सिंधुदुर्गात भाजप पदाधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून फुलविक्रेता आफताब शेखची आत्महत्या, रोहित पवारांचा आरोप
Rohit Pawar on Aftab Sheikh suicide case : सिंधुदुर्गात भाजप पदाधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून फुलविक्रेता आफताब शेखची आत्महत्या, रोहित पवारांचा आरोप
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सिंधुदुर्गात भाजप पदाधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून फुलविक्रेता आफताब शेखची आत्महत्या
रोहित पवारांचे फेसबुक पोस्ट करत गंभीर आरोप
सिंधुदुर्ग : बांदा मुस्लिमवाडी येथील रहिवासी आफताब कमरुद्दिन शेख (वय 38) याने काही दिवसांपूर्वी व्हिडिओ बनवत राहत्या घरी गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून गोवा बांबोळी येथे नेत असताना त्याचे निधन झाले. मात्र त्याने आत्म्यापूर्वी बनवलेला व्हिडिओ नातेवाईकांच्या हाती लागला. त्यात बांदा येथील काहीजणांची नावे घेतलीत. ते आपल्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा उल्लेख केल्याने नातेवाईक संप्तत झाले. जोपर्यंत त्या सर्वांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्याच्या कुटुंबियांनी घेतली होती. दरम्यान, या प्रकरणावर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवारांचे भाजपवर गंभीर आरोप
रोहित पवार म्हणाले, कट्टरपंथीय आणि भाजप कार्यकर्त्यांचा उच्छाद टोकाला गेला असून सावंतवाडीमधील बांदा येथील फुलविक्रेता आफताब शेख या तरुणाने स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. यापूर्वीही त्रास देऊन ८ महिने त्याला फुलाचं दुकान सुरु करु दिलं नाही, त्यामुळं कुटुंबंही अडचणीत आलं. दुकान सुरू करण्याचा प्रयत्न केला तर त्रास देण्यात आला आणि याच जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. ही आत्महत्या नाही तर सरकार पुरस्कृत हत्याच आहे. कट्टरपंथी उजवे असो किंवा डावे, दोन्हीही लोकशाहीसाठी मारकच आहेत. गृहमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन या कथित कट्टरपंथीयांवर कठोर कारवाई करुन त्यांना वेसन घालावी अन्यथा लोकांनीच यांना रस्त्यात तुडवलं तर त्याची जबाबदारी सरकारवर राहील, असंही रोहित पवारांनी नमूद केलं.
हेही वाचा : भारताने महिला विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर पाकिस्तानच्या शोएब अख्तरने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
बांदा शहरात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात आफताब शेख याचा फुल विक्रीचा व्यवसाय होता. त्याने राहत्या घरात बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र बाजूच्याच रुममध्ये असलेल्या त्याच्या बायकोला संशय आल्याने तिने खिडकीतून पाहीले. नवरा आत्महत्या करत असल्याचे पाहताच तिने आरडा ओरड करत घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या दीर अब्दुल रझाक याला बोलावून आणले. त्याने खाली येत दरवाजा तोडला व आतमध्ये जात आफताब याला गळफासावरुन खाली काढले. त्याला तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता हलविले. तेथे उपचार केल्यानंतर त्याला अधिक उपचाराकरिता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविले. तेथून अधिक उपचाराकरिता गोवा बाबुंळी येथे हलवित असतांना त्याचे निधन झाले. याच दरम्यान त्याने आत्महत्येपूर्वी केलेला व्हिडीओ नातेवाईकांच्या हाती लागला. त्यात त्याने पाच जणांची नावे घेत आपल्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.










