उस्मानाबाद : जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा केला सफाया
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व १५ जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला, तर भाजपचा पूर्ण सफाया झाला आहे. भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप पॅनलचा दारुण पराभव झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात महाविकास आघाडीचा हा पहिला मोठा विजय ठरला आहे. महाविकास आघाडीतील काही मते परांडा व तुळजापूर तालुक्यात फुटल्याने महाविकास आघाडीतील घरचा […]
ADVERTISEMENT

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व १५ जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला, तर भाजपचा पूर्ण सफाया झाला आहे. भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप पॅनलचा दारुण पराभव झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात महाविकास आघाडीचा हा पहिला मोठा विजय ठरला आहे. महाविकास आघाडीतील काही मते परांडा व तुळजापूर तालुक्यात फुटल्याने महाविकास आघाडीतील घरचा भेदी कोण? याची जोरदार राजकीय चर्चा होत आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षांनी प्रत्येकी ५ जागा जिंकल्या.
परंडा तालुक्यात भाजप पॅनलच्या उमेदवारांना महाविकास आघाडीच्या बरोबरीनं मतं मिळाली. महाविकास आघाडीची तुळजापूर व परांडा तालुक्यातील मते फोडण्यात भाजपला बऱ्यापैकी यश आलं. त्यासाठी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचं संबंध कामी आल्याचं दिसतं आहे.
प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सोसायटी उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेचे नानासाहेब व्यंकटराव पाटील हे विजयी झाले. नानासाहेब पाटील यांना ५० मतं पडली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार चंद्रकांत कदम यांना २८ मते पडली.
कळंब तालुक्यात शिवसेनेचे बळावंत तांबारे हे विजयी झाले. तांबारे यांना ४० तर विरोधक श्रावण सावंत यांना २९ मतं पडली. लोहारा तालुक्यात काँग्रेसचे नागप्पा पाटील विजयी झाले. त्यांना २८ मते, तर प्रतिस्पर्धी राहुल पाटील यांना १० मतं मिळाली.
इतर शेती संस्था मतदार संघात शिवसेनेचे संजय गौरीशंकर देशमुख हे विजयी झाले. त्यांना ११६ मतं मिळाली, तर भाजपचे सतीश दंडनाईक यांना ८३ मतं मिळाली आहेत. नागरी बँका पतसंस्था गटात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान चेअरमन सुरेश बिराजदार हे ९६ मतं घेऊन विजयी झाले. त्यांचे विरोधक सुधीर पाटील यांना ५१ मते मिळाली.
अनुसूचित जाती मतदारसंघात संजय रामचंद्र कांबळे हे ४२९ मतं घेत विजयी झाले. त्यांनी विद्यमान उपाध्यक्ष कैलास शिंदे यांचा पराभव केला. त्यांना ३५९ मतं पडली. इतर मागास प्रवर्ग गटात मेहबुब पाशा पटेल ५०२ मते घेत विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी विजय शिंगाडे यांना २८३ मतं मिळाली.
विमुक्त जाती गटात संजीव वसंतराव पाटील ४६६ मतं घेत विजयी झाले. त्यांचे विरोधक वैभव मुंडे यांना ३२३ मते मिळाली. महिला राखीव मतदार संघात काँग्रेसच्या अपेक्षा प्रकाश आष्टे ४४३ व प्रविणा हनुमंत कोलते ४४६ मतं घेत विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी सुवर्णा कोळगे ३२५ मतं व उषा टेकाळे यांना ३२४ मतं पडली.
भूम तालुका सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे मधुकर मोटे, परंडा तालुका सोसायटी गटातून शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, उमरगा तालुका सोसायटी गटातून काँग्रेसचे नेते तथा माजी चेअरमन बापूराव पाटील, वाशी तालुका सोसायटी गटातून शिवसेनेचे आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांचे पुतणे विक्रम सावंत आणि तुळजापूर तालुका सोसायटी गटातून काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण बिनविरोध निवडून गेले आहेत.
“पक्ष काय असतो, याची ताकत राष्ट्रवादी सोडून भाजपत गेलेल्या राणा जगजीतसिंह पाटील यांना आज कळली असेल”, अशी टीका शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली. “एखाद्या पराभवामुळे ४० वर्ष ज्या पक्षाने सत्ता दिली, त्याला सोडून राणा पाटील हे भाजपात गेले. ग्रामपंचायतलाही निवडून न येता त्यांना शरद पवार यांनी थेट राज्यमंत्री केलं. त्या पक्षाला सोडणाऱ्या नेत्यांना जिल्हा बँक निवडणुक धडा घेण्यासारखी आहे. पक्ष संघटना व कार्यकर्ते काय असतात हे त्यांना समजलं असेल,” अशी टीका खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली.
महाविकास आघाडीचा विजय म्हणजे जनशक्तीने धनशक्तीवर केलेला विजय असल्याची प्रतिक्रिया शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी दिली. “जिल्हा बॅक निवडणुक निकाल म्हणजे पैशाच्या बळावर कोणतीही निवडणुक जिंकता येते म्हणणाऱ्या व स्वःहट्टासाठी जाणीवपुर्वक बिनविरोधला खोडा घालून अमाप पैशाचा वापर करणाऱ्या विरोधकांना चपराक आहे”, अशी टीका शिवसेना आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी भाजप आमदार राणा पाटील यांच्यावर केली.