एग्जिट पोल

वाईन उद्योजकासोबत कुणाची बैठक झाली?; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यातील सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाला भाजपने विरोध दर्शवला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाईन विक्रीच्या या निर्णयावरून राज्य सरकारला सवाल केला आहे. ‘वाईन तयार करणाऱ्या एका फार मोठ्या उद्योजकासोबत नेमकी कुणाची बैठक झाली?’, असा प्रश्न उपस्थित करत फडणवीसांनी या निर्णयामागे मोठं अर्थकारण असल्याचा आरोप केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या परवानगीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, ‘कुणाच्या हिताकरिता अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. याच कारण असं आहे की, काही लोकं गोंडसपणे शेतकऱ्यांचं नाव पुढे करत आहेत. हा शेतकऱ्यांकरिता घेतलेला निर्णय नाही. काही लोकांनी नव्याने दारूच्या कंपन्या किंवा एजन्सी घेतल्या आहेत. कोण आहेत ते तुम्ही शोधा. या लोकांच्या भल्याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे’, असा दावा फडणवीस यांनी केला.

‘वाईन तयार करणाऱ्या एका फार मोठ्या उद्योजकासोबत नेमकी कुणाची बैठक झाली? ती बैठक नेमकी कुठे झाली? परदेशात झाली का? असा प्रश्नही आम्हाला विचारायचा आहे. हा काही साधा निर्णय नाही. यामागे फार मोठं अर्थकारण आहे. अर्थपूर्ण पद्धतीने घेतलेला निर्णय आहे आणि महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचं स्वप्न या सरकारचं दिसत आहे. याचा आम्ही निषेध करतो’, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘मी मध्य प्रदेशात राहत नाही. मी महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रामध्ये आठ वर्षापूर्वी हा निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळीही आम्ही त्याला विरोध केला होता. त्यावेळी अण्णा हजारेंसह सगळ्यांनी विरोध केल्यानंतर सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला होता. मात्र, आता काय डील झाली आहे, हे देखील समजलं पाहिजे. ज्यामुळे महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. काय डील झाली? हे सरकारने सांगावं’, असा सवाल फडणवीसांनी केला.

काय झाला आहे निर्णय?

ADVERTISEMENT

राज्यात फळं, फुलं, केळी आणि मधापासून वाईन निर्मिती केली जाते. त्यामध्ये द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना फायदा व्हावा. तसेच, वाईन उद्योगाला चालना मिळावी म्हणून सुपरमार्केटमध्ये वाईन करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

ADVERTISEMENT

वाईन तयार करणाऱ्या वाईनरींना थेट सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये खरेदी करण्याची सुविधा असलेले शेल्फ-इन-शॉप या पद्धतीने विक्री करण्याची मुभा सरकारकडून देण्यात आली आहे. या निर्णयाप्रमाणे सुपर मार्केटमध्ये किेंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ-इन-शॉप पद्धतीने वाईनची विक्री करता येणार आहे. यासाठी किमान १०० चौरस मीटर क्षेत्रफळ असणाऱ्या नोंदणीकृत असलेले सुपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्येच वाईन विक्री करता येणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक व धार्मिक स्थळांजवळ असलेल्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करता येणार नाही. या दुकानांना वाईन विक्रीचा परवाना घ्यावा लागणार असून, त्यासाठी वार्षिक पाच हजार रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. तसेच दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये असे परवाने दिले जाणार नाहीत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT