नवरात्र उत्सव काळात तुळजाभवानी मंदिर 22 तास खुले राहणार : मंदिर प्रशासनाचा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तुळजापूर (गणेश जाधव) : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेले तुळजाभवानी मंदिर शारदीय नवरात्र उत्सव काळात 22 तास खुले राहणार आहे. त्यामुळे 26 सप्टेंबर (घटस्थापना) ते 5 ऑक्टोबर (दसरा) या काळात भाविकांना 22 तास दर्शन घेता येणार आहे. कोरोनानंतर होत असलेल्या पहिल्याच नवरात्र उत्सवामुळे भाविकांची संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

नवरात्र उत्सवाची तुळजाभवानी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे. उत्सव काळात मंदिर मध्यरात्री 1 वाजता उघडले जाणार असून ते दुसऱ्यादिवशी रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजे 22 तास सुरु राहणार आहे. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने नवरात्र काळात लाखो भाविकांची गर्दी होण्याचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने मंदिर प्रशासन, पोलीस प्रशासन, नगर परिषद, आरोग्य विभाग ही सर्व यंत्रणा कामाला लागली असून स्वच्छता, भाविकांचे आरोग्य व सुविधा याला प्राधान्य देण्यात आले आहे.

सोललेले नारळ व सुटे तेल विक्री बंद

शारदीय नवरात्र उत्सव काळात तुळजाभवानी मंदिर परिसरात सोललेले नारळ व सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. महोत्सव कालावधीत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 17 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2022 या कालावधीत तुळजाभवानी मंदिर येथे 200 मीटर परिसरात सोललेले नारळ व सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तहसिलदार तथा मंदिर संस्थानाच्या व्यवस्थापक योगिता कोल्हे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

असा असेल नवरात्र उत्सव

तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी सुरु झाली असून 26 सप्टेंबर रोजी विधिवत पूजा करुन दुपारी 12 वाजता घटस्थापना होणार आहे. 29 सप्टेंबर रोजी देवीची रथ अलंकार पूजा, 30 सप्टेंबर रोजी ललित पंचमी असून मुरली अलंकार पूजा,1 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार पूजा, 2 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार पूजा, 3 ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी असून महिषासुर मर्दीनी अलंकार पूजा तर 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे. 9 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT