दंगलीनंतरचा तो काळ, शिवसेनेची हमी आणि झहीर मुंबईतच राहिला!

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईकर वासिम जाफरवर उत्तराखंड क्रिकेट संघटनेने संघात मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप केला. मीडियामध्ये ही गोष्ट बाहेर आल्यानंतर याप्रकरणी अनेक चर्चा रंगल्या. वासिम जाफरने याप्रकरणी आपलं स्पष्टीकरण देत उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. भारत हा देश असा आहे की इकडे क्रिकेटला एका धर्माचं रुप दिलं जातं, पण आजपर्यंतच्या इतिहासात कधीही खेळाडूंच्या धर्मावरुन आरोप-प्रत्यारोप किंवा वाद झाल्याचं समोर आलं नव्हतं. वासिम जाफरवर करण्यात आलेल्या आरोपांमुळे क्रिकेटप्रेमींची मनं दुखावली गेली यात काही वादच नाही.

वासिम ज्या मुंबईचं प्रतिनिधीत्व करतो त्या मुंबई क्रिकेट संघटनेत कधीही खेळाडूंचा धर्म आडवा आला नाही. बाबरी मशिदीच्या पतनानंतर मुंबईत धार्मिक दंगल झाली. अनेक निष्पाप कुटुंबांना यात आपले प्राण गमवावे लागले. परंतू सामान्य मुंबईकर या धक्क्यातूनही सावरला आणि त्यानंतर त्याने आपला धर्म-पंथ विसरुन एकमेकांना मदत केली. टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर झहीर खान हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचा. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात झहीर खान मुंबईत आला होता. झहीर वयोगटातील क्रिकेट स्पर्धा खेळत असतानाच मुंबईत दंगलीचं सत्र सुरु झालं.

झहीरचं त्यावेळेला वय साधारण १९ ते २० वर्ष असेल. पण दंगलीनंतर मुंबईतला माहोल बदलला होता. परिस्थिती नियंत्रणात आली असली तरीही लोकांच्या मनात भीती कायम होती. अशातच श्रीरामपूरसारख्या गावातून आलेल्या तरुण झहीरला मुंबईत अस्वस्थ वाटायला लागलं. आजुबाजूची परिस्थिती पाहता झहीरने मुंबई सोडून आपलं गाव गाठायचं ठरवलं. झहीर मुंबई सोडून गावाला परत जातोय हे त्याचे कोच विद्याधर पराडकरांना समजलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विद्याधर पराडकर सरांनी झहीरला सोबत घेतलं आणि त्यांनी थेट शिवसेनेची शाखा गाठली. “हा झहीर खान, आपल्या महाराष्ट्रातला आहे. माझ्या अंडर तो शिकतो आहे, होतकरु आहे. त्याला सध्या मुंबईत राहण्याची भीती वाटते आहे.” पराडकर सरांचं त्यावेळी दक्षिण मुंबईत मोठं नाव होतं. अनेक क्रिकेट क्लबमध्ये त्यावेळी पराडकर सर कोच म्हणून काम करायचे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्येही त्यांची चांगली उठबस होती. सरांसोबत आलेला विद्यार्थी म्हणल्यानंतर स्थानिक शिवसेना नेत्यांनीही सरांना शब्द दिला. काहीही काळजी करु नका, याच्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेऊ.

त्या प्रसंगानंतर झहीरचं मन बदललं. सरांचा भक्कम पाठींबा आणि शाखेत घडलेल्या त्या प्रसंगानंतर झहीरने मुंबई सोडायची नाही असं ठरवलं. कालांतराने झहीरने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव मोठं केलं. स्थानिक क्रिकेटमध्ये बडोद्याकडून पदार्पण करणाऱ्या झहीर खानने नंतरच्या काळात आपली ड्रीम टीम म्हणजेच मुंबईचंही प्रतिनिधीत्व केलं. हा प्रसंग वरकरणी दिसायला छोटा असला तरीही संकट काळात मुंबईकर माणूस मदतीला धावून येताना समोरच्या व्यक्तीचा धर्म किंवा जात पाहत नाही हे दिसून येतं. सामान्य घरात लहानाचा मोठा झालेला एक बेस्ट कर्मचाऱ्याचा मुलगा ज्याने आपल्या कारकिर्दीत फक्त क्रिकेटचाच ध्यास घेतला…तो धर्मावरुन खेळाडूंची निवड करेल या गोष्टीवर कोणाचाही सहज विश्वास बसणारच नाही, कारण धर्मावरुन राजकारण करणं मुंबईच्या क्रिकेटच्या सिलॅबसमध्येच नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT