मुंबई: कोविड रुग्णांचा शोध घेण्यासाठी तातडीने चाचण्या वाढवा; महापालिका आयुक्तांचे निर्देश
मुंबई: मुंबई महानगरात मागील काही दिवसांमध्ये कोव्हिड विषाणू बाधितांची संख्या वाढली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला संभाव्य चौथ्या लाटेचा इशारा लक्षात घेता आणि पावसाळा सुरू होणार असल्याने जलजन्य आजारांची शक्यता पाहता आरोग्य यंत्रणेसह विभाग कार्यालये व सर्व संबंधित खात्यांनी सुसज्ज राहावे. त्याचप्रमाणे कोव्हिड संसर्ग वेळीच रोखण्यासाठी बाधितांचा शोध घेता यावा म्हणून चाचण्यांची संख्या वाढवावी, असे निर्देश […]
ADVERTISEMENT
मुंबई: मुंबई महानगरात मागील काही दिवसांमध्ये कोव्हिड विषाणू बाधितांची संख्या वाढली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला संभाव्य चौथ्या लाटेचा इशारा लक्षात घेता आणि पावसाळा सुरू होणार असल्याने जलजन्य आजारांची शक्यता पाहता आरोग्य यंत्रणेसह विभाग कार्यालये व सर्व संबंधित खात्यांनी सुसज्ज राहावे. त्याचप्रमाणे कोव्हिड संसर्ग वेळीच रोखण्यासाठी बाधितांचा शोध घेता यावा म्हणून चाचण्यांची संख्या वाढवावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
ADVERTISEMENT
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हिड-१९ विषाणू बाधितांच्या संख्येत मागील आठवडाभरात वेगाने वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी आज (दिनांक ३ जून २०२२) दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रशासनाची बैठक घेतली. याप्रसंगी महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता, कार्यकारी आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, इतर सर्व संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल याप्रसंगी म्हणाले की, कानपूर आय. आय. टी. तज्ज्ञांनी जुलै २०२२ मध्ये कोव्हिडची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली असून त्यांचा इशारा गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. कारण याआधीच्या कोव्हिड लाटांबाबत त्यांनी वर्तवलेले अंदाज देखील खरे ठरले होते. कोव्हिड विषाणूच्या बाधित रुग्णांची संख्या अलीकडे वाढली आहे, हे लक्षात घेतले तर चौथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोव्हिड प्रतिबंधात्मक बाबींवर पुन्हा एकदा विशेषत्वाने लक्ष देणे आवश्यक आहे. सोबतच, आता पावसाळादेखील सुरु होणार असून पावसाळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुसज्ज राहून त्याची सक्त अंमलबजावणी होणे देखील गरजेचे आहे.
हे वाचलं का?
कोव्हिड आणि मॉन्सून या दोन्ही परिस्थितीचा सामना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे आवश्यक ती सर्व यंत्रणा असली तरी त्याचा नियमितपणे आढावा घेणे आणि यंत्रणा सुसज्ज राखणे गरजेचे आहे. दक्षता म्हणून काही बाबी प्राधान्याने करावयाच्या आहेत, असे सांगून डॉ. चहल यांनी निर्देश दिले. ते पुढीलप्रमाणेः
Corona: महाराष्ट्रात दिवसभरात 1045 नव्या रूग्णांची नोंद, एक मृत्यू
ADVERTISEMENT
१) मुंबई महानगरात सध्या होत असलेली कोव्हिड चाचण्यांची प्रतिदिन संख्या ८ हजार इतकी असून ती प्रतिदिन ३० ते ४० हजार पर्यंत वाढविणे आवश्यक आहे. कारण सध्या बाधित रुग्णांचे प्रमाण ८ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून हा दर सावधानतेचा इशारा देणारा आहे. चाचण्यांची संख्या वाढली तर त्यामुळे जास्तीत-जास्त बाधितांचा शोध घेणे सोपे होईल, परिणामी संसर्गाला अटकाव करता येईल.
ADVERTISEMENT
२) सर्व परिमंडळांचे सह आयुक्त / उप आयुक्त, सहायक आयुक्त तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी जिथे जिथे कोव्हिड बाधित आढळतील, तिथे चाचण्यांची संख्या तातडीने वाढवावी. संबंधित बाधित रुग्णांचा संपर्कातील सर्व नागरिकांचा शोध घेऊन त्यांची कोव्हिड चाचणी करावी.
३) ज्या इमारती / गृहनिर्माण संस्थांमध्ये बाधित आढळतील, त्या इमारती / गृहनिर्माण संस्थांमध्ये सर्व रहिवाशांची सामूहिक कोव्हिड चाचणी करावी. तसेच त्या इमारती / गृहनिर्माण संस्था लवकरात लवकर संसर्गमुक्त होतील, यावर लक्ष केंद्रीत करावे.
४) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांनी सर्व वैद्यकीय प्रयोगशाळा संचालकांसमवेत बैठक घेतली आहे. या सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना सुसज्ज राहण्याचे निर्देश देण्यात यावेत आणि वाढीव संख्येने चाचण्या करण्याची क्षमता राखावी, अशा सूचना पुन्हा एकदा देण्यात याव्यात.
५) वैद्यकीय प्रयोगशाळांनी कोणत्याही रुग्णाला कोव्हिड बाधित असल्याचा अहवाल परस्पर देऊ नये. दैनंदिन कोव्हिड बाधितांचे सर्व अहवाल फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे पाठवावेत. या बाबीचे उल्लंघन केल्यास संबंधित वैद्यकीय प्रयोगशाळेवर सक्त कारवाई केली जाईल.
६) महानगरपालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षात देखील पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध राहील, असे नियोजन करावे. जेणेकरुन, दैनंदिन बाधित रुग्णांची प्राप्त होणारी यादी प्रशायकीय विभागनिहाय स्वतंत्र करुन संबंधित सर्व विभाग नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) कडे पाठविता येईल.
७) सर्व विभाग नियंत्रण कक्षांमध्ये पुरेसे मनुष्यबळ, यंत्रणा, साधनसामग्री उपलब्ध आहे किंवा कसे याचा संबंधित सहायक आयुक्तांनी आढावा घ्यावा आणि नियंत्रण कक्ष सुसज्ज राखावे. प्रत्येक नियंत्रण कक्षासाठी गरजेइतक्या रुग्णवाहिका नेमण्यात याव्यात. सर्व संबंधित परिमंडळांचे सह आयुक्त / उप आयुक्त आणि संचालक (आपत्ती व्यवस्थापन) यांनी देखील याबाबत पडताळणी करावी. तसेच आवश्यक सहाय्य पुरवावे.
८) सर्व भव्य कोव्हिड रुग्णालयांना (जम्बो कोव्हिड सेंटर) सतर्क राहण्याची सूचना करण्यात येत असून रुग्ण दाखल करुन घेता येईल, अशारितीने सुसज्ज यंत्रणा, वैद्यकीय मनुष्यबळ व इतर कर्मचारी नेमण्यात यावेत. विशेषतः अतिदक्षता उपचारांच्या रुग्णशय्या आणि त्यासाठी लागणारी वैद्यकीय संयंत्रे उपलब्ध ठेवावीत. जेणेकरुन रुग्णसंख्या वाढली तर, अडचण होऊ नये.
९) सर्व भव्य कोव्हिड रुग्णालयांची संरचनात्मक तपासणी करुन पावसाळी परिस्थितीत संरचनेचा कोणताही धोका उद्भवणार नाही, याची खातरजमा करावी, त्यासाठी संबंधित कोव्हिड रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि परिमंडळांचे उप आयुक्त यांनी समन्वय राखून कार्यवाही पूर्ण करावी व संरचना स्थिरता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. पावसाळी पाण्याचा उपसा करणारी यंत्रणा देखील तैनात करावी.
१०) महानगरपालिकेच्या सर्व नियमित प्रमुख रुग्णालयांनी वाढीव रुग्णसंख्या दाखल करुन घेता येईल व त्यांच्यावर योग्य उपचार होतील, अशारितीने तयारी करावी. तसेच सर्व खासगी रुग्णालयांनादेखील आपापल्या स्तरावर सर्व तयारी करुन सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले जावेत.
११) मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत सर्व रुग्णालयांनी गरजेइतका औषधसाठा खरेदी करुन उपलब्ध करुन घ्यावा.
१२) कोव्हिड विषाणूचे जनुकीय सूत्र निर्धारण अर्थात जिनोम सिक्वेसिंग करण्याची कार्यवाही नियमितपणे सुरु ठेवावी. जेणेकरुन विषाणूचा कोणताही नवीन उपप्रकार वेळीच निदर्शनास येईल.
१३) सर्व झोपडपट्टी परिसरांमध्ये नियमितपणे संसर्ग प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात यावी. विशेषतः झोपडपट्टयांमधील सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये / शौचालयांमध्ये दिवसातून किमान ५ वेळा जंतुनाशक औषध फवारणी झालीच पाहिजे. जेणेकरुन, कोव्हिडसह पावसाळी आजारांचा फैलाव रोखता येईल. या उपाययोजनांसाठी अधिकचा निधी आवश्यक असल्यास तो उपलब्ध करुन दिला जाईल.
१४) १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुला – मुलींचे कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण जास्तीत-जास्त संख्येने करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी. तसेच १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुला – मुलींचे देखील जलदगतीने लसीकरण करावे.
१५) वैद्यकीय औषधी दुकानांमधून विकले जाणाऱया सेल्फ टेस्टिंग कोव्हिड कीटची आकडेवारी महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त व्हावी, यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यपद्धती सुनिश्चित करण्यात यावी.
१६) कोव्हिड उपाययोजनांशी संबंधित तातडीचे प्रस्ताव, त्यांच्या नस्ती प्राधान्याने मार्गी लावाव्यात.
१७) पावसाळ्यात रस्त्यांवर होणारे खड्डे वेळेत भरले जावेत, यासाठी विभागीय नियंत्रण कक्ष अर्थात वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून नागरी समस्यांची दखल घेतली जावी. त्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) व उप आयुक्त (पायाभूत सुविघा) यांनी आवश्यक ती व्यवस्था उपलब्ध करावी.
१८) सर्व रस्त्यांवरील / वाहिन्यांवरील झाकणे (मॅनहोल) व्यवस्थितरित्या आच्छादित आहेत, याची खातरजमा करण्यासाठी स्थानिक यंत्रणेला सर्व ठिकाणी निरिक्षण करण्याचे निर्देश देण्यात यावेत. पावसाळी पाणी साचण्याची ठिकाणे असलेल्या परिसरांमध्ये मॅनहोलच्या झाकणाखाली जाळी लावून सुरक्षिततेची अतिरिक्त उपाययोजना करण्यात यावी.
१९) संपूर्ण मुंबई महानगरात पावसाळी पाणी साचण्याची शक्यता असलेले ४७७ परिसर आहेत. या सर्व ठिकाणी पाणी उपसा करणारी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. या यंत्रणेवर देखरेख ठेवण्यासाठी व त्याचे संचलन करण्यासाठी विशेष समन्वयकांची नेमणूक करावी. जेणेकरुन, संभाव्य पूरस्थिती असे समन्वयक स्वतःहून उपस्थित राहून यंत्रणा सांभाळतील.
२०) पावसाळा सुरु झाल्यानंतर, सर्व उपाययोजनांची प्रत्यक्ष व्यवस्थित अंमलबजावणी होत आहे, तसेच पूरस्थिती अथवा नागरिकांना अडचणीची ठरु शकेल, अशी कोणतीही स्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेची सर्व संबंधित यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर उतरुन कार्यान्वित आहे, याची खात्री करावी. जेणेकरुन, तातडीने समस्येचे निराकरण होऊ शकेल.
दरम्यान, या बैठकीत मार्गदर्शन करताना महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले की, पुढील एक दोन आठवडे कोव्हिड परिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. बाधित रुग्ण शोधून काढणे हे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे. कोव्हिड विषाणूचे नवीन उप प्रकार आढळले असले तरी त्यांच्या तीव्रतेबद्दल अद्याप भाष्य करता येणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री प्रारंभापासून आजही नियमितपणे मुखपट्टी (मास्क) चा उपयोग करतात. त्याचे पालन नागरिकांनी देखील करणे आवश्यक आहे. कोव्हिड सोबत पावसाळ्यात येणारे जलजन्य आजारांचे आव्हान देखील आपल्यासमोर असेल. त्यामुळे ‘घर घर दस्तक’ सारख्या अभियानातून सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात, अशी सूचना डॉ. ओक यांनी केली.
महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी कोव्हिड सुसज्जतेसाठी खासगी रुग्णालयांची बैठक घेण्याची सूचना याप्रसंगी केली. त्यास अनुसरुन डॉ. गौतम भंसाली यांनी नमूद केले की, कालच सर्व खासगी रुग्णालयां समवेत बैठक घेण्यात आली आहे. या सर्व रुग्णालयांच्या संचालकांना आवश्यक ते निर्देश देऊन कोव्हिड सुसज्ज राहण्याविषयी सूचित करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
सर्व खासगी रुग्णालयांनी कोव्हिड रुग्णांना दाखल करुन घेण्यासंदर्भातील कार्यपद्धती, कोव्हिड बाधितांवर उपचार करण्यासाठी शासनाच्या निर्णयानुसार आकारावयाचे दर इत्यादींबाबत यापूर्वी निर्गमित केलेले आदेश पुन्हा एकदा प्रसारित करण्याची सुचनाही महानगरपालिका आयुक्तांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांना केली. तसेच महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालये व आरोग्य व्यवस्थेमध्ये कोव्हिड सदृश्य लक्षणे आढळणाऱया व्यक्तिंची कोव्हिड चाचणी करण्याची व्यवस्था बाह्यरुग्ण सेवा विभागांमध्ये करण्यात यावी, अशी सुचनाही आयुक्तांनी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT