कडक सॅल्यूट! 4 किमीचा घाट तुडवून पोलिसांनी तिला वाचवलं
खाकी वर्दीमागे एक माणूस असतो जो अडल्या-नडलेल्या प्रत्येकाच्या पाठीशी कायम उभा असतो. याचीच प्रचिती कर्जतच्या रेल्वे पोलिसांनी करवून दिली. पळसधरी रेल्वे स्थानकाकडून कर्जत रेल्वे पोलिसांना एक अलर्ट मिळाला. त्यात अशी माहिती होती की, आशा वाघमारे ही आदिवासी महिला खंडाळा घाट रेल्वे ट्रॅकशेजारी पडून आहे, उन्हाच्या तडाख्याने भोवळ आली, त्याने तिच्या पायाला, कमरेला मोठी इजा पोहोचली […]
ADVERTISEMENT

खाकी वर्दीमागे एक माणूस असतो जो अडल्या-नडलेल्या प्रत्येकाच्या पाठीशी कायम उभा असतो. याचीच प्रचिती कर्जतच्या रेल्वे पोलिसांनी करवून दिली. पळसधरी रेल्वे स्थानकाकडून कर्जत रेल्वे पोलिसांना एक अलर्ट मिळाला. त्यात अशी माहिती होती की, आशा वाघमारे ही आदिवासी महिला खंडाळा घाट रेल्वे ट्रॅकशेजारी पडून आहे, उन्हाच्या तडाख्याने भोवळ आली, त्याने तिच्या पायाला, कमरेला मोठी इजा पोहोचली होती. तिला मदतीची गरज आहे. हा अलर्ट मिळाल्यावर पोलिसांनी मदतकार्यासाठीची तयारी करायला घेतली. पण हे घटनास्थळ जवळपास 13 किलोमीटर दूर होतं. तिथे जाण्यासाठी केवळ दोन मार्ग होते, एक म्हणजे रेल्वे नाहीतर 13 किलोमीटर पायी जाणं. एक्सप्रेस येईपर्यंत 4 तास लागणार होते. इतका वेळ मदतीसाठी कोणाला तिष्ठट ठेवणं पोलिसांना मंजूर नव्हतं. म्हणून पोलिसांनी 13 किलोमीटरच पल्ला पायीच गाठण्याचा निर्णय घेतला.
इतका दूरवरचा प्रवास पाई करायचा हे आव्हान होतंच, पण त्यातही 4 किलोमीटरचं अंतर हे घाटातलं होतं. पण खाकी वर्दीतल्या माणसाला फक्त मदतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या महिलेला मदत करणं महत्त्वाचं वाटतं होतं. त्यामुळे हा कठीण प्रवास करून पोलिसांनी बेशुद्ध अवस्थेतील 44 वर्षाच्या आदिवासी महिलेला गाठलं.
पण आता प्रश्न होता तो महिलेला डॉक्टरांपर्यंत न्यायचं कसं, तिला घेऊन जाण्यासाठी पोलिसांकडे कुठलीच सोय नव्हती. अशात मग या पीएसआय टीएन सारकळे, कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गांगुर्डे, तुषार तुर्दे आणि मंगेश गायकवाड यांच्या टीमने एक साडी आणि बांबूच्या मदतीने स्ट्रेचर बनवून झोळी बनवली आणि त्या जखमी महिलेला त्या झोळीत टाकून घाटातून चालत जाऊन 13 किलोमीटरचा परतीचा प्रवास सुरू केला.
कर्जतच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेऊन तिच्यावर उपचार सुरू केले गेले.. आणि खाकी वर्दीतल्या माणसाला सॅल्यूट ठोकण्याचं अजून एक नवं कारणं अवघ्या महाराष्ट्राला मिळालं.