सोलापूर : अनैतिक संबंधाचा संशय, पाळत ठेवली अन् शेवटी वळसंग येथील ड्रायव्हरला शेजाऱ्याने क्रूरपणे संपवलं
Solapur Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण वाघमारे याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय गावातीलच रविकुमार भीमाशंकर पुटके याला होता. या संशयामुळे आरोपी अनेक दिवसांपासून लक्ष्मणवर पाळत ठेवून होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोलापूर : अनैतिक संबंधाचा संशय, शेजाऱ्याने पाळत ठेवली
अन् शेवटी वळसंग येथील ड्रायव्हरला शेजाऱ्याने क्रूरपणे संपवलं
Solapur Crime News : सोलापूर जिल्ह्यातील वळसंग गावात अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आठवडा बाजाराच्या दिवशीच गर्दीच्या ठिकाणी हा थरकाप उडवणारा प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. लक्ष्मण वसंत वाघमारे (वय 35, रा. वळसंग, ता. दक्षिण सोलापूर) असं या घटनेतील मृत व्यक्तीचं नाव असून तो व्यावसायिक ड्रायव्हर म्हणून काम करत होता.(Solapur Crime News)
बुधवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास वळसंग येथे आठवडा बाजार भरला असताना ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण वाघमारे याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय गावातीलच रविकुमार भीमाशंकर पुटके याला होता. या संशयामुळे आरोपी अनेक दिवसांपासून लक्ष्मणवर पाळत ठेवून होता. बाजाराच्या दिवशी दुपारपासूनच आरोपी त्याच्या मागावर होता, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
सायंकाळच्या सुमारास बाजारातील सिद्धेश्वर चौक परिसरात लक्ष्मण वाघमारे याला एकटं गाठत आरोपीने अचानक हल्ला चढवला. जवळ बाळगलेल्या कोयत्याने त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता, खाली कोसळलेल्या लक्ष्मणच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याची निर्दयपणे हत्या करण्यात आली. हल्ल्याची तीव्रता इतकी होती की मृताच्या चेहऱ्यावर आणि पोटावर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत.
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लक्ष्मण वाघमारे यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केलं. मृत्यूची बातमी समजताच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मित्र, नातेवाईक आणि गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.










