कोव्हिडचा नवा व्हेरिएंट, महापालिका आयुक्त म्हणतात मुंबईला अधिक काळजी घेण्याची गरज..
कोव्हिड-19 विषाणूचा अत्यंत वेगाने पसरणारा नवीन प्रकार काही अफ्रिकन देशांमध्ये आढळला असून त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने सर्वांना धोक्याचा इशारा दिलेला आहे. ते पाहता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासन तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने देखील आपापल्या स्तरावर आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी, अशा सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी […]
ADVERTISEMENT
कोव्हिड-19 विषाणूचा अत्यंत वेगाने पसरणारा नवीन प्रकार काही अफ्रिकन देशांमध्ये आढळला असून त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने सर्वांना धोक्याचा इशारा दिलेला आहे. ते पाहता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासन तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने देखील आपापल्या स्तरावर आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी, अशा सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिल्या आहेत.
ADVERTISEMENT
ज्या अफ्रिकन देशांमध्ये नवीन कोरोना विषाणूचा व्हेरिएंट आढळला आहे. तेथून थेट किंवा अन्य हवाई मार्गाने आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबईत आला तर, त्यांचे पासपोर्ट काटेकोरपणे तपासावे. संबंधित प्रवाशांमध्ये संसर्गाची लक्षणे दिसत आहेत किंवा काय याबाबत काटेकोर वैद्यकीय तपासणी करावी, त्याआधारे वैद्यकीय चाचणी देखील करावी. सध्याच्या पद्धतीनुसार त्यांना अलगीकरणाच्या सूचना द्याव्यात. जर एखादा प्रवासी बाधित आढळला तर त्याला तातडीने संस्थात्मक विलगीकरण करावे, बाधित नमुन्यांचे जनुकीय गुणसूत्र (जिनोम स्क्विन्सिंग) पडताळावे. तसेच बाधिताच्या सानिध्यातील नागरिकांचा शोध घेऊन पुढील कार्यवाही त्वरेने करावी, अशा सक्त सूचना देखील इकबाल चहल ह्यांनी दिल्या आहेत. नवीन विषाणूच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचना प्राप्त झाल्यास त्यानुसार पुढील निर्देश दिले जातील, असेही त्यांनी नमूद केले.
हे वाचलं का?
कोव्हिड 19 लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून मुंबईसह महाराष्ट्रात कोविड संसर्गजन्य परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. असे असताना जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगाला नुकताच धोक्याचा इशारा दिला आहे. काही आफ्रिकन देशांमध्ये कोविड विषाणूचा नवीन प्रकार आढळला असून तो अत्यंत संसर्गजन्य आहे, असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ सकाळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्याशी चर्चा करून काही निर्देश दिले.
याच अनुषंगाने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, पी. वेलरासू, सुरेश काकाणी, सर्व सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्यासह पोलीस प्रशासनाचे सहआयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील आणि इतर पोलीस अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिकारी, महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता, उपनगरीय रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, कार्यकारी आरोग्य अधिकारी आणि टास्क फोर्सचे सदस्य या सर्वांची संयुक्त बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे आज संध्याकाळी आयोजित करण्यात आली होती. महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कोविड विषाणूचा ओमिक्रोन प्रकार आणि त्या पार्श्वभूमीवर घ्यावी लागणारी खबरदारी या दिशेने सविस्तर चर्चा करण्यात आली.
ADVERTISEMENT
यावेळी मार्गदर्शन करताना महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल म्हणाले की, आफ्रिकन देशांमध्ये कोव्हिड विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा लक्षात घेता अनेक देशांनी व विमान कंपन्यांनी सावध पावले टाकली आहेत. त्याच धर्तीवर मुंबईत येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची मागील पंधरा दिवसांच्या प्रवासाची आवश्यक माहिती संकलित करावी. नवीन विषाणू प्रकाराने बाधित असलेल्या आफ्रिकन देशांमधून थेट मुंबईत येणारी विमाने नाहीत, ही तूर्तास दिलासादायक बाब असली तरी गाफील राहून मुळीच चालणार नाही. येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी स्वयंघोषणा पत्र देऊन मागील पंधरा दिवसातील आपल्या प्रवासाची माहिती देणे गरजेचे आहे. त्यांचे पारपत्र (पासपोर्ट) विमानतळ अधिकाऱ्यांनी बारकाईने तपासावेत.
ADVERTISEMENT
प्रचलित पद्धतीनुसार या सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि चाचणी तसेच अलगीकरण अत्यंत काटेकोरपणे करावे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचना लवकरच प्राप्त होणे अपेक्षित असून त्यानुसार विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या चाचणी, अलगीकरण इत्यादींबाबत सविस्तर सूचना महानगरपालिकेच्या वतीने निर्गमित करण्यात येतील, विमानतळावर व्यवस्था वाढवताना कोणतीही कमतरता राहणार नाही, या दृष्टीने सुसज्ज राहावे, असे त्यांनी नमूद केले.
पुढे ते म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेली सर्व जम्बो कोविड सेंटर योग्य क्षमतेने कार्यान्वित राहतील, यादृष्टीने त्यांची पुन्हा फेरपाहणी करावी. त्यामध्ये वैद्यकीय आणि इतर आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा, वैद्यकीय प्राणवायू निर्मिती व साठा, विद्युत व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था या सर्व बाबींचा आढावा घ्यावा, अशा सूचना श्री. चहल यांनी केल्या.
कोविड विषाणू संसर्ग पूर्णपणे संपलेला नाही, असे वारंवार बजावूनही बरेचसे नागरिक बेफिकीरपणे वावरत असल्याचे निदर्शनास येत आहे, ही चिंतेची बाब आहे, असे सांगून पुढे ते म्हणाले की, योग्य प्रकारे मुखपट्टी (मास्क) न लावणाऱ्या नागरिकांवर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने देखील पुन्हा कडक कारवाई सुरू करावी. लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांनाच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्याबाबत भर दिला पाहिजे. विविध आस्थापना, दुकाने, मॉल, चित्रपट गृह अशा सार्वजनिक ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले नसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेही आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले. मुंबईमध्ये कोविड लसीची पहिली मात्रा देण्याचे लक्षांक पूर्ण केले तसे आता दुसरी मात्रा देण्याचे लक्षांक देखील तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे, या मुद्द्यावरही डॉ. चहल ह्यांनी भर दिला.
कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या दिशेने सर्व विभागीय कार्यालयांनी वॉर्ड वॉर रूम पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी कोणत्या उपाययोजना नव्याने कराव्या लागतील, त्याचा आढावा घ्यावा. झोपडपट्टी व तत्सम भागांमध्ये सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये दिवसातून किमान पाच वेळा पूर्ण निर्जंतुकीकरण करावे. सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपायोजना करण्याच्या दृष्टीने पुन्हा तयारीला लागावे. रुग्णवाहिका व इतर वाहने उपलब्ध होतील, यासाठी पूर्व तयारी सुरू करावी इत्यादी विविध सूचना इकबाल चहल यांनी याप्रसंगी केल्या. टास्क फोर्स चे सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. संजय ओक यांनीदेखील मार्गदर्शन केले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT