'मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल पण...', शिंदेंच्या मराठी आमदारने उडवली खळबळ
शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मराठी भाषेवरील वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वातावरण तापले आहे. पाहा त्यांनी नेमकं काय विधान केलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: शिंदे गटाच्या शिवसेनेचे मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रकाश सुर्वे यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे. सुर्वे यांनी मराठी भाषेला 'आई' आणि उत्तर भारताला 'मावशी' म्हणून संबोधले आणि "एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे, कारण मावशी जास्त प्रेम करते," असे विधान केले. हे वक्तव्य उत्तर भारतीय समुदायाच्या एका कार्यक्रमात केले गेले असून, ते मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे आता बोलले जात आहे.
वक्तव्याचा संदर्भ आणि पार्श्वभूमी
प्रकाश सुर्वे हे शिंदे गटाचे आमदार आणि प्रमुख नेते असून, त्यांनी हे विधान एका उत्तर भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमात उत्तर भारतीयांच्या योगदानाबाबत बोलताना सुर्वे म्हणाले, "आमचं आणि उत्तर भारतीयांचं नातं खूप जुनं आहे. मराठी ही माझी आई आहे, तर उत्तर भारतीय ही माझी मावशी आहे. आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे. कारण मावशी जास्त प्रेम करते." त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
हे वक्तव्य मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मुंबईत अमराठी, विशेषत: उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठी आहे आणि ती निर्णायक ठरू शकते. शिंदे गटाच्या नेत्यांकडून अशा प्रकारची विधाने करून अमराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. यापूर्वीही सुर्वे यांनी विविध वादग्रस्त विधाने केली आहेत. मात्र, हे नवे वक्तव्य मराठी अस्मितेशी थेट संबंधित असल्याने याचे आता अधिक पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
राजकीय प्रतिक्रिया आणि टीका
प्रकाश सुर्वेंच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनेक पक्षांनी सुर्वेंच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी ट्विटरवरून टीका करत म्हटले की, "हिंदी प्रेमाची उकळी फुटली, प्रतापरावांनी लाजच विकली, मराठी भाषेची करून विटंबना." हे ट्विट मराठी भाषेच्या समर्थकांमध्ये लोकप्रिय झाले आहे.










