मुस्लिम मौलानांनी गायलं महाभारतचं टायटल साँग, लोक म्हणाले 'मेरा भारत महान!'

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हीडिओ, नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
मुस्लिम मौलानांनी गायलं महाभारतचं टायटल साँग, लोक म्हणाले 'मेरा भारत महान!'

90 च्या दशकात रामायण आणि महाभारत या दोन्ही मालिका मोठ्या प्रमाणावर पाहिल्या जात असत. लोकांच्या मनात अजूनही या दोन्ही मालिकांच्या आठवणी ताज्या आहेत. यातल्या महाभारताची आठवण एका व्हीडिओमुळे पुन्हा एकदा झाली आहे. एका मुस्लिम वृद्ध व्यक्तीचा हा व्हीडिओ आहे. ज्यामध्ये हे चाचा महाभारताचं टायटल साँग अथ श्री महाभारत कथा हे म्हणत आहेत.

या मुस्लिम व्यक्तीचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आपल्या भारताची हीच खासियत आहे असं नेटकरी म्हणत आहेत. भारताचे माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी हा व्हीडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. स्‍टीरियोटाइप्‍स तोड़ते हुए असं कॅप्शन देऊन त्यांनी हा व्हीडिओ पोस्ट केला. जो त्यानंतर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. महाभारत ही बी. आर. चोप्रा दिग्दर्शित मालिका होती. राही मासूम रझा यांनी महाभारताची पटकथा आणि संवाद लिहिले होते.

पंडित नरेंद्र शर्मा यांनी हे गीत लिहिलं होतं. तसंच अथ श्री महाभारत कथा हे गाणं महेंद्र कपूर यांनी गायलं होतं. हे गाणं संपूर्ण त्यातल्या श्लोकांसहीत यदा यदाही धर्मस्य या श्लोकासहीत हे चाचा गाणं म्हणत आहेत. एवढंच नाही तर त्यांनी शंखध्वनीचाही आवाज काढला आहे. त्यांच्या या कृतीचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होतं आहे.

अनेकांनी मेरा भारत महान अशीही प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही तर या व्हीडिओत काही लोक मंत्रमुग्ध होऊन हे गाणं ऐकत आहेत. तसंच या चाचांची प्रशंसा करत आहेत टाळ्या वाजवत आहेत असंही दिसतं आहे. सोशल मीडियावर या चाचांचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांच्यासह अनेकांनी हा व्हीडिओ रिट्विट केला आहे. वेलडन मौलाना साहाब मै आपसे प्रभावित हूँ असंही एस. वाय. कुरेशी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अनेकांनी आम्हाला आमचं बालपण आठवलं असं म्हणत या मौलानांना धन्यवाद दिले आहेत. हे मौलाना चाचा म्हणजे सच्चे हिंदुस्थानी आहेत असा रिप्लाय काही नेटकऱ्यांनी दिला आहे. तर अनेकांनी आमच्या लहानपणीच्या आठवणी या मौलाना चाचांनी पुन्हा एकदा ताज्या केल्या आहेत असंही म्हटलं आहे. खूपच सुंदर अशाही काही कमेंट्स या व्हीडिओला देण्यात आल्या आहेत. एक हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हीडिओ रिट्विट केला आहे. तर मौलाना चाचांचे संस्कृत उच्चारही किती सुंदर आहेत असंही म्हणत काही नेटकऱ्यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे.

Related Stories

No stories found.