आघाडीत बिघाडी ! राष्ट्रवादीच्या नेत्याची तक्रार आणि शिवसेना आमदाराचं सदस्यत्व धोक्यात
– मनिष जोग, जळगाव प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता स्थापन झाली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष राज्यात सत्तेत असले तरीही स्थानिक पातळीवर अजुनही या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं पहायला मिळत नाहीये. जळगावमध्ये याचा प्रत्यय पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. चोपडा विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना आमदार लता सोनावणे यांचं विधानसभा सदस्यत्व धोक्यात आलं […]
ADVERTISEMENT

– मनिष जोग, जळगाव प्रतिनिधी
राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता स्थापन झाली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष राज्यात सत्तेत असले तरीही स्थानिक पातळीवर अजुनही या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं पहायला मिळत नाहीये. जळगावमध्ये याचा प्रत्यय पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. चोपडा विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना आमदार लता सोनावणे यांचं विधानसभा सदस्यत्व धोक्यात आलं आहे. कारण नंदुरबार येथील जात पडताळणी समितीने सोनावणे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचं समोर येतंय.
महत्वाची गोष्ट म्हणजे, लता सोनावणेंविरुद्ध तक्रार ही महाविकास आघाडीमधल्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार जगदीश वळवी आणि अर्जुनसिंग वसावे यांनी दिली होती. त्यामुळे विधानसभेत शिवसेनेचा एक आमदार कमी होणार अशी चर्चा आता जळगावच्या स्थानिक राजकारणात सुरु झाली आहे. लता सोनावणे यांनी वळवी यांच्याविरुद्ध निवडणुक लढवली होती.
लता सोनावणे यांचं टोकरे कोळी अनुसुजित जमातीचं प्रमाणपत्र नंदुरबार जात पडताळणी समितीने अवैध ठरवलं आहे. वळवी यांनी याविरुद्ध तक्रार केली होती. आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांनी टोकरे कोळी या अनुसूचित जमाती तपासणीचा प्रस्ताव जळगाव शहर महापालिकेच्या कार्यालय अधीक्षकांमार्फत १० एप्रिल २०१९ ला समितीस सादर केला होता. त्यानंतर त्यांचा हा दावा समितीने ४ नोव्हेंबर २०२० रोजी अवैध घोषित केला होता. परंतू समितीच्या आदेशाविरुद्ध आमदार सोनवणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती.










