Malegaon Blast Case: 17 वर्षांची प्रतीक्षा, स्फोट, मृत्यू... आणि तपासही फिरला, A टू Z स्टोरी
Malegaon Blast Case Verdict: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी तब्बल 17 वर्षानंतर आज (31 जुलै) निकाल येणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT

मालेगाव: 29 सप्टेंबर 2008 चा दिवस. एकीकडे मुस्लीम बांधव रमजानची तयारी करत होते तर दुसरीकडे हिंदू बांधव नवरात्रीची तयारी करत होते. मालेगावमध्येही अशीच काहीशी परिस्थिती होती. आणि अचानक रात्री साडेनऊच्या सुमारास मालेगावमधील भिकू चौकात बॉम्बस्फोट झाला. सणाच्या आनंदावर विरझण पडलं. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 101 जण जखमी झाले. खळबळ उडाली, चक्र फिरली काही आरोपींना अटक झाली, मग बाहेरही आले.
या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेला तब्बल 17 वर्ष लोटली, कितीतरी सुनावण्या झाल्या. आता अखेर मुंबईतील विशेष न्यायालय हे आज (31 जुलै 2025) रोजी 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल देणार आहे. भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, अजय राहिरकर आणि सुधाकर धार्द्वीवेदी हे प्रमुख सात आरोपी आहेत.
मालेगावात नेमकं काय घडलं होतं?
निकाल काय येणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे. मात्र 17 वर्षांपूर्वी मालेगावात नेमकं काय घडलं होतं, आणि तेव्हापासून ते आता या निकालापर्यंत नेमकं काय-काय घडत गेलं हेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
हे ही वाचा>> मालेगावात रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांची छापेमारी
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधील भिकू चौकात एका दुचाकीच्या माध्यमातून झालेल्या बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू झालेला, तर 101 जण जखमी झाले होते. फरहीन उर्फ शगुफ्ता शेख लियाकत, शेख मुश्ताक शेख युसूफ, शेख रफिक शेख मुस्तफा, इरफान जियाउल्ला खान, सय्यद अजहर सय्यद निसार, हारुन शहा मोहम्मद शहा हे सहा जण यामध्ये मृत्यूमुखी पडले. नंतर स्थानिक पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता आणि त्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने (ATS) तपास हाती घेतला.










