MHADA Exam : म्हाडाची परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा मालकच ‘पेपरफुटीच्या रॅकेट’मध्ये; वाचा कसं फुटलं बिंग?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात ‘म्हाडा’तील विविध पदांसाठी होत असलेली भरती परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटला असून, या प्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे. आरोग्य विभागातील क व ड संवर्गातील भरती परीक्षेच्या पेपरफुटीचा तपास करत असतानाच पोलिसांना म्हाडाच्या पेपरफुटीची माहिती मिळाली.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. “आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या पदाच्या परीक्षांच्या पेपर फुटीच्या तपासासाठी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना आज (12 डिसेंबर) होणाऱ्या MHADA च्या परीक्षेचे पेपर फोडण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यामध्ये गुंतलेल्या संशयितांबाबत पुणे शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती’, असं पोलीस आयुक्त गुप्ता म्हणाले.

‘मिळालेल्या माहितीच्या आधारे सायबर क्राईम विभागाचे पथके तयार करून त्यांना औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे परिसरामध्ये पाठवून संशयिताना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. औरंगाबाद परिसरातील परीक्षार्थींशी संपर्क साधून त्यांच्याकडून आर्थिक फायदा मिळवून परीक्षेच्या पूर्वी पेपर फोडून त्यांना देण्याची योजना टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचे संचालक कृष्णा जाधव आणि इतरांनी आखल्याची माहिती समोर आली”, अशी माहिती पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“सध्या पुण्यामध्ये राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांनी MHADA च्या परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना पेपर देण्याची यांनी तयारी दर्शवली होती. पोलीस पथकाने टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचे संचालक कृष्णा जाधव आणि त्यांचे सहकारी अंकित चनखोरे यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे MHADA च्या परीक्षेसाठी बसणाऱ्या ३ परीक्षार्थ्यांची प्रवेश पत्रे, त्यांची मूळ शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, कोरे धनादेश व आरोग्य विभागाच्या ‘क’ वर्गासाठी बसलेल्या 16 आणि ‘ड’ वर्गासाठी बसलेल्या 35 परीक्षार्थ्यांच्या नावाच्या याद्या, प्रवेश पत्रांच्या प्रती आढळून आल्या, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

ADVERTISEMENT

MHADA Exam Cancel : पेपर फुटीप्रकरणी तिघांना अटक, पुणे सायबर पोलिसांची कारवाई

ADVERTISEMENT

हे आरोपी आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणी संबंधित असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार संशयितांच्या हालचालीचा मागोवा घेऊन पुणे व ठाणे परिसरामध्ये नेमलेल्या पथकांनी संशयित संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्या हालचालीचा मागोवा घेतला. त्यांना त्यांच्या Creta गाडीमधून (क्रमांक MH20 /EL 7111) ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यासोबत गाडीमध्ये प्रितीश देशमुख आढळून आले. प्रितीश देशमुख हे G.A.software या कंपनीचे संचालक असून, त्यांच्या संस्थेतर्फे MHADA च्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत.

प्रितीश देशमुख यांच्या झडतीमध्ये त्यांच्या सोबत असलेल्या लॅपटॉपमध्ये MHADA च्या लेखी परीक्षेचे पेपर मिळून आले. तसेच त्यांच्यासोबत लिफाफ्यामध्ये पेन ड्राईव्ह पोलिसांना सापडले असून, त्यामध्येही MHADA च्या लेखी परीक्षेचे पेपरसेट आहेत, असं गुप्ता म्हणाले.

संशयित संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्या झडतीमध्ये त्यांच्या मोबाईलमध्ये MHADA च्या लेखी परीक्षेचे संदर्भात संशयास्पद संभाषण आणि MHADA च्या परीक्षार्थींची प्रवेशपत्रे तसेच आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या संदर्भातील याद्या आणि अन्य कागदपत्रे मिळून आली आहेत, अशी माहिती गुप्ता यांनी दिली.

सदर प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनमध्ये (गु.र.नं. ५५ / २०२१ भा.द.वि. कलम ४०६, ४०९, १२०(ब), ३४ आणि महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम (१९९० सुधारित) कलम ३, ५, ६, ८ अन्वये) गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये संशयित आरोपी अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगाव राजा, ता. सिंधखेडराजा, जि. बुलढाणा), संतोष लक्ष्मण हरकळ (रा. सदर सद्या, रा. मिलेनियम पार्क, औरंगाबाद) आणि डॉ. प्रितीश देशमुख (संचालक, G.A.software, रा. महिंद्रा अॅन्थिया, खराळवाडी, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT