विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड, ‘बॅरिस्टर’ अजरामर करणाऱ्या अभिनेत्याची एक्झिट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं आहे. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना 15 दिवसांपासून या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण शनिवारी, दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, मात्र शनिवारी प्रकृती बिघडली आणि त्यांचं निधन झालं. आज संध्याकाळी 6 च्या सुमारास त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ADVERTISEMENT

अभिनय आणि संगीत या दोन्हीचा जन्मजात वारसा

अभिनयाचा आणि संगीताचा जन्मजात वारसा लाभलेल्या या अभिनेत्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसंच नाट्यसृष्टीतही अढळपद निर्माण केलं. सर्वगुणसंपन्न कलावंत म्हणजेच अभिनेते विक्रम गोखले. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या नायिका म्हणून लौकिक असलेल्या कमलाबाई गोखले या त्यांच्या आजी आणि चरित्रनायक म्हणून ठसा उमटविणारे चंद्रकांत गोखले हे त्यांचे वडील. कलाप्रेमी कुटुंबात आणि हेमावती गोखले या आईच्या संस्कारात विक्रम गोखले यांच्या मनात कलेवरची निष्ठा रुजणे स्वाभाविक होते.

हे वाचलं का?

बॅरिस्टर हे त्यांचं रंगभूमीवरचं अजरामर नाटक

वडिलांपासून अभिनयाचा वारसा मिळणारे विक्रम गोखले यांचं नाव आजही घेतलं तरी त्यांच्या चाहत्यांना ‘बॅरिस्टर’ या नाटकामधील त्यांचा दमदार परफॉर्मन्स आठवतो. अभिनयाचा वारसा घरातूनच लाभलेल्या विक्रम चंद्रकांत गोखले यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूल व वि. र. वेलणकर हायस्कूल येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील एम.ई.एस. (आताचे आबासाहेब गरवारे) महाविद्यालयात झाले. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

बालवयातच नाटकांमध्ये काम करण्यास केली सुरूवात

बालवयातच त्यांनी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. बालकलाकार म्हणून त्यांनी ‘आग्य्राहून सुटका’, ‘राजसंन्यास’, ‘बेबंदशाही’ या नाटकांमध्ये भूमिका केल्या. तर याच काळात त्यांनी ‘शेवग्याच्या शेंगा’ या चित्रपटात पहिल्यांदा अभिनय केला. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक होय. मराठी चित्रपटात नायक म्हणून ‘अनोळखी’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. स्पष्ट आणि स्वच्छ शब्दोच्चार, उत्तम संवादफेक, देखणे-रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि अभिनयातील सहजता या त्रिवेणी संगमातून मराठी आणि हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

दिग्गज कलाकारांसोबत विक्रम गोखले यांनी केलं काम

‘बाळा गाऊ कशी अंगाई’ या चित्रपटात आशा काळे, नयनतारा, सतीश दुभाषी अशा कलाकारांबरोबर विक्रम गोखले यांची भूमिकाही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. १९८९मधील ‘कळत नकळत’ आणि १९९१साली प्रदर्शित झालेल्या ‘माहेरची साडी’ या दोन्ही मराठी चित्रपटांत परस्परांहून वेगळ्या भूमिका त्यांनी ताकदीने उभ्या केल्या. याशिवाय ‘कुंकू’, ‘मुक्ता’, ‘लपंडाव’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. तसेच ‘वर्‍हाडी आणि वाजंत्री’, ‘बिजली’, ‘आधारस्तंभ’ आदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या. ‘वजीर’ (१९९४) या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना ‘फिल्मफेअर’ अ‍ॅवॉर्ड मिळाले.

आघात या सिनेमाचं विक्रम गोखलेंनी केलं दिग्दर्शन

डॉक्टरी पेशावर आधारित कथेवर ‘आघात’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. ‘अनुमती’ या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना २०१३मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच ‘कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ आणि ‘न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्येही त्यांना या चित्रपटातील अभिनयासाठी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

हिंदी सिनेमांतही आपल्या अभिनयाचा ठसा विक्रम गोखलेंनी उमटवला

नामांकित निर्मिती संस्थांच्या हिंदी चित्रपटांतही विक्रम गोखले यांनी आपल्या हिंदी शब्दोच्चारांनी आणि सहजसुंदर, परिपक्व अभिनयाने आपला ठसा उमटविला आहे. ‘इन्साफ’, ‘खुदा गवाह’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘हे राम’, ‘भुलभुलैया’, ‘मदहोशी’, ‘तुम बिन’, ‘चॅम्पियन’, ‘लाडला’, ‘हसते हसते’, ‘शाम घनश्याम’, ‘अग्निपथ’, ‘ईश्वर’, ‘सलीम लंगडे पे मत रो’, ‘मिशन ११ जुलै’, ‘सो झूठ एक’, ‘गफला’, ‘धुवाँ’ या हिंदी चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या.

रंगभूमीवरची कारकीर्दही गाजलेलीच

विक्रम गोखले यांनी ‘अपराध मीच केला’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘जास्वंदी’, ‘स्वामी’, ‘महासागर’, ‘जावई माझा भला’, ‘बॅरिस्टर’, ‘दुसरा सामना’, ‘आणि मकरंद राजाध्यक्ष’, ‘संकेत मिलनाचा’, ‘खरं सांगायचं तर’, ‘आप्पा आणि बाप्पा’, ‘नकळत सारे घडले’ इ. नाटकांत मुख्य भूमिका केल्या होत्या. विजया मेहता यांच्या ‘बॅरिस्टर’ नाटकातील त्यांची मध्यवर्ती भूमिका खूप गाजली. कोणत्याही भूमिकेशी समरस होऊन ताकदीने ती भूमिका जिवंत करण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. कामावर असलेल्या निष्ठेने आणि समर्पणाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. ‘ढाई अक्षर प्यार के’, ‘जरा मुस्करा दो’ या हिंदी नाटकांशिवाय ‘दूरदर्शन’ मालिकांमध्येही त्यांचा सहभाग आहे. ‘विरुद्ध’ या मालिकेतील ‘धीरेंद्रराय सिंघानिया’ या त्यांनी साकारलेल्या भूमिकेची खूप चर्चा झाली. ‘जीवनसाथी’, ‘संजीवनी’, ‘मेरा नाम करेगी रोशन’ या हिंदी मालिका आणि ‘या सुखांनो या’, ‘अग्निहोत्र’ या मराठी मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केलेला आहे.

मराठी आणि हिंदीसह त्यांनी १७गुजराती, दोन तामिळ तसंच एक कन्नड या भाषांतील चित्रपटांतूनही काम केले. आपल्या परीने ते लेखनही करतात. नाट्य-चित्रपट संदर्भातील विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे येथे अतिथी प्राध्यापक म्हणून ते व्याख्याने देतात. अभिनय क्षेत्रात भारदस्त कामगिरी करतानाही सामाजिक भान आणि खरेपणा जपणार्‍या या मनस्वी कलाकाराने ‘पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’चीही स्थापना केलेली आहे. तसेच त्यांना छायाचित्रणाचाही छंद आहे. चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन मालिकांमध्ये व्यग्र असले, तरी एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून त्यांच्याकडे सभोवतालचे भान आणि चिंतन निश्चित आहे.

विजया मेहता यांच्या तालमीत तयार झालेल्या शिष्यांमध्ये विक्रम गोखले हे एक बिनीचे शिलेदार होते. काही वर्षांपूर्वी विक्रम गोखले हे ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. परंतु, शारीरिक कारणांमुळे विक्रम गोखले यांनी या नाटकाचे प्रयोग करणं थांबविलं. २०१३साली ‘अनुमती’ या सिनेमासाठी विक्रम गोखले यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच २०१२साली रंगभूमीवरील योगदानाबद्दल त्यांना ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने गौरविण्यात आले. अशा दिग्गज अभिनेत्याच्या जाण्याने भारतीय सिनेसृष्टीचं अतोनात नुकसान झालं आहे. विक्रम गोखलेंना भावपूर्ण आदरांजली..

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT