मोठ्या पडद्यावरील 'खाष्ट सासू'... दिग्गज अभिनेत्री दया डोंगरेंचं निधन!
जेष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे आज (3 नोव्हेंबर) निधन झाले. नाटक, सिनेमात आपल्या अष्टपैलू कामगिरीने छाप सोडली. जाणून घेऊया त्यांच्या कारकीर्दीविषयी सविस्तर.
ADVERTISEMENT

मुंबई: रुपेरी पडद्यावरची खाष्ट सासू अशी ओळख असलेल्या जेष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे आज (3 नोव्हेंबर) रोजी निधन झाले. मराठी चित्रपटातील खाष्ट सासू आणि करारी स्त्री, थोडी आधुनिक तर कधी हेकेखोर अशा भूमिकांची आठवण होताच डोळ्यासमोर नाव उभं राहतं अभिनेत्री दया डोंगरे यांचे. ललिता पवार यांच्यानंतर मराठीतील खाष्ट सासू म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या म्हणजे दया डोंगरे. दया डोंगरे यांना गायिका व्हायचे होते. नागेशबुवा खळीकर यांच्याकडे काही काळ शास्त्रीय संगीत तर हरिभाऊ देशपांडे यांच्याकडे त्या नाट्यसंगीतही शिकल्या. त्या अवघ्या 12 वर्षांच्या असताना आकाशवाणी धारवाड केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात खास त्यांचे गाणे सादर झाले होते. आकाशवाणीने आयोजित केलेल्या अखिल भारतीय सुगम संगीत स्पर्धेत त्यांचा प्रथम क्रमांक आलेला. या पुरस्काराचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
दया डोंगरेंची समृद्ध कारकीर्द
अभिनयाने त्यांच्या गाण्यावर मात केली आणि गाणे मागे पडले. तसे झाले नसते तर आज कदाचित दया डोंगरे यांचे नाव ज्येष्ठ गायिका म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित झाले असते. दया डोंगरे आजही दररोज सकाळी अर्धा ते पाऊण तास रियाज करायच्या. आपल्या वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे दया डोंगरे यांचे शिक्षण काही काळ धारवाड, त्यानंतर पुणे व दिल्ली येथे झाले. शाळेच्या स्नेहसंमेलनात त्या उत्साहाने भाग घेत असत, पण ते तेवढंच. अभिनयाचा वारसा त्यांना आपल्या आई यमुताई मोडक यांच्या कडून मिळाला. यमुताई मोडक यांनी त्या काळात हौशी रंगभूमीवर ‘किचकवध’, हाच मुलाचा बाप’ आदी नाटकातून काम केले होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दया डोंगरे यांची आत्या शांता मोडक या त्या काळच्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी बालगंधर्वाच्या नाटक कंपनीत त्यांना नाटकातून काम केले होते.
शांता मोडक यांना त्या काळी दामुअण्णा मालवणकर यांनी एक हजार रुपये पगार दिला होता. त्यांचा वारसा चालवायची संधी दया डोंगरे यांना होती. पण त्यांनी आत्याच्या ओळखीचा कधी शिडी म्हणून वापर केला नाही. महाविद्यालयीन जीवनात दया डोंगरे यांनी विशेष चमक दाखविली. सरकारी नाट्यस्पर्धेत मो. ग. रांगणेकर लिखित "रंभा' या नाटकात त्यांनी इतके अप्रतिम काम केले की त्यांना त्यासाठी प्रशस्तिपत्र मिळाले. पुण्यात आल्यानंतर मग मॉडर्न हायस्कूल व फर्ग्युसन महाविद्यालय येथे त्यांचे शिक्षण झाले. त्याच काळात त्यांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धाही गाजवल्या होती. अर्थातच महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्या दिल्लीत "एनएसडी' मध्ये नाटकाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी दाखल झाल्या, पण त्या वेळी त्यांनी संसारातही प्रवेश केल्याने त्यांना आपले शिक्षण एका वर्षातच आटोपते घ्यावे लागले.
याच काळात सई परांजपे, सुधा शिवपुरी आणि विनायक चासकर ही मंडळी "एनएसडी'मध्ये दाखल झाली होती. तेथील शिक्षणानंतर सई परांजपे आणि अरुण जोगळेकर यांनी नाट्यद्वयी या संस्थेमार्फत विविध नाटकांचे प्रयोग सुरू केले. त्यात दया डोंगरे काम करत असत. तुझी माझी जोडी जमली रे, नांदा सौख्य भरे, याचसाठी केला होता अट्टहास, इडा पिडा टळो यांसारख्या नाटकांत दया डोंगरे यांनी आपली चमक दाखवली होती. दया डोंगरे यांच्या घरात त्यांच्या वडिलांना गायन-वादनाची हौस होती. त्यांचे पणजोबा कीर्तनकार होते. १९६९ च्या सुमारास त्या मुंबईला आल्या आणि मग त्यांची व्यावसायिक रंगभूमीवर घोडदौड सुरू झाली.










