दिल्ली कोर्ट गोळीबार : मुंबई कोर्टात दाऊदचा हस्तक डेव्हिड परदेशीने जेव्हा गोळीबार केला होता…
राजधानी दिल्लीत आज कोर्टाच्या आवारात कुख्यात गुंडांनी वकीलाच्या वेशात येऊन गोळीबार केल्यामुळे तणावाचं वातावरण पहायला मिळालं. रोहिणी न्यायालयाच्या परिसरात झालेल्या या गोळीबारात मोस्ट वाँटेड जितेंद्र गोगीची हत्या करण्यात आली. या गोळीबारामुळे मुंबईत ३८ वर्षांपूर्वी झालेल्या गोळीबाराचा किस्सा आणि त्याची चर्चा होत आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा हस्तक डेव्हीड परदेशीने मुंबईच्या सेशन कोर्टात अमिरझादा खानची गोळ्या […]
ADVERTISEMENT
राजधानी दिल्लीत आज कोर्टाच्या आवारात कुख्यात गुंडांनी वकीलाच्या वेशात येऊन गोळीबार केल्यामुळे तणावाचं वातावरण पहायला मिळालं. रोहिणी न्यायालयाच्या परिसरात झालेल्या या गोळीबारात मोस्ट वाँटेड जितेंद्र गोगीची हत्या करण्यात आली.
ADVERTISEMENT
या गोळीबारामुळे मुंबईत ३८ वर्षांपूर्वी झालेल्या गोळीबाराचा किस्सा आणि त्याची चर्चा होत आहे.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा हस्तक डेव्हीड परदेशीने मुंबईच्या सेशन कोर्टात अमिरझादा खानची गोळ्या झाडून हत्या केली होती.
हे वाचलं का?
तो काळ मुंबईत अंडरवर्ल्डचा काळ म्हणून ओळखला जायचा. दाऊद आणि पठाण या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्ववादाच्या लढाईतून अनेक गुंडांनी आपले प्राण गमावले.
दाऊद इब्राहीमने आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी डेव्हीड परदेशीकरवी अमिरझादाची हत्या घडवून आणली. मुंबईच्या इतिहासात कोर्टाच्या आवारात झालेली ती पहिली गोळीबाराची केस म्हणून ओळखली जाते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
६ सप्टेंबर १९८३ रोजी तत्कालीन पोलीस सब-इन्स्पेक्टर इसाक बागवान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अमिरझादाला सेशन कोर्टात आणलं. अमिरझादावर दाऊदचा भाऊ शब्बीर इब्राहीमच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप होता.
इसाक बागवान यांच्या टीमने अमिरझादा सोबत त्याचा साथीदार जफर जमाल सिद्दीकी ला कोर्टासमोर हजर केलं. त्यावेळी अमिरझादाने टी-शर्ट आणि निळ्या रंगाची ट्राऊझर घातली होती.
सेशन जज एस.व्ही.जोशी यांच्या न्यायालयात यावेळी सुनावणी होत असताना २० वर्षांचा डेव्हीड परदेशी अमिरझादाची हत्या करण्यासाठी टपून बसला होता.
कोर्टातली गर्दी आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त चुकवून डेव्हीड परदेशीने आपल्या शर्टात लपवलेली रिव्हॉल्वर काढून अमिरझादावर तीन गोळ्या झाडल्या.
अमिरझादाला छातीमध्ये, पोटात आणि मानेवर गोळी लागली ज्यामुळे कोर्टाच्या आवारात रक्ताचा सडा पडला होता.
अचानक झालेल्या या गोळीबारामुळे कोर्टात धांदल उडाली होती. प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पडत होता. अमिरझादाची हत्या केल्यानंतर डेव्हिड परदेशीही पळून जाण्याच्या प्रयत्नात होता.
पहिल्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या डेव्हीड परदेशीला इसाक बागवान यांनी पाहिलं आणि त्यांनी तात्काळ आपल्या सर्विस रिव्हॉल्वर मधून त्याच्या दिशेने गोळी झाडली. इसाक बागवान यांची गोळी डेव्हीड परदेशीच्या उजव्या मांडीजवळ लागली आणि तो खाली पडला. ज्यानंतर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं.
दिल्ली हादरली! वकिलाच्या वेशात आले गँगस्टर; न्यायालयाच्या परिसरातच गोळीबार, चार ठार
मुंबईच्या चेंबूर परिसरातील टिळक नगर भागात राहणारा डेव्हिड परदेशी हा बेरोजगार होता. दाऊदने या कामासाठी त्याची निवड करत आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेतला. या गोळीबारानंतर मुंबईच्या अंडरवर्ल्डमधलं चित्र बदललं.
१२ फेब्रुवारी १९८३ रोजी दाऊद इब्राहीमचा भाऊ शब्बीर इब्राहीमची पठाण गँगने प्रभादेवी भागात हत्या केली होती. या हत्येत मन्या सुर्वे, अमिरझाजा, आलमझेब, सिद्दीकी आणि इतर दोन साथीदार सहभागी होते. यानंतर पठाण गँगने दाऊदचीही हत्या करण्याचा प्लान आखला होता. परंतू त्यांना यात अपयश आलं.
दिल्ली कोर्टात आज झालेल्या शूटआऊटमुळे मुंबईकरांना डेव्हीड परदेशी आणि त्याने भर कोर्टात झाडलेल्या गोळ्यांची आठवण नक्कीच आली असेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT