीचे!”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT