कल्याणच्या Sanjal Gawande ची अंतराळ भरारी, अमेरिकेच्या खासगी यान बनवण्याच्या टीममध्ये मिळवलं स्थान
अंतराळ क्षेत्राविषयी जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्यासाठी तरूण-तरूणींचा कल वाढतो आहे. याच उत्सुकतेतून काही जण मग अंतराळ मोहिमेत सहभागी होण्याचा निश्चय करतात. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ही आहे की कल्याणच्या संजल गावंडे या मराठमोळ्या तरूणीने अमेरिकेमध्ये अंतराळात झेपावणारे न्यू शेफर्ड हे खासगी यान बनवणाऱ्या टीममध्ये स्थान मिळवलं आहे. संजल गावंडे ही तरूणी कल्याण पूर्व भागातली रहिवासी […]
ADVERTISEMENT

अंतराळ क्षेत्राविषयी जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्यासाठी तरूण-तरूणींचा कल वाढतो आहे. याच उत्सुकतेतून काही जण मग अंतराळ मोहिमेत सहभागी होण्याचा निश्चय करतात. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ही आहे की कल्याणच्या संजल गावंडे या मराठमोळ्या तरूणीने अमेरिकेमध्ये अंतराळात झेपावणारे न्यू शेफर्ड हे खासगी यान बनवणाऱ्या टीममध्ये स्थान मिळवलं आहे. संजल गावंडे ही तरूणी कल्याण पूर्व भागातली रहिवासी आहे. तिच्या या कामगिरीबद्दल तिचं खूप कौतुक होतं आहे.
संजल गावंडेने इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर विविध परीक्षा देऊन संजलने आता या उंचीवर झेप घेतली आहे. कल्याण पूर्वेच्या कोळसेवाडी भागात राहणाऱ्या संजलची आई सुरेखा गावंडे या एमटीएनएलमधील निवृत्त कर्मचारी आहे. तर तिचे वडील अशोक गावंडे हे केडीएमसीमधील निवृत्त कर्मचारी आहेत. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या संजलने दहावीपर्यंतचे शिक्षण मॉडेल हायस्कूलमध्ये, बारावीपर्यंतचं शिक्षण बिर्ला महावद्यालयात तर त्यापुढचे म्हणजे पदवीपर्यंतचे शिक्षण वाशी येथील फादर अग्नेल महाविद्यालयातून पूर्ण केलं. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून तिने मॅकेनिकल इंजिनिअरींग पूर्ण केलं. त्याचप्रमाणे तिने जीआरई, टोफेलसारख्या इंजिनिअरींग विषयातील कठीण परीक्षांमध्ये मिळवलेल्या यशाच्या जोरावर तिने अमेरिकेतल्या मिशिगन टेक युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवत पुढचं शिक्षण सुरू केलं. या युनिव्हर्सिटीत फर्स्ट क्लास मिळवत मॅकेनिकलमध्ये पदवी मिळवली. या पदवीनंतर संजलने विस्कॉनसिनमधील फॉन्ड्युलेकच्या मर्क्युरी मरीन या सुप्रिसद्ध कंपनीत काम सुरू केलं.

आपली काम करण्याची चिकाटी आणि सॉफ्टवेअर हार्डवेअरमधलं प्रावीण्य मिळवलेल्या संजलने ब्लू ओरिजिन द्वारे न्यू शेपर्ड मिशनसाठी निवडण्यात आली. 20 जुलै 2021 ला लाँच होणाऱ्या न्यू शेपर्ड टीममध्ये संजलची निवड झाली आहे. ज्यामुळे संजलचं लहानपणीचं स्वप्न पूर्ण झालं आहे.










