दंगलीत घर जळालेल्या खेळाडूला जेव्हा MCA आधार देतं…

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

माजी मुंबईकर आणि टीम इंडियाचा ओपनर वासिम जाफरवर उत्तराखंड क्रिकेट संघटनेने संघात फक्त मुस्लीम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप केला. या गोष्टीवरुन गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा सुरु आहे. वासिमने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडत…सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि त्याने उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामाही दिला. आपल्या प्रदीर्घ करिअरमध्ये वासिमने मुंबई आणि विदर्भाचं प्रतिनिधीत्व केलं. क्रिकेट हाच आपला धर्म मानणारा वासिम वयाच्या चाळीशीपर्यंत खेळत राहिला.

आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत वासिमने खेळामध्ये कधीही धर्म येऊ दिला नाही. अशा खेळाडूवर धर्माचे आरोप लावणं ही खरंच दुर्दैवी बाब आहे. मुंबई आणि मुंबई क्रिकेट संघाचं वातावरण हे नेहमी धर्मनिरपेक्ष राहिलं आहे. हिंदू, मुस्लीम, शिख, पारशी अशा अनेक धर्माच्या खेळाडूंनी मुंबईचं प्रतिनिधीत्व केलं. पण मैदानावर उतरल्यानंतर कधीही खेळाडूंचा धर्म त्यांच्यासोबत आला नाही. बाबरी मशिदीच्या पतनानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात धार्मिक दंगली उसळल्या. परंतू अशा खडतर परिस्थितीतही मुंबई क्रिकेट असोसिएशनने आपल्या संघाकडून खेळणाऱ्या एका मुस्लीम खेळाडूची काळजी घेतली होती.

ही गोष्ट आहे इक्बाल बद्रुद्दीन खान याची. १९८६ ते १९९९ अशा अंदाजे १२-१३ वर्षांच्या कारकिर्दीत इक्बाल स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई आणि आसामकडून खेळला. फटकेबाजी करणारी बॅटींग आणि ऑफ स्पिन बॉलिंग हे इक्बाल खानचं वैशिष्ट्य होतं. मुंबईकडून खेळताना इक्बाल सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचा सहकारी होता. ३६ मॅचमध्ये जवळपास ३५ च्या सरासरीने इक्बालने १ हजार ३८६ रन्स काढल्या. १९९१ च्या मोसमात महाराष्ट्राविरुद्ध इक्बालने १०५ रन्सची इनिंग खेळली. रणजी क्रिकेटमधलं इक्बालचं हे एकमेव शतक होतं. याशिवाय १० अर्धशतकंही त्याच्या नावावर आहेत. मुंबईनंतर आसामकडूनही इक्बाल रणजी स्पर्धेत खेळला. त्याच्या ऑफस्पिनने ४९ विकेट घेतल्या. त्रिपुराविरुद्ध ३४ रन्समध्ये ५ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बाबरी मशीद उध्वस्त झाल्यानंतर देशभरात दंगलीचा आगडोंब उसळला. मुंबईत देखील प्रचंड जाळपोळ, दंगे उसळले. गिरगाव हा तर मराठी-गुजराती बहुल वस्तीचा विभाग होता. चर्नी रोड, मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या बडा कब्रस्तानच्या आसपास मुस्लीम वस्ती होती. इक्बाल खानचं घरही याच भागात होतं. बाबरी पडल्यानंतर उसळलेल्या दंगलीत या मुस्लीम मोहल्ल्यालाही त्याची झळ बसली. इक्बालच्या घराचं नुकसान झालं, त्याच्या कुटुंबाची आबाळ झाली.

तो काळ राजकीय आणि सामाजिक दृष्टीकोनातून इतका खडतर होता की लोकं घराबाहेर पडताना घाबरत होती. परंतू अशा परिस्थितीतही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी धाडस दाखवून इक्बाल आणि त्याच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला. मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये तत्कालीन संयुक्त चिटणीस पदावर काम करणारे बाळ महाडदळकर आणि कार्यकारणी सदस्य हेमंत वायंगणकर यांनी एमसीएकडून इक्बालच्या परिवाराची काहीकाळासाठी राहण्याची व्यवस्था केली होती. कालांतराने मुंबईतलं वातावरण निवळलं.

ADVERTISEMENT

इक्बालने आपल्या छोटेखानी कारकिर्दीतली शेवटची वर्ष आसामकडून खेळण्याचा निर्णय घेतला. आसामनंतर इक्बाल इंग्लडकडून काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. सध्या इक्बालचं वास्तव्य हे इंग्लंडमध्येच आहे. परंतू धार्मिक दंगलीच्या वातावरणातही आपल्या खेळाडूची काळजी कशी घ्यायची असते हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी दाखवून दिलं.

ADVERTISEMENT

वासिम जाफरच्या नसानसांमध्ये क्रिकेट भिनलं आहे. असे खेळाडू हे नेहमी खेळाचा आधी विचार करतात. धर्म ही गोष्ट त्यांच्यासाठी मैदानावर कधीच आडवी येत नाही. भारतीय संघाकडून टेस्ट मॅच खेळताना, इंग्लंडकडून काऊंटी क्रिकेट खेळत असतानाही वासिम वेळात वेळ काढून कांगा लिग क्रिकेट खेळायचा. काही वर्षांपूर्वी कांगा लिग स्पर्धेला वेगळं महत्व असायचं. सध्या या स्पर्धेकडे खेळाडूंनी पाठ फिरवली आहे. पण स्पर्धा कोणतीही असो वासिम कधीही क्रिकेट खेळण्यासाठी हजर असायचा. खेळाप्रती निष्ठा दाखवणारा हा अस्सल मुंबईकर धर्माच्या नावाने एखाद्या खेळाडूला प्राधान्य देईल ही बाब कोणाच्या पचनी पडणारच नाही.

गेली अनेक वर्ष वासिम जाफर मुंबई तसेच नॅशनल क्रिकेट क्लबकडून (क्रॉस मैदान) इमाने इतबारे क्रिकेट खेळला. त्याचं करिअर मी जवळून पाहिलं आहे. मुंबईत असताना वासिमने कधीच आपण मुस्लिम आहोत किंवा नमाज पठन असे कोणतेही मुद्दे आपल्या सरावादरम्यान आणल्याचं मला आठवत नाही. वासिमला मी लहानपणापासून ओळखतो. त्याच्यात क्रिकेट खेळण्याची प्रचंड ओढ होती आणि त्याचं फळ त्याला मिळालंच. कसोटीपटू झाल्यानंतरही नॅशनल क्रिकेट क्लबसाठीही जेव्हा वेळ असेल तेव्हा वासिम जाफर खेळायला यायचा. खास कौतुकाची बाब म्हणजे आपल्या व्यस्त कार्यक्रमातून, इंग्लिश क्रिकेट क्लबकडून खेळल्यानंतरही वासिम एका कॉलवर आमच्या क्लबकडून कांगा लिग खेळायला हजर असायचा. आता ही बाब दुर्मिळ झालीये. क्रिकेटवर सर्वस्वी निष्ठा दाखवणाऱ्या वासिमवर जे आरोप होतायत त्याने मी व्यथित झालो आहे.

विद्याधर पराडकर, (नॅशनल क्रिकेट क्लबचे तत्कालीन प्रशिक्षक)

वासिम जाफर हा माझा मुंबई संघातला जुना-जाणता विश्वासू सहकारी. मुंबईसाठी वासिम बरोबर मी अनेक सामने खेळलो असून माझ्या नेतृत्वाखाली मुंबईला रणजी ट्रॉफी मिळवून देण्यात वासिमची मोलाची भूमिका राहीलेली आहे. वासिमबरोबर फलंदाजी करण्याचा आनंद काही औरच असायचा. सध्या वासिमवर जे आरोप केले जातायत त्यात मला तथ्य वाटत नाही. कारण आम्ही अनेक वर्ष मुंबईची ड्रेसिंग रुम शेअर केली आहे. मुंबई बाहेरही आमची अनेक वर्ष मैत्री आहे. यात वासिमने कधीच धर्म मध्ये आणल्याचं मला आठवत नाही.

अमोल मुझुमदार, (वासिमचा मुंबईकर सहकारी)

    follow whatsapp

    ADVERTISEMENT