‘मेंढरं’ म्हणत शिवसेनेनं शिंदे गटाला ‘५० खोके’वरून डिवचलं; नितीन गडकरींबद्दल ‘सामना’तून कुणाकडे बोट?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिल्लीच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडी, बिहारमध्ये सीबीआयची छापेमारी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपच्या संसदीय समितीतून वगळण्यात आल्याबद्दल शिवसेनेनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी-अमित शाह यांचा नामोल्लेख न करता टीकेचे बाण डागले आहेत. शिवसेनेनं सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा मेंढरं असा उल्लेख करत पुन्हा एकदा ‘५० खोके’वरून डिवचलं आहे.

ADVERTISEMENT

ऑपरेशन लोटस हा अल-कायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनलाय -शिवसेना

शिवसेनेनं म्हटलंय की, “देशाची परिस्थिती संभ्रमित झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. अशा अनेक संभ्रमित गोष्टींचे सध्या पेव फुटले आहे. सरकारे निवडून आणण्यापेक्षा विरोधकांची सरकारे पाडणे, पक्ष फोडणे असे जे सुरू आहे त्यामुळे विष्णूचे आवडते फूल ‘कमळ’ बदनाम झाले. ‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे ‘कमळ’ हा अल-कायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनला.”

ईडीसमोर शिंदे गटाने गुडघे टेकले; सामना अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?

दिल्लीतील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना शिवसेनेनं म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात ईडीच्या भयाने शिंदे गट गुडघ्यावर गेला तसे इतर राज्यांत कोणी वाकायला तयार नाहीत. सगळ्यांत महत्त्वाची घडामोड दिल्ली राज्यात घडली. ईडी, सीबीआयचा वापर करून केजरीवाल यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘आप’चे आमदार फोडण्यासाठी वीस-वीस कोटी रुपयांची ‘ऑफर’ दिल्याचा आरोप तर स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच केला आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन कमळ’ हे लोकशाही व स्वातंत्र्यासाठी किती घातक आहे हे किळसवाण्या पद्धतीने समोर आले. महाराष्ट्रात याच पद्धतीने ऑपरेशन केले गेले, पण मोठे राज्य असल्याने व शिवसेना फोडणे हाच मुख्य अजेंडा असल्याने ईडीचा धाक अधिक पन्नास ‘खोके’ अशी बेगमी केली असे सर्रास बोलले जाते. महाराष्ट्रातील मेंढरे घाबरून पळाली तसे दिल्लीचे आमदार व त्यांचे नेते पळाले नाहीत. ते भाजप व ईडीविरोधात ठामपणे उभे राहिले.”

हे वाचलं का?

“महाराष्ट्रात शिवसेना नेते संजय राऊत हे बेडरपणे ईडीला सामोरे गेले. ते मऱ्हाटी बाण्याने लढले, पण वाकले नाहीत व सच्च्या शिवसैनिकाप्रमाणे झुंजले. तसेच कडक धोरण मनीष सिसोदिया यांनी स्वीकारले. सिसोदिया हे छत्रपती शिवरायांच्या मावळ्याप्रमाणे गरजले. ‘‘मरण पत्करीन, पण शरण जाणार नाही. मला खोट्या प्रकरणात गुंतवले आहे,’’ असे संजय राऊत शेवटपर्यंत म्हणाले व तुरुंगात जाणे त्यांनी पसंत केले. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यास मदत करा, नाहीतर ईडीचा फास आवळू, अशा धमक्या त्यांनाही दिल्या गेल्या होत्या. शिवाय राऊत यांनी हा सर्व प्रसंग राज्यसभेचे तत्कालिन सभापती व्यंकय्या नायडू यांनाही कळवला होता. पण सध्या कोण कोणाचे ऐकणार? ना पेशी ना सुनवाई. तारखांचाच खेळ सुरू आहे”, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“संजय राऊतांचा आवाज दाबण्यासाठी तुरुंगात टाकलं”

“महाराष्ट्रात गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री नवाब मलिक, खासदार संजय राऊत यांचा आवाज दडपण्यासाठीच त्यांना उचलून तुरुंगात टाकले गेले. दिल्लीचे मोहल्ला क्लिनिकवाले मंत्री सत्येंद्र जैन यांना जुन्या प्रकरणात पकडले. अबकारी धोरणात सरकारी तिजोरीचा घाटा झाला म्हणून मनीष सिसोदियांवर कारवाई सुरू आहे. मग या ईडी-सीबीआयवाल्यांना आमचा प्रश्न आहे. गेल्या सात-आठ वर्षांत ज्या घिसाडघाईने सार्वजनिक क्षेत्रांच्या कंपन्या, विमानतळांची विक्री झाली त्यातून सरकारचा काय फायदा-तोटा झाला व त्यावर या तपास यंत्रणांनी कोणती कारवाई केली?”, असा सवाल शिवसेनेनं केंद्रीय यंत्रणांना केला आहे.

ADVERTISEMENT

‘मोदी-शाहांना केजरीवाल, ममता, उद्धव ठाकरे, नितीश कुमार आणि शरद पवारांची भीती’

शिवसेनेनं थेट नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा उल्लेख केलेला नाही, मात्र केंद्र सरकार आणि त्यांचे सूत्रधार असं म्हणत निशाणा साधला आहे. “बिहारात सत्तापरिवर्तन होताच राष्ट्रीय जनता दलावर सीबीआय, ईडीच्या धाडी पडाव्यात हा निव्वळ योगायोग कसा म्हणावा? पण तेजस्वी यादव यांनी थेट सांगितले ‘महाराष्ट्रात जे घडले ते बिहारात होणार नाही. बिहार घाबरणार नाही. जे डरपोक आहेत त्यांना ईडी-सीबीआयची भीती दाखवा.’ मुळात केंद्र सरकार व त्यांच्या सूत्रधारांना 2024 चे भय वाटते आहे. हे भय केजरीवाल, ममता, उद्धव ठाकरे, नितीश कुमार व शरद पवारांचे आहे. या सूत्रधारांना आपल्या सावलीचेही भय वाटते. म्हणून ते नितीन गडकरी आणि शिवराजसिंह चौहान यांच्याही मागे लागले, असे दिसते”, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

“इतके मोठे बहुमत असताना या मंडळींना भय का वाटावे? याचे उत्तर एकच. त्यांचे बहुमत निखळ नाही. ते चोरलेले आहे. म्हणून स्वातंत्र्य व लोकशाही संकटात आहे. अशा स्थितीत जे शरण जातील तेच खरे देशाचे शत्रू! धाडसत्र व सूडाची छापेमारी ही त्यांची शस्त्रे. त्याच शस्त्रांनी त्यांचे ‘ऑपरेशन कमळ’ होते, पण कमळाच्या लाभार्थींवर सरकारी छाप्यांचे वार होत नाहीत. देशाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. पण या न्यायनिवाड्यास विलंब होऊ नये, एवढीच जनतेची अपेक्षा आहे. अर्थात आज राज्यकर्त्यांचा कारभारच असा सुरू आहे की, देशात एक संभ्रमित युग अवतरले आहे. या संभ्रमित युगात आता कोण अवतार घेणार? नाहीतर जनतेलाच नरसिंहाचा अवतार धारण करावा लागेल”, असं शिवसेनेनं म्हटलंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT