Maharashtra Politics : रवी राणांनी मागितली माफी, बच्चू कडूंनी सस्पेन्स ठेवला कायम

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘५० खोके’च्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादावर आमदार रवी राणांकडून तरी पडदा टाकण्यात आलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतल्यानंतर रवी राणांनी विधान मागे घेत माफी मागितली. पण, बच्चू कडूंनी अमरावतीत जाऊन भूमिका मांडणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे कडूंच्या मनात नेमकं काय, असा प्रश्न निर्माण झालाय.

बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतले असं विधान रवी राणांनी केलं होतं. त्यावरून बच्चू कडू आक्रमक झाले आणि हा वाद थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी म्हणत बच्चू कडूंनी थेट वेगवेगळा विचार करू असा इशाराच दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राणा-कडू वाद सोडवण्यासाठी पुढाकार घेतला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिंदे-फडणवीसांसोबत चर्चेनंतर राणांनी मागितली माफी

रविवारी मध्यरात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, रवी राणा आणि बच्चू कडू यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली. तब्बल अडीच तास ही बैठक चालली. या बैठकीनंतर सोमवारी सकाळी रवी राणा यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

फडणवीसांच्या भेटीनंतर रवी राणा यांनी विधान मागे घेत माफी मागितली. रवी राणा म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. त्यांचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. देवेंद्र फडणवीस हे अनेक अडचणीच्या प्रसंगातून मार्ग काढत असतात. या प्रसंगातूनही त्यांनी मार्ग काढला. त्यांचा आदेश पाळत मी दुखावलेल्या नेत्याची माफी मागतो.”

ADVERTISEMENT

बच्चू कडूंनी विधान मागे घ्यावं, राणा काय म्हणाले?

५० खोकेचं विधान मागे घेताना रवी राणांनी बच्चू कडू यांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली. रवी राणा म्हणाले, “बोलण्याच्या नादात माझ्याकडून काही शब्द गेले. त्यामुळे बच्चू कडू नाराज झाले. काही मंत्री, आमदारही नाराज झाले. माझ्या बोलण्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माफी मागतो.”

ADVERTISEMENT

पुढे बोलताना राणा असंही म्हणाले की, “बच्चू कडू दुखावले गेल्यानं त्यांची माफी मागतो, पण त्यांचीही काही विधानं जिव्हारी लागणारी होती. त्यामुळे बच्चू कडू यांनीही आपलं विधान मागे घ्यावं”, अशी मागणी रवी राणांनी यावेळी केली.

बच्चू कडू काय मांडणार भूमिका?

रवी राणा यांच्या माफीनंतर बच्चू कडू काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण बच्चू कडू यांनी राणा यांच्या माफीनाम्यावर प्रतिक्रिया दिली असली, तरी या प्रकरणात त्यांची भूमिका मांडलेली नाही. त्यांच्या भूमिकेचा सस्पेन्स कायम असून, आपण उद्या अमरावतीत जाऊन भूमिका मांडू असं कडू म्हणाले.

“मी मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) आणि उपमुख्यमंत्र्यांचे (देवेंद्र फडणवीस) आभार मानतो. रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केलीये, पण बघू आता यापुढे कसे वागतात. अंतिम निर्णय अमरावतीत जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून जाहीर करणार आहे”, असं बच्चू कडू म्हणालेत. दुसरीकडे रवी राणांविरोधातील बच्चू कडूंच्या समर्थकांचा रोष अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळे कडू काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT