बुलढाणा : सरकारच्या आश्वासनानंतर रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला अनुक्रमे ८ हजार आणि १२ हजाराचा भाव मिळाला यासाठी सुरु केलेलं अन्नत्याग आंदोलन स्वाभिमानी नेते रविकांत तूपकर यांनी स्थगित केलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून तुपकरांच्या या आंदोलनाची शासन पातळीवर कोणीही दखल घेतली नाही. परंतू शुक्रवारी संध्याकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे प्रशासनाला जाग आली.

बुलढाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आंदोलनाची दखल घेत तुपकरांना लेखी आश्वासन देऊन अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं आहे. रविकांत तुपकर यांनी 17 नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नागपूर येथील संविधान चौकात अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला होता, मात्र कायदा व सुव्यवस्था आणि कोविड नियमांचा आधार घेऊन नागपूर पोलिसांनी त्यांचे आंदोलन दडपून त्यांना बुलडाणा येथील आपल्या निवासस्थानी आणून सोडले होते, मात्र रविकांत तुपकर यांनी आपले अन्नत्याग आंदोलन राहत्या निवासस्थानी सुरूच ठेवले.

हे आंदोलन सुरू असताना तीन दिवसापर्यंत कुठलीच दखल घेतली गेली नाही, त्यामुळे 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष रफिक शेख यांनी अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, यावेळी पोलिसांनी त्यांचा हा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला, शेतकऱ्यांसाठी तुपकर हे गेल्या तीन दिवसापासून अन्नत्याग सत्याग्रह करत आहेत आणि अजूनही शासन त्याची दखल घेत नाही, त्यांची प्रकृती खालावत चालली आहे, त्यामुळे शासनाला जर शेतकऱ्याचे बलिदान हवे असेल तर आम्ही आत्मदहन करून बलिदान द्यायला तयार आहोत असा पवित्रा या वेळेत रफिक शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी वाहन पेटवून देण्याचा प्रयत्न केल्यानंतर आज सकाळी 10 वाजता च्या सुमारास पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलन स्थळाला भेट देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला आणि परिस्थिती सांगितली, त्यांनी सांगितल्याप्रमाणे बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये या मागण्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीद्वारे या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, त्याच बरोबर केंद्राशी संबंधित असलेल्या मागण्या ह्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीमध्ये पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

यानंतर तुपकरांनी आपलं आंदोलन मागे घेतलं, सध्या त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT